प्रश्न मोठा मार्मिक आहे तो असा की, एखादा माणूस सत्कर्मरत असतो त्याचं नेमकं श्रेय केवळ त्याचंच असतं की परिस्थिती, प्रारब्ध, माणसं यांचाही त्यात वाटा असतो. त्याचप्रमाणे एखादा माणूस दुष्कर्मरत असतो त्याला जबाबदार केवळ तोच असतो की परिस्थिती, प्रारब्ध, माणसं यांचाही त्यात वाटा असतो. जगातल्या चांगल्या-वाईटाला काळ्या-पांढऱ्या अशा दोन गटांत विभागून टाकण्याच्या आपल्या सवयीमुळे हा गुंता अधिकच वाढतो! त्यातही गंमत अशी की, मी चांगल्या घरात जन्मलो, चांगल्या माणसांत राहिलो, संस्कार-शिक्षण यांचा लाभ मला झाला, परिस्थितीची अनुकूलता राहिली, आर्थिक स्थिती चांगली राहिली, जीवनात अडीअडचणी फार आल्या नाहीत तर मग सत्कर्मयुक्त जीवन जगण्याची संधी मला असते. अर्थात हे सगळं लाभूनही मी चांगला माणूस होईनच, याची काही हमी नाही. मी दुष्प्रवृत्त आणि दुष्कर्मरतही होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे मी चांगल्या घरात जन्मलो नाही, कथित वाईट माणसांत राहिलो, कुसंस्कार माझ्यावर बिंबले, शिक्षणाचा लाभ झाला नाही, परिस्थिती प्रतिकूलच राहिली, आर्थिक स्थिती बिकटच राहिली, जीवनातल्या अडीअडचणी कधीच ओसरल्या नाहीत तर मग माझ्या जीवनाची रीत दुष्कर्मयुक्त असू शकते. अर्थात हे सगळं वाटय़ाला येऊनही मी वाईट माणूसच होईन, असंही नव्हे! मी सत्प्रवृत्त आणि सत्कर्मरतही होऊ शकतो. थोडक्यात मी ज्या परिस्थितीत, ज्या चौकटीत जन्मतो तिचा माझ्यावर मोठा पगडा असला, अंमल असला तरी केवळ त्या परिस्थितीच्या होकायंत्रानुरूप माझी वाटचाल होत नाही. मग या चांगल्या-वाईटाचा उगम कुठे आहे? तो माझ्या अंतर्मनातच आहे. माझी आंतरिक खरी प्रवृत्ती जी काही आहे त्यानुसारच मी जगू पाहातो.  माझी आंतरिक वृत्ती ही सत्प्रेरित असेल तर बाह्य़ परिस्थिती कशीही असो मी सत्प्रवृत्तच होतो. माझी आंतरिक वृत्ती ही असत्प्रेरित असेल तर बाह्य़ परिस्थिती कशीही असो मी दुष्प्रवृत्तच होतो. एक गोष्ट खरी की आंतरिक प्रवृत्तीनुसार माझ्यातला सच्चा भाव विकसित होतो आणि त्यानुसारच मी अंतिमत: वावरू लागतो, पण सुरुवातीला परिस्थिती जर असत्ने व्याप्त असेल, दुष्प्रवाहित असेल तर तिच्याशी संघर्ष करण्यासाठी मोठं धैर्य, चिकाटी आणि दृढनिश्चयही लागतो. मग प्रश्न असा, की जर माझ्या जीवनाचा प्रवाह मला दुष्कर्माकडे खेचणारा असेल, वरकरणी माझं जीवन दुष्कर्मरत आणि दुष्प्रवृत्त असेल तर मला भगवंताकडे वळायची कोणतीही संधी नाही का? इथे या ओवीचा पोथीतला अर्थ काहीसा साथ देतो आणि ही ओवी सांगते की, तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।। तुझं जीवन दुष्प्रवृत्तीच्या अंमलाखाली आहे ना? तरी हरकत नाही. आता मात्र जे जे कर्म करशील आणि ते कर्म कसंही होवो, ते मला अर्पण करून टाक. मग तुला त्या दुष्कर्मातून कसं बाहेर काढायचं याची चिंता मग मला लागेल! आपला हा विषय थोडा लांबत आहे,  पण या अनुषंगानं सुमारे शंभरेक वर्षांपूर्वीचीच एक सत्यकथा सांगाविशी वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा