स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘संजीवनी गाथे’तला जो अभंग आपण पाहात आहोत त्यात स्वामी सांगतात की, ‘‘प्रपंचाची जितकी आस धरावी तितका त्याचा फास आवळत जातो. त्या प्रपंचाविषयी मन जितकं उदास होऊ लागेल, तितका तो फास ढिला होतो.’’ आता ‘प्रपंच’ या शब्दाची व्याख्या मागेच आपण काय केली होती? की माझी पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली माझी ओढ हाच प्रपंच आहे! आता आपण ‘प्रपंचा’ची व्याख्या काय करतो? तर आपलं घरदार हाच आपण प्रपंच मानतो. आता घरदार, आप्तस्वकीय, परिचित, आपली भौतिक संपदा हे सर्व जरी प्रपंचात गृहीत असलं तरी या सर्वाचा आधार आपली मनातली ओढ हाच नसतो का? मनात ओढ आहे म्हणूनच या सर्वाविषयी आपल्याला ममत्व वाटतं ना? तेव्हा त्या ओढीवरच पहिला पाय दिला पाहिजे. एकदा ही आस कमी झाली की सोस कमी होईल. आस आहे म्हणून प्रपंचाचा फास आहे. प्रपंचाच्या फासळीत अडकून तो खेचत नेईल तिकडे आपली फरपट सुरू आहे. त्यातही गंमत अशी की मी या फासळीत अडकलो नसून मीच स्वत:हून त्यात अडकवून घेतलं आहे. प्रपंचाचा हा सोस कमी झाला की स्वत:हून अडकवून घेणं कमी होईल. फास ढिला होईल. स्वामी विचारतात कां गा जासी वृथा प्रपंची गुंतून। पाहें विचारून सारासार।। आता इथे कुणाला वाटेल की प्रपंचालाच स्वामींचा विरोध आहे, तर असं नाही. इथे ‘वृथा’ शब्दाला महत्त्व आहे. आसक्तीतून होणाऱ्या वृथा प्रपंचाला त्यांचा विरोध आहे! प्रपंचातील कर्तव्यांना विरोध नाही. कर्तव्यांची सीमारेषा ओलांडून मोह, भ्रम आणि आसक्तीने प्रपंचाचं ओझं वृथा वाढवत बसायला त्यांचा विरोध आहे. एका अभंगात स्वामींनीच स्पष्ट म्हटलं आहे, ‘‘धन सुत दारा असूं दे पसारा। नको देऊं थारा आसक्तीतें।।’’ (संजीवनी गाथा, अभंग १५०). तेव्हा हा विरोध आसक्तीयुक्त वृथा प्रपंचाला आहे. आता प्रपंचातलं अर्थात आसक्तीतलं नाहक गुरफटणं अंतिमत: मलाच कसं त्रासदायक होतं, हे आपलं आपल्यालाही कळतं. पण जे कळतं ते वळत नाही, समजलं ते आचरणात येत नाही. हेच तर अज्ञान आहे! या अज्ञानाचं निरसन सद्गुरूंच्या बोधाशिवाय शक्य नाही. मग सद्गुरू आपल्या वृथा अडकण्याची जाणीव उलटय़ा खुणांतून देतच असतात! आपण ज्या गोष्टींना सार अर्थात सत्य मानतो, महत्त्व देतो, त्यांच्यासाठी आटापिटा करतो, त्या खऱ्याच सार आहेत, सत्यरूप अर्थात शाश्वत आहेत की असार आहेत, असत्यरूप अर्थात अशाश्वत आहेत, हा प्रश्न सद्गुरू माझ्या मनात निर्माण करतात. तुकोबा एका अभंगात म्हणतात, ‘एकानं झाडाला मिठी मारली आणि ओरडू लागला, वाचवा हो वाचवा, हे झाड काही मला सोडत नाही!’ तसं आम्ही स्वत:हून आम्हाला दोरानं बांधून घेतलं आहे आणि ओरडत आहोत, या गुंत्यातून सोडवा हो! स्वामी म्हणे देहीं उदास राहून। करीं सोडवण तुझी तूं चि।। स्वामी सांगतात की, या गुंत्यातून सुटायचं असेल तर देहबुद्धीचं, आसक्तीचं दास्य सोडून त्याबाबत उदास व्हावं लागेल.
२१७. उलटी खूण -३
स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘संजीवनी गाथे’तला जो अभंग आपण पाहात आहोत त्यात स्वामी सांगतात की, ‘‘प्रपंचाची जितकी आस धरावी तितका त्याचा फास आवळत जातो. त्या प्रपंचाविषयी मन जितकं उदास होऊ लागेल, तितका तो फास ढिला होतो.’’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-11-2014 at 12:15 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan