एखादी व्यक्ती व्यक्तिगत हानी अथवा दु:खानं विषण्ण होऊ नये, इथवर एक वेळ ठीक आहे. पण सामाजिक वा नैसर्गिक हानी तसंच सामाजिक वा नैसर्गिक दु:खानंही कुणाचं मन विषण्ण होऊ नये, ही अपेक्षा चुकीची नव्हे का, असा प्रश्न कुणाच्या मनात उमटेल. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. संतांनी त्यांच्या आचरणातून आणि बोधातून नैसर्गिक आपत्तीकडे कसं पाहावं आणि त्या काळात दुसऱ्याचा विचार प्रथम कसा करावा, ते शिकवलं होतंच. सामाजिक दु:खांचं भान त्यांनाही होतं आणि ते निस्तरण्यासाठीही ते झिजले. स्वामी स्वरूपानंद यांचं सामाजिक कार्यही मोठं आहेच. आपली स्थिती कशी आहे? आपण खरं समाजाभिमुख जगतो का? आपण जीवनात प्रथम समाजाचा, समाजाच्या भल्याचा विचार करतो का? नाही. आपलं जगणं अत्यंत व्यक्तिकेंद्रित आहे. आपल्या जगाचा केंद्रबिंदू देहासक्त, अज्ञानयुक्त, मोहग्रस्त, भ्रामक असा ‘मी’च आहे. हजारो मैलांवर घातपाती कृत्ये घडून रोज अनेक जण दगावत असताना मी त्यावर चर्चा जरूर करतो, पण विषण्ण होतो का? पण माझ्या गावात जेव्हा बॉम्बस्फोट होतात तेव्हा मी खडबडून जागा होतो, माझ्या चर्चेत त्वेष-भीती येते, हे थांबलंच पाहिजे, ही जाणीव तीव्र होते. असं का होतं? कारण हजारो मैलांवरच्या उत्पाताचं मला दु:ख असलं तरी त्यानं माझ्या व्यक्तिगत जीवनाला धक्का लागत नाही, असं मला वाटत असतं. उलट माझ्या गावातल्या स्फोटानं माझं व्यक्तिगत जीवनही धोक्यात आल्याची माझी भावना होते. त्यामुळेच मी भयानं जागा होतो. त्यामुळे आपलं क्षुद्र, संकुचित, व्यक्तिकेंद्रित जगणं जोवर आपण ओलांडत नाही तोवर खऱ्या अर्थानं समाजाचा विचारच आपण करीत नाही. सामाजिक कार्यासाठी, समाजात परिवर्तन घडावं यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वत:ला झोकून दिलं त्यांनी त्यांनी आपलं व्यक्तिगत जीवनातील स्वार्थाचं ओझं फेकून दिलं होतं. त्याचबरोबर व्यक्तिगत, संकुचित, देहासक्त जीवनात अडकलं असताही जे सामाजिक कार्य करू पाहतात ते व्यक्तिगत स्वार्थासाठीच त्या कार्याचा वापर करून माणूसपणाची अधिकच हीन पातळी गाठतात. तेव्हा भ्रामक, अज्ञानयुक्त ‘मी’नं सुखानं हुरळू नये, दु:खानं खचू नये, लाभानं आनंदी होऊ नये वा हानीनं विषण्ण होऊ नये, असं संत सांगतात त्याचं कारण फार मोठं आहे. हे ज्याला साधेल तोच संकुचितपणातून मोकळा होऊन व्यापक होऊ शकेल, हे ते कारण आहे. अध्यात्म हे वरकरणी एकापुरतं भासत असलं तरी प्रत्यक्षात ते जीवनातील समग्रतेकडे, व्यापकतेकडे नेणारंच असतं. समाजाचा लघुतम घटक व्यक्तीच आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती बेपर्वा, अहंमग्न, देहासक्त जीवन जगत असताना तो समाज मात्र नि:स्वार्थ, व्यापक, संवेदनशील होणं कसं शक्य आहे? श्रीनिसर्गदत्त महाराज यांचं एक फार मार्मिक विधान आहे की, ‘तुम्ही चेहरा न बदलता प्रतिबिंब बदलण्याची अपेक्षा करीत आहात!’ तेव्हा सामाजिक वेदनेचाही ढालीसारखा वापर करून ‘मी’विरुद्धची लढाई टाळण्याचा प्रयत्न आपण सोडून देऊन या ओव्यांकडे नव्यानं पाहू. ‘‘सुखीं संतोषा न यावें। दुखीं विषादा न भजावें । आणि लाभ लाभ न धरावे । मनामाजीं ॥ आपणयां उचिता । स्वधर्मे शहारता । जें पावे तें निवांता । साहोनि जावे ॥’’