सुखानं सुखाची जाणीव कुणाला होते? दु:खानं दु:खाची जाणीव कुणाला होते? लाभ झाला तर आनंद कुणाला होतो? हानी झाली तर दु:ख कुणाला होतं? हे सर्व मलाच होतं. मनामुळंच मला या गोष्टींची जाणीव होते आणि या गोष्टींनी मनच उल्हसित होतं किंवा विषण्ण होतं. जीवनातील या चढ-उतारांबरोबर मन, चित्त, बुद्धी, अहंकार खळबळ माजवितात आणि देहाची फरपटच वाढवतात. या मनावरच जय मिळवता आला तर? ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की, ‘‘आतां सूत्रतंतु तुटलिया। चेष्टाचि ठाके सायखडिया। तैसी प्राणजयें कर्मेद्रियां। खुंटे गती।। कीं मावळलिया दिनकरु। सरे किरणांचा पसरु। तैसा मनोजयें प्रचारू। बुद्धीन्द्रियांचा।।’’ (अध्याय ६/ ओव्या १८३. १८४). कठपुतळ्या ज्या दोऱ्यांद्वारे नाचविल्या जात असतात ती दोरीच तुटली तर जशी बाहुलीची हालचाल बंद पडेल, त्याप्रमाणे प्राणांचा जय साधल्याने कर्मेद्रियांचे देहासक्तीनुसार सुरू असलेले व्यापार बंद पडतात. सूर्य मावळल्यावर जसा दशदिशांना पसरलेला किरणांचा विस्तारही नाहीसा होतो त्याप्रमाणे मन जिंकले असता ज्ञानेंद्रियांची खळबळही मावळते! इथे ‘प्रचारू बुद्धीन्द्रियांचा’ असा शब्द वापरला आहे. प्रचार म्हणजे एखादी गोष्ट वारंवार ठसवू पाहणे. तेव्हा ज्ञानेंद्रियं या शब्दात ज्ञान असलं तरी प्रत्यक्षात अज्ञानयुक्त अशा, भ्रामक अशा देहगत ओढींसाठीच मन त्यांना राबवत असतं आणि मग जेव्हा ते मनच जिंकलं जातं तेव्हा त्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून देहगत ओढींची जी खळबळ अंत:करणात सुरू असते तीच ओसरते. प्रत्यक्षात, मनाला जिंकणं सोडा, मनाचा प्रभाव कमी करणंदेखील मोठी कठीण गोष्ट आहे. स्वामी स्वरूपानंद त्या अभ्यासाची दिशा मांडताना सांगतात, ‘‘ देहबुद्धी पूर्णाशाने धारण केल्याने, देहबुद्धीने आत्मरूप पूर्ण झाकले गेल्याने, मी माझे असा अहंकार घेऊन जीव सर्व कर्मे बंधनात्मक करून त्यात गुंतून जातो. सुखदु:खे अनुभवितो. स्व-रूप ज्ञान झालं की संसारातील सुखदु:खे संपतात. त्यासाठी सतत मी इंद्रिये नव्हे, मी बुद्धी नव्हे, मी अहंकार नव्हे, मन नव्हे, असे चिंतन करीत मी तोच- परमेश्वर आहे- स: अहम् – सोऽहं अशा भावक्रियेने, क्षणाक्षणाला देहबुद्धीच्या व मनाच्या मिठीतून सोडवीत मूळच्या शुद्ध अधिष्ठानाला, स्थितीला न्यावयाचे. सोऽहं अभ्यास बराच काळ होता होता मनच नाहीसे होते- आत्मरूपात मिसळते आणि मग केवळ आत्मरूपच उरते.’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, पृ. ७६). या अभ्यासाची सुरुवात सुखी संतोषा न यावे, दु:खी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे, मनामाजी – हीच आहे. सुखानं हुरळून जायचं नाही की दु:खानं खिन्नता येऊ द्यायची नाही. लाभानं आनंदून जायचं नाही की हानीनं विषण्ण व्हायचं नाही. आता गंमत अशी की एकवेळ सुखानं आणि लाभानं आनंदून जायचं नाही, हे आपल्याला साधेल, असं वाटेलही. पण दु:खानं अथवा हानीनंदेखील मन विषण्ण होऊ द्यायचं नाही, हे अशक्य वाटतं. त्यातही कुणाच्या मनात येईल, नैसर्गिक आपत्ती वा सामाजिक अन्यायात मनाची ही स्थिती अपेक्षिणं म्हणजे निष्क्रियताच नव्हे का?