जन्मापासून जो ‘मी’ पक्का होत आहे, त्याच्यावर थेट आघात करण्यासाठीच तर, ‘‘सुखीं संतोषा न यावें। दु:खीं विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।’’ हा सल्ला प्रभू देत आहेत! स्वामी स्वरूपानंद यांनी या ओव्यांच्या अभंगानुवादात म्हटलं आहे की, ‘‘होतां सुख-प्राप्ति। न जावें हर्षून। दु:खीं तरी खिन्न। होऊं नये।। होईल विजय। येईल वा मृत्यु। पुढील हें चिंतूं। नये आधीं।।’’ म्हणजे सुख मिळालं तरी आनंदून जाऊ नये. दु:खं वाटय़ाला आलं म्हणून खिन्न होऊ नये. आता हा अभ्यास आहे ना? मग तो याच जन्मात साध्य होईल किंवा आयुष्य संपलं तरी साध्य होणार नाही. म्हणून इथे, ‘‘होईल विजय। येईल वा मृत्यु’’ असं म्हटलं आहे. माणूस म्हणतो, अहो एवढं या जन्मात साधणं शक्य आहे का? ते शक्य नसेल तर कशाला हवा हा अभ्यास? त्यासाठी लगेच स्वामीजी सांगतात, ‘‘पुढील हें चिंतूं। नये आधीं।।’’ पुढची चिंता न करता आजचा अभ्यास सुरू करा. अर्जुनानंही प्रभूंना हाच प्रश्न विचारला होता की हे प्रभो, हा अभ्यास याच जन्मी पूर्ण झाला नाही तर त्याला गती कशी मिळेल? एखाद्याला विषयत्याग साधला आणि तो आत्मसिद्धीच्या, स्वरूपसाक्षात्काराच्या वाटेनं निघाला. आता विषयही मागे सुटलेले आहेत आणि आत्मसिद्धी अर्थात स्वरूपज्ञानही झालेलं नाही, असं असतानाच त्याचं आयुष्य संपलं. मग पुढे काय होईल? प्रभू सांगतात की, ‘‘..जया मोक्षसुखीं आस्था। तया मोक्षावांचुनि अन्यथा। गति आहे गा।।’’ अर्जुना ज्याला मोक्षसुखाची खरी आस्था आहे, त्याला मोक्षावाचून दुसरे काय मिळणार?, पण.. ‘‘परि एतुलेंचि एक घडे। जें माझारीं विसवावें पडे। तेंही परि ऐसेनि सुरवाडें। जो देवां नाहीं।।’’पण एकच घडतं, त्याला (आयुष्य संपलं म्हणून) मधे थोडा विसावा घ्यावा लागतो. तो विसावाही इतका सुखद असतो की देवांनाही तो लाभत नाही! मग तो योगाभ्यास अर्धवट झालेला, योगभ्रष्ट असा साधक, ‘तया योगियांचां कुळीं। जन्म पावे।।’ योग्यांच्या कुळात जन्म पावतो. अर्थात त्याचा अभ्यास पुढील जन्मीही अधिक वेगानं सुरू राहतो. (ज्ञानेश्वरी, अध्याय सहावा). तात्पर्य काय? तर अभ्यास सुरू करण्याआधीच तो पूर्ण झाला नाही तर काय उपयोग, अशी चिंता करू नका! मग हा अभ्यास काय आहे? तर ‘‘सुखीं संतोषा न यावें। दु:खीं विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।’’ आता सुखानं संतुष्ट कोण होतो दु:खानं दु:खी कोण होतो? लाभ आणि हानी यांची चिंता कोण बाळगतो? या सर्व प्रश्नांचं उत्तर ‘मी’ हेच आहे. सुखानं संतुष्ट व्हायची, दु:खानं खिन्न व्हायची आणि लाभ-हानीची चिंता करायची सवय मलाच जन्मजात आहे. ही सवय तोडायची तर स्वत:शी युद्धच करावं लागेल. या युद्धात याच जन्मी जय मिळेल किंवा मृत्यूही येईल, तरी हरकत नाही. कारण ‘मी’ आणि ‘माझे’ची सवय जर जन्मोजन्मी लागून दृढ झाली आहे, तर हा अभ्यासही जन्मोजन्मी सुरू राहू शकतो. आता हे सुख-दु:ख, लाभ-हानीची चिंता कुठं असते? तर ‘मनामाजी’. मनातच. स्वामीही सांगतात, ‘‘मन चि सुखदु:खां मूळ। सृष्टि केवळ मनोमय।’’ त्या मनाकडे थोडं वळू.