आता अनासक्ताचं जे वर्णन आपण वाचलं तशी स्थिती ज्याला साधेल त्याला सुख-दु:खाची किंवा लाभ-हानीची पर्वा कशाला असेल? आपण तसे अनासक्त नाही. खरी अनासक्ती आपल्याला पूर्ण साधेल, असंही नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील चढउताराच्या स्थितीतच हा अभ्यास सुरू करायचा आहे. आपल्या जीवनातली परिस्थिती जशी अस्थिर आहे, तसेच माणसांबरोबरचे आपले संबंधही अस्थिर आहेत. म्हणजे ज्या माणसांबरोबर आज आपले संबंध सुरळीत आहेत त्यात उद्या बिघाड येणारच नाही, अशी हमी काही देता येत नाही. जी गोष्ट माणसांची तीच परिस्थितीचीही. आज परिस्थिती अनुकूल भासते, उमेद वाढविणारी भासते. उद्या परिस्थिती प्रतिकूलही होऊ शकते, उमेद नष्ट करणारीही होऊ शकते. जीवनातल्या या अनिश्चिततेचीच आपल्याला भीती वाटते. या अनिश्चिततेमुळेच आपलं जीवन कधी सुखाचं तर कधी दु:खाचं होतं. कधी लाभदायक तर कधी हानीकारक भासतं. या अशा हेलकाव्यांमुळे आपल्या मनाची स्थितीही हेलकावतच असते. अशा स्थितीत आपल्याला हा अभ्यास सुरू करायचा आहे. आता दु:खानं विषण्ण न होणं, हानीनं खचून न जाणं आपल्याला पहिल्या पावलात साधणार नाही. मग निदान सुखानं हुरळून न जाण्याचा आणि लाभानं आनंदून न जाण्याचा तरी अभ्यास करायला काय हरकत आहे? परराज्यांकडून वारंवार आक्रमणं होत असतानाही एक सम्राट मोठय़ा धैर्यानं राज्य करीत असे. त्याच्या एका मित्रानं त्याला विचारलं, ‘‘तुला यश-अपयशाची चिंता कधी शिवत नाही का? पुढे काय होईल, याची धास्ती वाटत नाही का? तुझं मन इतकं शांत कसं असतं?’’ सम्राटानं हसून बोटातली अंगठी दाखवली. त्या अंगठीवर एकच वाक्य कोरलं होतं, ‘हेही दिवस जातील!’ सम्राट म्हणाला, ‘‘मीजिंकतो, परिस्थिती चांगली होते, सुखाचा कारभार सुरू होतो तेव्हा या अंगठीकडे लक्ष जातं आणि जाणवतं, अरे, हेही दिवस जातीलच! मी हरणार असं वाटतं, परिस्थिती अतिशय प्रतिकूल होते, मन अस्वस्थ होतं तेव्हाही या अंगठीकडेच लक्ष जातं आणि जाणवतं, हेही दिवस जातील!! सुखातही ही अंगठी मला शेफारू देत नाही आणि दु:खातही ही अंगठी मला खचू देत नाही.’’ अंगठीला मुद्रा असंही म्हणतात. सम्राटाच्या त्या अंगठीप्रमाणे सद्गुरूबोधाची मुद्रा आपल्या अंत:करणावर उमटत राहिली तर कदाचित किमान सुखानं शेफारून न जाणं आणि लाभानं गर्वानं फुलून न जाणं तरी आपल्याला साधेल. भौतिकातील चढउतारांचा मनावर, मनाच्या समतोलावर परिणाम होऊ नये, ही सर्वसामान्य माणसाचीही इच्छा असतेच. साधकासाठी तर ही स्थिती साधण्याची गरज मोठीच आहे. भौतिकातल्या सम-विषम परिस्थितीतच जर मन अडकून पडलं तर ते त्या भौतिकापलीकडे कसं जाईल? तेव्हा सुखानं आनंदून न जावं, दु:खानं विषण्ण न व्हावं, लाभानं हुरळून न जावं आणि हानीनं खचून न जावं, हेच सूत्र ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवीतही आहे. ती ओवी अशी : ‘‘आपणयां उचिता। स्वधर्मे राहाटतां। जे पावे तें निवांता। साहोनि जावे।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा