स्वामी स्वरूपानंद यांनी संकलित केलेल्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवीकडे आता वळू. प्रथम ओवी, कंसात ती ‘ज्ञानेश्वरी’त कोणत्या अध्यायात कितवी आहे त्याचा उल्लेख, नंतर तिचा प्रचलित अर्थ आणि मग विशेषार्थ वा अर्थविवरण; असा आपला क्रम आहे. तर ही ओवी अशी :
आपणयां उचिता। स्वधर्मे राहाटतां। जें पावे तें निवांता। साहोनि जावे।।१०।। (अ. २ / २२८)
प्रचलितार्थ : आपल्याला योग्य असं जे स्वधर्माचं आचरण, तेच करीत असताना, जो प्रसंग येईल, तो मुकाटय़ानं सहन करावा.
विशेषार्थ : स्वरूपाचं भान ठेवून जगणं हाच साधकाचा स्वधर्म आहे. तोच उचित आहे. त्या स्वधर्माचरणानुसार जीवन जगत असताना वाटय़ाला जे येईल ते निवांतपणे साहून त्यापलीकडे जावं.
विवरण : स्वरूपाचं भान ठेवून जगणं हाच साधकाचा स्वधर्म आहे! इथे एक सूक्ष्म गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. जगणं हे बाह्य़, स्थूल-भौतिक जगात आहे आणि आपली साधना ही आंतरिक, सूक्ष्म जगात आपल्याला नेणारी आहे, असं आपण मानतो. थोडक्यात जगताना आपण बहिर्मुखी असतो तर साधना आपल्याला अंतर्मुख करत असते. जगताना आपल्याला स्वरूपाचं भान नसतं. आता स्वरूपाचं भान म्हणजे काय? तर जन्मत:च आपल्याला जे नाव दिलं गेलं, सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुरूप आपली जी जडणघडण झाली, शिक्षण आणि रोजगारामुळे जो दर्जा आपल्याला लाभला; या साऱ्याला आपण आपली ओळख मानत असतो. आपलं स्वरूप म्हणजे जणू आपली हीच ओळख आहे, असंही मानत असतो. जगताना ठेच लागते तेव्हा आपण जगण्याबद्दल, स्वत:च्या ओळखीबद्दल, दुसऱ्यांकडून आपण बाळगत असलेल्या अपेक्षांबद्दल, आपल्या नात्यागोत्यांबद्दल सजग होतो. या साऱ्याचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. जगण्याचा अर्थ शोधू लागतो. साधनेनं बाह्य़ जगाचा प्रभाव ओसरावा आणि आपलं खरं स्वरूप, खरी मन:शांती, खरी मानसिक स्थिरता लाभावी, असंही आपल्याला वाटू लागतं. साधनेनंच निवांतपणा येईल आणि त्यानंतर जगणंही निवांत होईल, असंही आपण मानू लागतो. प्रत्यक्षात साधना करीत असतानाही जगात जेव्हा दु:खाचे, अवमानाचे, अपेक्षाभंगाचे, प्रतिकूलतेचे प्रसंग वाटय़ाला येतात तेव्हा आपल्या मनाला धक्का बसतो. साधना करतानाही मन निवांत होत नाही आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. साधना करीत असलेल्या प्रत्येकाच्या मनात अशा प्राथमिक टप्प्यावर एक प्रश्न सतत उमटतो तो असा की, मी इतकी उपासना करतो, देवाचं इतकं भजन-पूजन करतो, इतकी पारायणं करतो, इतकं नाम घेतो तरीही माझ्याच वाटय़ाला इतकं दु:खं का? त्यापुढची सल अशी असते की, जे यातलं काहीच करीत नाहीत ते मात्र सुखात कसे? मग माझ्या उपासनेचा उपयोग तरी काय? थोडक्यात आपली साधना आणि जगात आपल्या वाटय़ाला येणारं ‘दु:ख’ या दोन्ही गोष्टींना आपण तराजूत तोलून साधनेचा ‘फायदा’ आहे का, हेही सतत जोखत असतो. या तराजूमुळे स्वरूपाचं सोडा, साधनेचंही खरं भान हरपतं.
६६. तराजू
स्वामी स्वरूपानंद यांनी संकलित केलेल्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवीकडे आता वळू. प्रथम ओवी, कंसात ती ‘ज्ञानेश्वरी’त कोणत्या अध्यायात कितवी आहे त्याचा उल्लेख
First published on: 04-04-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan 66 balance