आपल्या स्वत:ला हरविण्यासाठी, अर्थात आपल्या मनाच्या ओढी, आसक्ती तोडण्यासाठीच खरी साधना करायची असते. अशी साधना म्हणजे अंतर्बाह्य़ संघर्षच असतो. जगाचा अर्थात भौतिकाचा प्रभाव मनावर पडत असताना आणि भौतिकाच्या आधारात सुरक्षित वाटत असताना त्या भौतिकाच्या आसक्तीला ओलांडून श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं संघर्षमयच असतं. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, यात बाकीच्या गोष्टी आड येतातच, पण आपणही आड येत असतो! जे. कृष्णमूर्ती यालाच स्वत:पासून पळणं, म्हणतात. आता सर्वसामान्य साधक असो की सर्वसामान्य माणूस, प्रत्येकाच्याच जीवनात ‘मी’ विरुद्ध जग, हा संघर्ष अटळपणे येतोच. आपल्या इच्छांची पूर्ती व्हावी म्हणून, लोकांनी आपल्या मनासारखं वागावं म्हणून आपण धडपडतो. या इच्छांची पूर्ती जगातच होणार असते. ज्या लोकांनी आपल्या मनाजोगतं वागावं, असं आपल्याला वाटतं ते जगाचाच भाग असतात. तेव्हा परिस्थिती आणि व्यक्तींविरोधात झुंजत आपण हवं ते मिळविण्याचा आणि नको ते टाळण्याचा अव्याहत प्रयत्न करत असतो. हाच संघर्ष नाही का? सर्वसामान्य माणूस असो की साधक असो, जो-तो या जगात एकटाच आहे. खऱ्या अर्थानं आपलं कुणीच नाही, हे सत्य प्रत्येकाला अनेकवार उमगत असतंच. त्या कठोर वास्तवाविरोधात उभं ठाकून, परिस्थिती कशीही असो, माणसं कशीही वागोत, आपलं मन:स्वास्थ्य टिकलं पाहिजे, असं कुणाला वाटत नाही? पण या सर्वाचं मूळ ज्या ‘मी’च्या बुंध्यात आहे, तो बुंधा तोडायची साधना करायला कुणी राजी नसतो. जीवनातल्या संघर्षांचं मूळच नष्ट करणारं हे खरं युद्ध टाळण्यासाठी माणूस अनेक छुपे मार्ग शोधतो. जे. कृष्णमूर्ती त्यापैकी जे मार्ग सांगतात त्यातले दोन मार्ग हे सर्वसामान्य माणसाचे आहेत. सर्वसामान्य माणूस ममत्वानं आणि करमणुकीच्या साधनानं खरं युद्ध टाळत असतो. एकीकडून फटका बसला तर दुसरीकडे लगेच तो भावनिक आधार शोधतो, तेथे ममत्वानं अडकतो आणि मग पुन्हा फटका बसला तर तिसरीकडे आधार शोधतो. माणसांचा आधार नसेल तर करमणुकीच्या साधनांत तो मन गुंतवायचा प्रयत्न करतो. साधक काय करतो? तो देव-देव करून, ज्ञानोपासनेनं, श्रद्धेनं, कशाशी तरी एकरूप होण्यातून स्वत:पासून पळून जायला पाहात असतो! स्वत:पासून पळणं म्हणजे ‘मी’पणा घालवण्यासाठी राजी नसणं! आता या साधनेच्या मार्गानी आपण खरी साधना टाळून फसवी साधना करतो आणि ‘मी’ला रसद पुरवून तो अधिकच बळकट करतो. कसा? तर, देव-देव करून माझ्यासारखा भक्त नाही, असं मानू लागतो. ज्ञानानं ‘मी’च काय तो ज्ञानी, असं मानू लागतो. आपली श्रद्धा म्हणजेही ‘मी’ला सांभाळण्याचाच आधार बनते. मग तो उपासनेच्या गर्वाचा आधार असो, गुरुपरंपरेच्या गर्वाचा आधार असो. तथाकथित एकरूपतेतून तर आपण स्वत:ला श्रेष्ठ मानू लागतो. माझ्यासारखा सद्गुरूंचा खरा भक्त कुणीच नाही, हा भ्रम निर्माण होतो. खरी साधना ‘मी’चा लय करण्यासाठी असते. आपल्या साधनेनं मात्र ‘मी’ अधिकच पक्का होतो. 

Story img Loader