माझ्या मर्जीशिवाय मला कोण आत टाकणार, हा अब्दुल रहमान यांचा सवाल फार मार्मिक आहे. सद्गुरू अंतरंगातच असतात, पण अंतरंग त्यांनीच व्याप्त आहे, ही आपली जाणीव मात्र लोपली असते आणि त्या अंतरंगात जगाचाच प्रभाव असतो. त्यामुळे ‘तुला आत टाकीन’ असे उद्गार रागाच्या भरात त्या निरीक्षकाने सहज काढले तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय त्यांना ‘आत टाकणं’ अर्थात अंतरंगात धारण करणं कुणाला शक्य आहे? हेही तेवढंच खरं की, जोवर सद्गुरू अंतरंगात आहेत, ही जाणीव पक्की होऊन जगणं त्यांच्या प्रकाशात होत नाही, तोवर खरा निवांतपणा लाभूच शकत नाही. आपण स्वत:हून स्वामींकडे आलो आहोत, असं पठाण यांना वाटत होतं आणि अवलिया अब्दुल रहमान यांच्याशी आपली भेट योगायोगानं झाली, असं त्या निरीक्षकाला वाटत होतं. प्रत्यक्षात कोणत्याही योगानं सद्गुरूंची भेट होऊ शकत नाही! केवळ त्यांचीच कृपा आणि इच्छा असते म्हणून त्यांच्या जवळ पोहोचता येतं. पण त्यांच्याजवळ पोहोचण्याचा खरा लाभ आपण जाणतो का? निसर्गदत्त महाराजांबरोबर दीर्घ प्रश्नोत्तरं केल्यानंतर एक साधक म्हणाला, ‘‘म्हणून तर मी इथे आलो आहे.’’ महाराज त्याला म्हणाले, ‘‘तुम्ही अजूनही इथे आलेला नाहीत!’’ म्हणजे ते जिथं आहेत तिथं आपलंही लक्ष लागावं, हे आपलं लक्ष्यच नाही! त्यातही बाह्य़रूपातच अडकण्याची, भवतालानुसार त्यांना जोखण्याची आपली सवय आड येते. त्यांच्याच कृपेनं त्यांच्यापर्यंत पोहोचूनही त्यांच्याकडे जाण्याचा खरा लाभ आपण जाणतो का? द्वैतमय जगात कायमची एक स्थिती टिकणं केवळ अशक्य असताना आपण कायमचं भौतिक सुख अपेक्षितो. त्यासाठी सद्गुरूंच्या कृपेचा वापर करू पाहतो. जगाचं खरं स्वरूप उकलणं आणि मनावर ठसणं हाच त्यांच्याकडे जाण्याचा खरा लाभ आहे. हे उमगलं नाही तर दृश्यात फसून आपण सद्गुरूंच्या खऱ्या हेतूपासून कसं दुरावतो, याचं सूचन पं. महादेवशास्त्री जोशी यांनी केलं आहे. ते लिहितात, ‘‘(स्वामींची) ही खोली हवेशीर मुळीच नव्हे. मोकळा प्रकाश त्या खोलीत कधीही शिरू शकत नाही. अंधार नव्हे; पण अंधूकपणा तिथे ठाण मांडून आहे. गेली दहा र्वष स्वामीजी त्या खोलीतून बाहेर पडलेले नाहीत. बाहेरचं जग त्यांना पारखं आहे. बाहेरचे बदलते ऋतू, तारे, वारे, छाया-प्रकाशाचे खेळ हे सारं ते अंतश्चक्षूंनीच पाहू शकतात. चार भिंतींएवढंच त्यांचं बाह्य़ जग आहे. पण त्यांचं अंतर्विश्व केवढं विशाल, चैतन्यमय आहे, त्याची इतरेजनांना काय कल्पना! आणि हे सारं अंतर्विश्व हे त्यांचं ‘स्व’रूप आहे. त्या ‘स्व’रूपात्मक अंतर्विश्वाची कवाडं स्वामीजींनी सदाची उघडून ठेवली आहेत. तिथे सर्वाना निमंत्रण आहे. पण आमची बाह्य़ जगाची भुलावण संपत नाही अन् आम्हाला ती उघडी महाद्वारंही बंद वाटतात. मयसभेत दुर्योधनाला वाटली तशी. मग आपण आत शिरणार कसे अन् तिथला ‘स्वरूप’-सोहळा भोगणार कसे! आम्ही दर्शनाला जाणार ते मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून, परमार्थासाठी नव्हे!’’(अनंत निवासातील ‘अनंत’ आठवणी).
७०. निकट तरी दूर!
माझ्या मर्जीशिवाय मला कोण आत टाकणार, हा अब्दुल रहमान यांचा सवाल फार मार्मिक आहे. सद्गुरू अंतरंगातच असतात, पण अंतरंग त्यांनीच व्याप्त आहे, ही आपली जाणीव मात्र लोपली असते
First published on: 10-04-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan 70 though close so far