प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेलं कर्म कोणतं आणि आपण आपल्या ओढीतून करू इच्छित असलेलं कर्म कोणतं, हे आपल्याला उमगत नाही. त्यामुळे देहबुद्धीनुरूपच कर्म करण्याकडे आपला ओढा असतो आणि अगदी सत्त्वगुणी माणूसही त्याच्या सत्त्वगुणप्रेरित देहबुद्धीनुसारच निर्णय करीत असतो. केवळ सद्गुरूच नेमकं काय करावं आणि काय केल्यानं माझं हित आहे, हे जाणतात, याचा उल्लेख गेल्या वेळी झाला. या गोष्टीचा प्रत्यय देणारी एक आठवण ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ या पुस्तकात प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितली आहे. ते म्हणतात- ‘‘मे १९७१मध्ये स्वामींनी प्रमोदला आपल्याकडे खेचून घेतले. श्रीस्वामींच्या सहवासात प्रमोद प्रथम आला तेव्हा तो १९ वर्षांचा होता.. मे १९७१च्या वास्तव्यात प्रमोदला वाटले की आता येथेच श्रीस्वामींच्या सान्निध्यात कायमचे राहावे. नुकतीच बी.एस्सी.ची परीक्षा संपली होती. अजून निकाल लागायचा होता. प्रमोदने आपला मनोदय अंगणात सहज प्रगट केला. तेव्हा अनंतराव (देसाई) थट्टेने म्हणाले, ‘काळजी करू नकोस. तुला इथे राहता येईल. इथे काही गाई-म्हशी आहेत. त्यांची राखण कर म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न सुटेल!’ बाबा (देसाई) आणि इतर सारेच या विनोदात सहभागी झाले. पण प्रमोदचा मानस खरोखरच राहण्याचा आहे असे पाहून विजयराव (देसाई) म्हणाले, ‘तुझी इच्छा असेल तर पावसच्या शाळेत विज्ञान शिक्षकाची नोकरी मिळू शकेल.’ काही वेळाने श्रीस्वामींच्या खोलीत गेल्यावर स्वामी प्रमोदला म्हणाले, ‘पुढे शिकणे चांगले. खूप शिका.’ त्या सहज उच्चारलेल्या आशीर्वचनाचा परिणाम म्हणजे प्रमोदला बी.एस्सी.ला डिस्टिंक्शन मिळाली व तो वनस्पतिशास्त्रात प्रथमही आला. कोल्हापूर, बेळगावव्यतिरिक्त जग माहीत नसलेला प्रमोद पुढे पुण्याला आला आणि यथावकाश वयाच्या २५व्या वर्षी एम.एस्सी., पीएच.डी. पदवी प्राप्त करून कालांतराने अल्जेरियातील कॉन्स्टन्टाइन विद्यापीठात प्राध्यापक झाला. घनकचरा व्यवस्थापन, पशुसंगोपन या विषयातला देशातील एक मान्यताप्राप्त संशोधक म्हणून त्याचा लौकिक आहे. तात्पर्य म्हणजे एका छोटय़ा खेडय़ातील शाळेत ‘मास्तर’ होऊ घातलेला जीव श्रीसद्गुरूंच्या आशीर्वादात्मक शब्दांच्या प्रभावाने कोठल्या कोठे पोहोचतो, हे लक्षात यावे.’’(पृ. १६९, १७०). हा प्रसंग या सदरात मांडण्यातून, सद्गुरूंच्या कृपेनं भौतिकात प्रगती होते, असं बिंबवण्याचा जराही हेतू नाही. जीवनाचा प्रवाह ठरल्यानुरूपच वाहत असतो. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत यश मिळवून देणारे आपले प्रयत्न आपल्याला कितीही वेगळे वाटले आणि त्यातून कर्तेपणाचा अहंकार जरी चिकटत असला तरी तेही याच प्रवाहाचा भाग असतात. आपल्या भौतिक प्रगतीत सद्गुरूंना रस नसतो, पण भौतिकातील प्रगती किंवा अधोगती आध्यात्मिक वाटचालीच्या आड येणार नाही, एवढं ते पाहतात. मला माझ्या जीवनाच्या प्रवाहाचा पुढील ओघ माहीत नसतो म्हणून काय करावं, हे उमगत नाही आणि कित्येकदा मी करू नये तेही करून बसतो. तो ओघ सद्गुरू जाणतात म्हणून नेमकं काय करावं, हे ते सांगून पाहतात.
८०. प्रवाह ओघ
प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेलं कर्म कोणतं आणि आपण आपल्या ओढीतून करू इच्छित असलेलं कर्म कोणतं, हे आपल्याला उमगत नाही. त्यामुळे देहबुद्धीनुरूपच कर्म करण्याकडे आपला ओढा असतो
First published on: 24-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan 80 wave