देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे! आज ठाकून आलेलं कर्म हे प्रारब्धातून निपजलं आहे आणि आपलं समस्त जीवनच कर्ममय आहे. याचाच अर्थ ‘देखें जेतुलालें कर्म निपजे’ म्हणजे आपलं पूर्ण जगणंच! त्या जगण्याचं काय करायचं? ‘तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे’ ते आदिपुरुषाला, सद्गुरूंना समर्पित करायचं. श्रीसद्गुरू जीवनात आलेले जोवर उमगत नाहीत, त्यांनाच जीवनात सर्वोच्च मूल्य दिलं गेलेलं नाही, सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं नाही; तोवर साधकाचं जगणं कोणाला अर्पित असतं? ते देहबुद्धीतून प्रसवलेल्या आणि तिच्यावरच जोपासल्या गेलेल्या ‘मी’लाच अर्पित असतं. त्यामुळे प्रत्येक कर्माकडे पाहण्याचा त्याचा स्वत:चा असा दृष्टिकोन असतो. त्यात आवड-निवड असते. भेद असतो. ही आवड आणि निवड कशातून उपजते? ती देहबुद्धीतूनच उपजते. त्यामुळे काही कर्माची साधकाला गोडी असते तर काही कर्माची नावड असते. ज्या कर्माची गोडी असते ती खऱ्या अर्थानं हितकारक असतातच असं नाही. ज्यांची नावड असते ती खरी हिताचीही असू शकतात. जे हिताचं ते श्रेय आहे. जे अहिताचं असून हवंसं वाटतं ते प्रेय आहे. श्रेयाला नाकारून प्रेयाच्या ओढीनंच जगण्यात आजवर अनंत जन्म खर्ची पडले. श्रीसद्गुरू जीवनात आल्यानंच श्रेयाची जाणीव झाली. भ्रामक देहबुद्धीच्या ओढीनं जगत असल्यानं आपलं जीवन दु:खानं भरलं आहे, याची जाणीव झाली. श्रीसद्गुरू जीवनात आल्यानं आणि जगणं त्यांनाच समर्पित झाल्यानं त्या जीवनात आनंद विलसू लागला. जगणं तेच, परिस्थिती तीच, जगण्याची स्थूल चौकट तीच, पण केवळ मनोधारणेत बदल झाल्यानं त्याच जगण्यात आनंद आला, निश्िंचती आली, सहजता आली. आधी भौतिकाचा हव्यास होता, म्हणून जे आहे तेही अपुरंच वाटायचं. त्यामुळे जीवनातली अतृप्ती कधी संपलीच नाही. श्रीसद्गुरूंमुळे परमतत्त्वाच्या ध्यासाचा मनाला स्पर्श झाला त्यामुळे जे आहे तेही पुरेसं वाटू लागलं. त्यामुळे जीवनात वेगळीच तृप्ती विलसू लागली. जो सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे, अशा प्रत्येक साधकाचा हा अनुभव असेल. सद्गुरू एका गावी जात तेव्हा ज्या साधकाकडे उतरत त्या घराचं छत पत्र्याचं होतं. जे काही साधक जमत त्यांची आर्थिक परिस्थितीही फार उत्तम होती अशातला भाग नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत पत्रा तापून खोली भाजून निघे तर पावसाळ्यात आत ठिकठिकाणी थेंब-थेंब ‘अभिषेक’ही होत असे. तरी अशा घरात ३०-४० साधक जमत. दिवसभर सहज सत्संग चाले. खाणं-पिणं होई. रात्रही सत्संगात सरत असे. मग चार-दोन श्रीमंत साधकही येऊ लागले, पण त्या तशाच घरात आणि तशाच परिस्थितीत सर्व जण एकोप्यानं रहात. थोडक्यात सर्व जगणं जेव्हा सद्गुरू समर्पित होईल तेव्हाच सर्व मानसिक भेद कमी होतील आणि एका आनंदात निमग्न होता येईल. पावसेत देसायांच्या घरी स्वामी असताना कुठून कुठून लोक जमत. प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक, वैचारिक, भावनिक स्थितीही भिन्न भिन्न असे, पण केवळ एकाच्याच आधारामुळे सहज एकवाक्यता निर्माण होत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा