माणसाचं समस्त जीवन कर्ममय आहे. कर्माशिवाय जीवनातला एक क्षणही सरत नाही. या कर्मामध्ये देहधारणेच्या अनुषंगानं जी र्कम अंगवळणी पडतात त्यांना आपण कर्म म्हणूनही लक्षात घेत नाही, इतकी ती सहजकर्म असतात. उदाहरणार्थ ‘चालणं’ हे कर्म आहे. लहान मूल जेव्हा पहिली पावलं टाकतं तेव्हा मोठय़ांना कौतुक वाटतं पण नंतर वय वाढत जातं तसतसं ते मूल सहज चालू लागतं. लहान मुलाच्या चालण्याकडे कौतुकानं पाहणारे लोक ते मूल मोठं झालं की त्याच्या चालण्याकडे कौतुकानं पाहत नाहीत इतकं ते कर्म स्वाभाविक ठरतं. तेव्हा आपल्याकडून होणारी अशी अनेक सहजर्कम आहेत. त्यापलीकडे कर्माचे दोन प्रकार आहेत. एक उचित कर्म आणि दुसरा अनुचित कर्म. आता या कर्माचा उगम आपल्या मनोधारणेत कसा आहे, ते नंतर पाहू. स्थूलमानानं पाहता माणसाची सहजप्रवृत्ती अनुचित कर्माकडेच असते, उचित कर्माकडे सहसा नसते. म्हणजे खाणं देहधारणेसाठी उचित आहे, पण जिभेच्या चोचल्यांपायी माणूस इतकं खातो आणि इतक्या तऱ्हेचं खातो की ते खाण्याचं कर्म त्या देहालाच बाधक ठरू लागतं. आपल्या आंतरिक ओढीनं माणूस इंद्रियांचा आत्यंतिक गैरवापर करून, व्यसनाधीन होऊन देहालाच बाधा पोहोचवतो. व्यसन काही केवळ मद्य वा धूम्रपानासारखेच नसते. खाण्याचं व्यसन, बोलण्याचं व्यसन, परनिंदेचं व्यसन अशी अनेक लक्षात न येणारी व्यसनंही माणसाला जडली असतात. आता ही झाली सूक्ष्म कर्माची गोष्ट. स्थूल कर्मातही उचित आणि अनुचित र्कम असतात आणि त्यातही उचित कर्माबाबत आवश्यक ते कष्ट उपसण्याची मानसिक इच्छा  व चिकाटी प्रत्येकात असतेच, असंही नाही. तरीही माणसानं जाणीवपूर्वक उचित र्कमच केली पाहिजेत.  आता माणसाची जशी मनोधारणा असते त्यानुरूप र्कम करावंसं त्याला वाटतं. आंतरिक ओढीला अनुरूप अशी र्कमच तो करू पाहतो. ही ओढ त्याच्या आंतरिक इच्छेतून उत्पन्न होते. माणसाची वासनात्मक जडणघडण जशी असेल तशा कर्माकडेच त्याचा स्वाभाविक ओढा असतो. इथे वासना म्हणजे इच्छाच. जर मनात शुभ वासना असतील तर शुभ कर्मे होतील आणि अशुभ वासना असतील तर अशुभ कर्मे होतील. ‘रामगीते’त प्रभू हनुमानजींना सांगतात की, ‘‘माणसाच्या अंतरंगातील वासनारूपी नदी ही शुभ आणि अशुभ या दोन मार्गानी वाहत आहे. तिला शुभ मार्गानेच वळविण्याचा पुरुषार्थ मनुष्यानं केला पाहिजे. कारण मनाचा स्वभावच असा आहे की, अशुभ मार्गातून हटल्याशिवाय ते शुभ मार्गाकडे वळतच नाही. त्याचप्रमाणे शुभ मार्गापासून ते दूर झालं तर अशुभ मार्गाकडे गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे चित्तरूपी मुलाला लाडीगोडी लावून शुभ मार्गाकडेच वळवत राहिलं पाहिजे. प्रदीर्घ अभ्यासानंतर या दोन्ही वासना क्षीण होतील तेव्हाच परिपक्वता येईल. पण अंतरंगात क्षीण वासनातरंग असला तरी हे कपिश्वर, तू वारंवार चित्त शुभ वासनांकडेच वळव. शुभ वासनांची वृद्धी झाली तर त्यात दोष नाही.’’ अर्थात, अशुभ वासनांत वाढ झाली तर अशुभ कर्मात स्वाभाविक वाढ होईल, असंच प्रभूंना सांगायचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा