बेळगावच्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना तरुण वयातले बाबूराव देसाई थोडं रागानं बोलले आणि मग त्यांच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला. एका बडय़ा सरकारी अधिकाऱ्याला आपण जरा जास्तच बोललो, शिवाय पुस्तकांचे पैसेही घेतले नाहीत! कारण स्वामी आपलीच पुस्तकं विकत घेऊन मगच कुणाला भेट द्यायची तर देतात. म्हणजे एवढा सगळा व्यवहार ते काटेकोरपणे करीत असताना (१९६३-६४च्या काळातले) तब्बल ३७ रुपये आपण नाकारले, हे जरा कक्षेबाहेरचंच झालं, असं त्यांना वाटलं. बाबूराव लिहितात : या घटनेमुळे जे घडलं ते अद्भुतच होतं. ते गृहस्थ गेल्यानंतर मी खोलीत गेलो आणि अपराधी चेहऱ्यानं घडलेला प्रकार नि चूक अप्पांना सांगितली. त्यावर ते दुसरं काही न म्हणता पाठीवर हात ठेवून शाबासकी देत म्हणाले, ‘‘बरोबरच आहे. पुस्तकं ही वाचण्यासाठीच असतात! ते आता सगळी पुस्तकं वाचतील नि परत येतील.’’ झालंही तसंच! या वेळी मात्र त्यांचा साहेबी पारा कुठल्या कुठे गेला होता. त्यांनी अत्यंत नम्रतेनं खोलीत प्रवेश केला आणि अत्यंत अदबीनं नमस्कार केला. आपण गेल्या वेळी काय बोललो होतो, या जाणिवेनं ते ओशाळलेले दिसत होते. नंतर बरीच वर्षे ते येत राहिले. म्हणजे मी त्यांना पहिल्या भेटीत जे बोललो होतो, ते योग्यच होते नि त्यावर खुद्द अप्पांकडून मला शाबासकीही मिळाली होती. केवळ व्यवहारासाठी व्यवहार म्हणून करायचा नसतो. व्यवहाराचं उद्दिष्ट असतं त्यातून परमार्थ साध्य करणं! साध्यच महत्त्वाचं असतं. साध्याचं महत्त्व अशा प्रसंगीच लक्षात ठेवायचं असतं. (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ८७). तेव्हा गेल्या भागातली बादल्यांची आठवण असो की ही, दोन्ही गोष्टींतून खूप काही शिकण्यासारखं आहे. जे साधनपथावर नाहीत, त्यांची गोष्ट सोडून द्या. आपण स्वत:ला साधक म्हणवतो, पण व्यवहार करतो तेव्हा साधक जीवनाचं जे खरं साध्य त्या आध्यात्मिक ध्येयाचा आपल्याला पुरता विसर पडतो आणि व्यवहारात आपण गुंतून जातो. आध्यात्मिक ध्येयासाठीच्या प्रयत्नांत मात्र आपण असे गुंतत नाही आणि त्या क्षणीदेखील व्यवहारही विसरत नाही! लोककल्याणाच्या नावावर धार्मिक संस्था निघतात, पण त्यांच्या मालमत्तेचा वापर त्या काढणारेच करताना आपण पाहतो तेव्हा स्वामींच्या काटेकोर विचारामागची दिव्यता लक्षात येते. लहानसहान गोष्टींतही विचारांची हीच शुद्धता होती. चिपळूणचे हरिदास पटवर्धन यांनी अनेक उपवास धरले होते. त्याचा त्यांना त्रास होऊ लागला, पण नेमका कोणता उपवास धरावा आणि कोणता सोडावा, हे कळेना. अखेर स्वामींना विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘उपवास म्हणजे उप+वास. म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे. जप, वाचन करणे. तो उपवास होईल. देव भावाचा भुकेला असतो.’’ (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ५२). तेव्हा धर्माचरण असो की व्यावहारिक आचरण असो; त्या आचरणामागचा हेतू काय असला पाहिजे, त्या आचरणाचं ध्येय काय असलं पाहिजे, हे स्वामींसारख्या सद्गुरूंकडूनच उमगतं. त्यांच्या जीवनातून त्याचा वस्तुपाठ मिळतो.
१६०. वस्तुपाठ-४
बेळगावच्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना तरुण वयातले बाबूराव देसाई थोडं रागानं बोलले आणि मग त्यांच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला.
First published on: 15-08-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan actual lesson