विकारांची स्थिती आपण पाहिली, मग ते ज्या ‘देहा’च्या आधारावर मी भोगतो, त्या देहाची स्थिती काय आहे? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५७ आणि ५८व्या ओवीत ते सांगितलं आहे. या ओव्यांचा प्रचलित अर्थ आपण पाहिला आहेच. हा देह कसा घडला आहे? तो पंचमहाभूतांपासून घडला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जडद्रव्य, जलद्रव्य, उष्णता, श्वासउच्छ्वासासहित विविध वायूतत्त्व आणि अंतर्गत देहरचनेतील अवकाश अशा रीतीने हा देह साकारला आहे. हा देह कर्माच्या दोऱ्यानं गुंफला आहे. प्रत्येकाच्या ललाटी कर्मरेखा आहे ना? प्रारब्धानुसार आपल्या वाटय़ाला र्कम आली आहेत आणि जन्ममृत्यूच्या चाकावर हा देह घातला आहे. म्हणजेच आपल्या जगण्याचा कालावधी निश्चित आहे. आपल्या जगण्याला काळाची किती मर्यादा आहे? ५८वी ओवी सांगते की, माशीला पंख फडफडावयास जितका क्षणार्धही पुरतो किंवा आगीत फेकलेल्या लोण्याच्या गोळ्याला वितळायला जेवढा क्षणार्ध पुरतो तितक्या वेगानं हे आयुष्य सरत आहे. मग या एवढय़ा कालावधीत प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेली र्कमही पार पाडायची आहेत, नवे प्रारब्ध निर्माण होऊ नये यासाठी सद्गुरूबोधानुरूप फळाची आसक्ती सोडून कर्म करायची आहेत आणि त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठीच या देहाचा आणि त्यातच असलेल्या मन, चित्त, बुद्धीचा वापर करायचा आहे. कारण याच अशाश्वत देहात शाश्वत आत्मतत्त्व आहे! त्या आत्मतत्त्वाचा शोध घ्यायचा आहे. तो शोध केवळ सद्गुरूंच्याच आधारावर साधेल. कारण त्यांच्या जीवनात ही आत्मस्वरूपस्थ स्थिती पदोपदी दिसते. हे सद्गुरूस्वरूप कसं आहे, ते परमात्म्याहून कसं अभिन्न आहे, हे स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ६० ते ७१ या ओव्यांत सांगितलं आहे. आता एक अडचण अशी की आणखी २९ भागांत ‘नित्यपाठा’तील उरलेल्या ५० ओव्यांचं चिंतन साधायचं आहे. त्यामुळे हे विवरण थोडं वेगानं आणि संक्षेपानं करावं लागणार आहे. त्यामुळे काही ओव्यांचा प्रचलितार्थ न सांगता एकदम विवरण करावं लागणार आहे. असो. तर ६० आणि ६१ या दोन ओव्या काय सांगतात? ‘‘सकळ ना निष्कळु। अक्रिय ना क्रियाशिळु। कृश ना स्थूळु। निर्गुणपणें।। ६०।।’’ (ज्ञानेश्वरी अ. १३, ओ. ११०७). निर्गुणाच्या अंगानं विचार करता सद्गुरू चराचरात आहेत, सारं काही तेच आहेत आणि ते कशातच नाहीत! (सकळ ना निष्कळु) त्यांचं म्हणून काही कर्म आहे आणि त्यात ते गुंतले आहेत, असं नाही पण जिवांना स्वरूपाकडे वळवण्याचं या सृष्टीतलं सर्वात विराट कार्य त्यांच्याशिवाय कोणीच करीत नाही, म्हणून खरे कर्ते तेच आहेत! (अक्रिय ना क्रियाशिळु) बाह्य़ रूपावरून ते कसेही असोत (कृश ना स्थूळु) जसे ते ‘दिसत’ आहेत तसेच ते आहेत, असं नव्हे! सद््गुरूंच्या रूपांत भेद असेल स्वरूपदृष्टय़ा ते एकच आहेत! (निर्गुणपणे). तेव्हा ही ६०वी ओवी देहात असूनही विदेही अशा सद्गुरूंच्या निर्गुण तत्त्वाचा बोध करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा