अग्नीतून धूर निघतो, पण आग धूर नसते, तसं विकारांनी मी ग्रस्त असतो, माझ्यात विकार असतात, पण विकार हे माझं स्वरूप नाही. म्हणूनच विकार येतात आणि जातात, पण तरी ते उत्पन्न होताच असा प्रभाव टाकतात की आपण विकारवश होऊन त्यांच्यामागे वाहवत जातो. साईबाबा तर सांगतात, ‘‘सत्त्वादि त्रिगुण त्रिप्रकारें। शब्दादि विषय नाना विकारें। उपस्थ आणि जिव्हाद्वारें। ब्रह्मादि सारे ठकियेले।।’’ सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांत माणसापासून ब्रह्मादि देवदेवतांपर्यंत सर्व सृष्टी आबद्ध आहे. रजोगुणाच्या आधारावर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, सत्त्वगुणाच्या आधारावर विष्णू तिचं पालन करतात आणि तमोगुणाच्या आधारावर भगवान शंकर तिचा विनाश घडवितात. त्याचप्रमाणे शब्द, रूप, रस, स्पर्श आणि गंध या पाच विषयांतून नाना विकार उत्पन्न होतात आणि उपस्थ म्हणजे लैंगिक वासनापूर्तीची ओढ आणि जिव्हाद्वार म्हणजे भौतिक वासनापूर्तीची खा-खा या दोन प्रधान वासना-विकारांच्या जाळ्यात समस्त चराचर आबद्ध होतं. साईबाबा म्हणतात, ‘‘शब्द-स्पर्श-रूपादि विषय। येणें मागें लागल्या इंद्रिय। होईल व्यर्थ शक्तिक्षय। पतनभय पदोपदीं।।’’ (साईसच्चरित्र, अ. ३९, ओवी ८८). विकार आणि वासनांच्या पूर्तीची ओढ एकदा इंद्रियांना लागली की शक्तीचा अपव्यय होतो आणि कसंही करून ही पूर्ती झालीच पाहिजे, या भावनेनं शक्तीक्षयाची फिकीर न बाळगता माणूस धडपडू लागतो तेव्हा त्याचं अध:पतन होत जातं! अनेक संतांप्रमाणेच साईबाबाही सांगतात की, नादाला अर्थात शब्दाला भुलून हरिण जाळ्यात अडकतं, ‘स्पर्शा’ला भुलून हत्तीला अंकुशाचा मार सोसावा लागतो, ‘रूपा’ने आकर्षित होऊन दिव्यावर झेपावल्याने पतंगाला प्राण गमवावा लागतो, ‘रसा’च्या चटकेमुळे मासा गळाला अडकतो आणि ‘गंधा’च्या ओढीनं भुंगा कमळात बद्ध होतो. प्रत्येक प्राणी एकेका विषयामुळे बद्ध होतो, मग माणसात तर हे पाचही विषय आहेत! ‘‘हीं तों स्थावर चलचर पंखी। ययांची दु:स्थिती देखोदेखी। ज्ञाते मानवही विषयोन्मुखी। अज्ञान आणखी तें काय।।’’ (सच्चरित्र, अ. ३९/ ९३). हे अज्ञान निवारण्यासाठीच भगवंत सांगतात, हे विकार तुला ओढत असले, या विकारांचे तरंग तुझ्यातून उत्पन्न होत असले तरी तू म्हणजे विकार नव्हेस! तुझ्यावर विकारांचा ताबा नसावा, विकारांवर तुझा ताबा असावा. याची सुरुवात अशी की विकाराचा तरंग मनात उत्पन्न झाला तरी त्यामागे वाहवत जाणं प्रयत्नपूर्वक थांबवणं! प्रत्येक वेळी हे साधणार नाही. अनेकदा विकारवश होऊन वर्तन घडून गेल्यावर ही जाणीव होईल आणि वाईट वाटेल. तरी हरकत नाही. पुढच्या प्रसंगात ही जाणीव आधीच जागी करण्याचा प्रयत्न केला तर सांभाळता येईल. विकारांच्या मागे गेल्यानं माझा वेळ, शक्ती वाया जाते व प्रारब्धाचा गुंता अधिकच वाढतो, हे लक्षात आलं तर अकारण वाहणं थोपवता येईल आणि गरज तिथे विकार भोगताही येतील. ‘क्रोध’ हा विकारच असला तरी मुलाच्या हितासाठी आईला क्रोधित व्हावंच लागतं ना? तर प्रपंचात आवश्यक तिथे विकारांची साथ घ्यावी, आपली मात्र त्यांना साथ असू नये!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा