आपणासारिखे करिती तात्काळ! सत्पुरुषाच्या चित्तात जसा भोगेच्छा व ती ज्यातून उत्पन्न होते तो संकल्प यांचा पूर्ण अभाव असतो तसेच आत्मज्ञानाचा अग्नी तिथे सतत प्रज्ज्वलित असतो. त्यामुळे त्यांची सर्व कर्मेही आत्मस्थितीला अनुरूप होतात, संकुचित ‘स्व’चा तिथे त्याग असतो त्यामुळे ती कर्मे परमेश्वराच्या इच्छेने, व्यापक व सहजतेने होतात. जड देहबुद्धीत अडकलेल्या जिवाला ते याच स्थितीत घेऊन जातात. त्यामुळे ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ असं हे त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं व्यापकच आहे. आता या ओव्यांबाबतची आणखी एक विशेष गोष्ट पाहू. ज्याची अशी आंतरिक स्थिती आहे त्याला गीतेतल्या मूळ श्लोकात ‘पण्डित’ असं म्हटलं आहे. तो श्लोक असा- ‘‘यस्य सर्वे समारम्भा: कामसङ्कल्पवर्जिता:। ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा:।।’’ इथे ‘तम् आहु: पण्डितम् बुधा:’ या शब्दांचा प्रचलित अर्थ, ‘त्याला ज्ञानीजन पण्डित म्हणतात’, असा आहे. माउली तर त्याला साक्षात् ‘तो ब्रह्मचि मनुष्यवेखें’ म्हणतात! माउलींचाच अर्थ किती स्पष्ट आहे, हे गीताच नवव्या अध्यायातील एका श्लोकात सांगते. ‘अवजानन्ति मां मूढा मानुषींतनुमाश्रितम्’ म्हणजे ‘मनुष्य वेशात मी प्रकटतो तेव्हा मूढ लोक मला जाणत नाहीत.’ आता ‘बुधा:’ म्हणजे ‘ज्ञानी’ असेल तर ते ‘मूढ’ कसे? तर ‘बुधा:’ शब्दाचा अर्थ ‘बुद्धी असलेले’ असा घेतला पाहिजे, ज्ञानी नव्हे! मनुष्यवेशात प्रकटलेल्या या परब्रह्माला अर्थात सद्गुरूला स्थूल बुद्धी असलेले लोक ‘पण्डित’ मानतात! म्हणून त्याच्या खऱ्या व्यापक कार्याबद्दल आणि जीवनहेतूबद्दल ते अनभिज्ञच असतात. आपणही सद्गुरूंना एका मर्यादेतच जाणतो. स्वामींच्या सहजसाध्या वावरण्यामागील विराट रहस्य आपल्याला जाणवते का? त्यांनाही आपण एका सीमेतच बद्ध केलं आहे. आजच्या दिवशी हे सीमोल्लंघन आपण करणार का? श्रीसद्गुरू ‘ध्येयसूत्रिका’ या ग्रंथात म्हणतात, ‘‘..अभी तक जो समझा ओ सीमाही समझा। ए सीमा समझना समझना नहीं है।।’’ आजवर देहबुद्धीच्या जोरावर जे काही जाणलं ते सीमीतच होतं. सीमीत जाणणं हे खरं जाणणंच नाही! हे विचारांचं, भावनांचं, कृतीचं सीमोल्लंघन आज साधलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ होईल, नाही का? असो. तर देहबुद्धीचे जाणते लोक ज्याला पण्डित मानतात तो हा प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप सद्गुरूच आहे. या ओव्यांचा स्वामी स्वरूपानंद यांनी जो अभंगानुवाद केला आहे त्यातही हाच अर्थ आहे. त्या ओव्या अशा- ‘‘ज्याच्या ठायीं नाहीं। कर्माचा विषाद। तरी फलास्वाद। नसे चित्तीं।। पार्था आणिक हें। कर्म मी करीन। किंवा संपवीन। आरंभिलें।। येणे संकल्पें हि। जयाचें गा मन। विटाळे ना जाण। लेशमात्र।। सर्व हि कर्माची। जेणें ऐशा रीती। टाकिली आहुती। ज्ञानाग्नींत।। मानवाच्या रूपें। आकारलें जाण। तें चि पार्था पूर्ण। परब्रह्म।।’’ तर असे हे सद्गुरू. त्यांच्यात कर्म करण्याचा आग्रह नाही की कर्म टाळण्याचा आग्रह नाही. कर्माची ओढ नाही तरी कर्म अचूकतेनं ते करतात. तरी आपण सत्पुरुषाकडून एका कर्माची अपेक्षा नेमानं करतो, ते कर्म म्हणजे चमत्कार!
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा