स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा। अंकित होईन सज्जनांचा। म्हणे तो मुमुक्षु।। आजवर प्रपंचाचा स्वार्थ होता. आता परमार्थाचा हव्यास उत्पन्न झाला आहे. सज्जनांची ओढ लागली आहे. हा मुमुक्षु आहे! आधी बद्ध होता, तेव्हा जीवनातील दु:खं पोळत होती, ती दूर व्हावीत असंही वाटत होतं पण त्या दु:खांचं मूळ कुठं आहे ते कळत नव्हतं. समोरचं दु:खच उग्रपणानं जाणवत होतं. ते दूर झालं तर आपण आनंदी होऊ, हे अत्यंत खरेपणानं वाटत होतं. अखेर कारणापुरता आनंद कारण असेपर्यंतच टिकतो आणि काळजीचं एक कारण दूर झालं तरी काळजी दूर होत नाही, हे वास्तव कळू लागलं की मग दु:खनिवृत्तीचा खरा उपाय मन शोधू लागतं. खरं परमसुख शोधू लागतं. संतच ते सुख देऊ शकतात, या जाणिवेनं त्यांच्या सत्संगासाठी मन तळमळू लागतं. हा झाला मुमुक्षु. संतसत्पुरुषांकडे तो जातो ते मनाला कायमची निश्चिंती लाभावी, निर्भयता लाभावी, यासाठी. या सत्संगानंच आत्मज्ञानाची ओढ लागते, पण ते ध्येय मनात पक्केपणानं रुजलं मात्र नसतं. ते रुजण्यासाठी आत्मज्ञानी संतांचा वारंवारचा सहवास आवश्यक असतो. पू. बाबा बेलसरे सांगतात, ‘‘सत्संगतीने प्रथम आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते. नंतर ते ध्येय गाठण्याचा मार्ग निश्चितपणे समजतो. त्या मार्गात राहाण्याचा अभ्यास जो करतो त्याला साधक म्हणतात. साधकाने संतांपाशी अनुसंधानाची विद्या शिकावयाची असते. ‘मी देहच आहे’ या भावनेत राहाणारा साधक ‘मी आत्माच आहे’ या भावनेत राहाण्याचा अभ्यास करू लागतो. देहाचे अनुसंधान बाजूस सारून आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवायची युक्ती साधणे हे साधकाच्या साऱ्या साधनेचे मर्म समजावे. ही युक्ती वश होण्यास पूर्वीच्या आवडीनिवडी, आचारविचार बदलून नवीन स्वस्वरूपानुकूल आवडीनिवडी व आचारविचार अंगी आणावे लागतात. देहावर व दृश्यावर सहजपणे राहाणारे मन सतत अभ्यासाने आत्म्यापाशी किंवा स्वस्वरूपापाशी ठेवण्यास अखंड धारणा धरावी लागते. इंद्रियांमध्ये पसरलेले मन एकवटून किंवा गोळा करून त्याला हृदयकमलात घट्ट धरून ठेवण्याचा नित्य प्रयत्न केला की धारणा साधते. ज्याला धारणा साधली तो साधक होय.’’ बद्ध, मुमुक्षु आणि साधक हा अनुक्रम वेगानं पार पाडण्यासाठी देहबुद्धीला आत्मबुद्धी करावं लागतं. त्याची सुरुवात ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव वाढवण्यापासून असते. आपल्याला क्षणोक्षणी स्वत:चं सहज भान असतं. त्या जागी ईश्वराचं भान राखायला संत सांगतात. बद्ध स्थितीत आपल्याला ईश्वर कोण, ते माहीत नाही. मग त्याचं भान कसं बाळगायचं? तर सुरुवातीला ती कसरत वाटेल. अट्टहास वाटेल. नीरस कृती वाटेल. तरी अट्टहासानं ईश्वराच्या भजनाकडे मनाला वळवलं पाहिजे. स्वत:चं अंतर्मन तपासत राहिलं पाहिजे. संयमानं, विचारानं, प्रयत्नांनी, चिकाटीनं आणि धैर्यानं आपल्या मनाला प्रेयावरून श्रेयाकडे वळवत राहिलं पाहिजे. बद्ध, मुमुक्षु आणि साधक स्थितीतील माणसाचा हाच नित्य अभ्यास आहे! स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील दोन ओव्या हेच सांगतात.
१०७. साधक
स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा। अंकित होईन सज्जनांचा। म्हणे तो मुमुक्षु।। आजवर प्रपंचाचा स्वार्थ होता.
First published on: 02-06-2014 at 03:41 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan devotee