माउली म्हणतात, देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। नित्यपाठ १६।। (अ. २/ २७१). या ओवीचा प्रचलित अर्थ आपण पाहिला की, ‘‘जेवढे म्हणून कर्म हातून होईल, तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पित केले, तर ते सहजच परिपूर्ण झाले, असे समज.’’ आता या ओवीचा आणखी खोलात विचार करू.  आपलं आजचं जीवन कसं आहे? ते कर्ममय आहे. या कर्माचं मूळ कशात आहे? ते प्रारब्धात आहे. ते प्रारब्ध कशानं निर्माण झालं? आपण मागेच पाहिलं की कर्माचा नियमच असा आहे की प्रत्येक बऱ्या-वाईट कर्माचं बरं-वाईट फळ मला भोगावंच लागतं. खाणं-पिणं, झोपणं, आदी क्रियमाण कर्माचं फळ तात्काळ मिळतं. म्हणजे, खाल्ल्यावर भूक भागते, पाणी प्यायल्यावर तहान भागते, झोपल्यावर शरीराला आराम मिळतो. प्रत्येक कर्माचं फळ असं तात्काळ मिळत नाही. काही कर्माचं फळ मिळण्यासाठी काळ आणि परिस्थितीची अनुकूलताही लागते. सनातन तत्त्वज्ञान सांगतं की, कित्येकदा एका जन्मातील बऱ्या-वाईट कर्माचं बरं-वाईट फळ पुढील काही जन्मांत त्या फळासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की वाटय़ाला येतं. जे फळ वाटय़ाला आलं आहे त्याचं कारण नव्या जन्मात मात्र मला उमगत नाही. जसं फळ माझ्या वाटय़ाला येतं त्याचप्रमाणे एखाद्या कर्माची माझ्या मनातली सुप्त इच्छाही फलद्रूप होते. समजा आज मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि माझ्या मनात आलं की एखाद्या अधिकाऱ्यासारखा आपला रुबाब असावा, आपण अधिकारी व्हावं. हा संकल्प वाया जात नाही. पण मी अधिकारी होऊ शकेन, अशा जन्मापर्यंत तो संकल्प वाट पाहत असतो. त्यामुळेच आज मी जे जगत आहे, आज माझी जी सामाजिक-आर्थिक परिस्थिती आहे आणि माझ्या जीवनात जे चढउतार आहेत ते सारं काही प्रारब्धानुसार माझ्या वाटय़ाला आलं आहे. अर्थात माझ्या वाटय़ाला जे र्कम आलं आहे तेदेखील प्रारब्धानुसारच निर्माण झालं आहे. म्हणूनच माउली सांगतात, ‘देखें जेतुलालें कर्म निपजे’ यात ‘निपजे’ हा शब्द फार सूचक आहे. दोन गोष्टींच्या संयोगानं तिसरी गोष्ट उत्पन्न होते त्याला निपजणं म्हणतात. माझ्याकडून होणाऱ्या कर्मात जेव्हा आसक्ती कालवली जाते तेव्हा प्रारब्ध निपजतं! प्रारब्ध निर्माण होतं. तेव्हा माझं जे काही प्रारब्धकर्म आहे ते, ‘तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे’ ते सर्व आदिपुरुषाला अर्पण करावं. मग काय होतं? ‘तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।।’ मग ते प्रारब्ध शेष उरत नाही. त्याचा भोग उरत नाही. ते संपून जातं. इथे माउली ही कर्मे भगवंताला अर्पण करायला सांगत नाहीत तर आदिपुरुषाला अर्पण करायला सांगतात. आता हा ‘आदिपुरुष’ कोण हो? यासाठी या चिंतनाची सुरुवात जिथून झाली तिथे पुन्हा वळावं लागेल. ज्ञानेश्वरीत अगदी पहिल्या ओवीत या आदिपुरुषाचं स्मरण आहे.. ‘ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ आणि ज्ञानेश्वरीच्या पसायदानातही उल्लेख आहे, ‘किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकी। भजिजो आदिपुरुषीं। अखंडित।।’