स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ८० आणि ८१ या ओव्या आपण पाहिल्या. ८०व्या ओवीत सर्वत्र सद्गुरूंनाच पाहणं, मनानंही त्यांच्यापाशीच असणं आणि कृतीही त्यांच्याच इच्छेनुसार होणं, ही त्रिसूत्री सांगितली आहे. ‘तूं मन हें मीचि करीं। माझिया भजनीं प्रेम धरीं। सर्वत्र नमस्कारीं। मज एकातें।।’ ही सलोकता मुक्तीची स्थिती आहे! ही अवस्था पक्व झाली की मग ८१व्या ओवीनुसार, सद्गुरूंच्या इच्छेत आपली इच्छा मिसळली जाते. त्यांना हृदयात स्थान मिळते. मन, बुद्धी, चित्त त्यांच्या निकट राहू लागते. ‘माझेनि अनुसंधानें देख। संकल्पु जाळणें नि:शेख। मद्याजी चोख। याचि नांव।।’ ही समीपता मुक्ती आहे. आता ८२व्या ओवीत सरूपता आणि ८३व्या ओवीत सायुज्यता मुक्ती सांगितली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ओव्यांत स्वामींची स्थानमुद्राही आहे! समीपता पक्व होते तेव्हा सरूपता मुक्तीची स्थिती येऊ लागते. सरूपताचा अर्थ शिष्यही सद्गुरूंसारखाच बाह्य़त: होऊ लागणं, असा केला जातो, पण जोवर आंतरिक स्थिती त्यांच्यासारखी होत नाही तोवर बाह्य़ स्थिती तरी कशी होईल? म्हणूनच, सरूपता म्हणजे सद्गुरू जसे सतत स्वरूपस्थ असतात त्या आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाचं भान येणं. या स्थितीत भक्तात सद्गुरूंची लक्षणं बिंबू लागतात. अर्थात यात शिष्याचं कर्तृत्व काहीच नसतं, सद्गुरूच ती लक्षणं बिंबवू लागतात! गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य ब्रह्मानंदबुवा एकदा पेढे तयार करीत होते. हातात घेऊन पेढा दाबला की त्यावर ‘श्रीराम’ अशी अक्षरं क्षणभर उमटत असतं. त्यांचे पुतणे भीमराव गाडगुळी यांना या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. ब्रह्मानंदांच्या ते लक्षात आलं आणि ते लगेच म्हणाले, ‘‘अरे महाराजांनी मला अगदी त्यांच्यासारखं केलं आहे!’’ म्हणजे महाराज जसे रामनामानं पूर्ण भरून गेले होते, तसे ब्रह्मानंदबुवाही झाले. आता शिष्याला या सरूपतेची जाणीव होईलच, असंही नाही. बरेचदा ती तशी होतच नाही. माउलींनी दहाव्या अध्यायात म्हटलं आहे की, ‘‘अगा बाळका लेवविजे लेणें। तयाप्रमाणें तें काय जाणे। तो सोहळा भोगणें। जननीयेसी दृष्टी।।’’ (५८). म्हणजे आई मुलाला दागिन्यांनी सजवते, पण त्या दागिन्यांची अपूर्वाई किंवा त्या दागिन्यांचं मोल त्या बाळकाला कळतं थोडंच? आईच्या नजरेनंच तो सोहळा भोगला जात असतो! तशी सरूपतेची जाणीव शिष्याला नसतेच, सद्गुरूच त्यांनीच घडविलेला तो सोहळा पाहात असतात. ‘नित्यपाठा’तील ८२वी ओवी सांगते, ‘‘ऐसा मियां आथिला होसी। तेथ माझियाची स्वरूपा पावसी। हे अंत:करणींचें तुजपासीं। बोलिजत असें।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ९, ओवी ५१९). जेव्हा शिष्य पूर्णपणे त्यांचाच होतो, तेव्हा त्याला कुठली जाणीव उरणार? अनुसंधानाच्या ज्ञानाग्नीत सर्व संकल्प भस्मसात होतील तेव्हा तू मलाच समर्पित होशील, माझ्या स्वरूपाशीच जोडला जाशील, असं ही ओवी सांगते. माझ्या स्वरूपाचं दर्शन तुला पावसेत होईल, असंही जणू ही ओवी स्वामिभक्तांना सांगते! त्यासंबंधातली एका प्रसंगातून मोठा गूढ बोध स्वामींनी केला आहे. तो पाहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा