मन, चित्त आणि बुद्धी सद्गुरूचरणी एकवटणं सोपं नाही, पण त्यासाठीचा उपाय स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’ तील ८४ आणि ८५ या ओव्या सांगतात. या ओव्या अशा : अथवा हें चित्त। मनबुद्धीसहित। माझ्या हातीं अचुंबित। न शकसी देवों।। (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी १०४) तरी गा ऐसें करी। यया आठां पहारामाझारी। मोटकें निमिषभरी। देतु जाय।। (अ. १२, ओवी १०५). हे साधका, मन, चित्त, बुद्धी अचुंबित.. काय सुंदर शब्द आहे पाहा! तर अचुंबित अशी माझ्या हाती देऊ शकत नाहीस ना? काही हरकत नाही. तो होण्यासाठीचा सोपा उपाय आधी सुरू कर. काय आहे हा उपाय? तर अष्टौप्रहर प्रपंचाकडे जे लक्ष देतोस, त्यातलं एक निमिष मला देत जा! निमिष म्हणजे पापणी फडफडण्यास जितका अत्यल्प क्षण लागतो, तेवढा! केवढी सूट आहे पाहा! आता इथे ‘माझ्या हाती’ असं का म्हटलं आहे? मन-चित्त-बुद्धी भगवंताच्या हाती द्यायचं म्हणजे काय? हात म्हणजे कर्तृत्वाचं प्रतीक. आपण ‘मी’पणामुळे कर्तेपण स्वत:कडे घेतो आणि त्यामुळे मन-चित्त-बुद्धी त्या कर्तृत्वमदानं भरकटते. खरा कर्ता परमात्मा, अर्थात सद्गुरूच आहे. माझ्यात कर्तृत्वक्षमता त्याने उत्पन्न केली आहे. माझ्याकडून तोच कृती करवीत आहे, ही जाणीव आली तर कर्म करूनही कर्तृत्वाचं श्रेय परमात्म्याला दिलं जाईल. हा परमात्मा वा सद्गुरू कसा आहे? ‘‘देखा नवल तया प्रभूचें। प्रेम अद्भुत भक्तांचें। जे सारथ्य पार्थाचें। करितु असे।। पाइकु पाठीसीं घातला। आपण पुढां राहिला। तेणें पांचजन्यु आस्फुरिला। अवलीळाचि।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १, ओव्या १४२, १४३). आधी पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांनी ‘प्रपंचा’त अडकलेला जो साधक होता तो जेव्हा पूर्ण समर्पित होतो तेव्हा अशा साधकावरचं त्या सद्गुरुंचं प्रेम पाहा की त्याच्या जीवनाची सर्व सूत्र तो आपल्या हाती घेतो. तो सारथी बनतो आणि आपल्या भक्ताला पाठीशी घालतो. त्याच्या जीवनसंघर्षांत तो सामोरा जातो. वरून पाहता, बाह्य़रूपानं पाहता, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांचा ‘प्रपंच’ पूर्वीसारखाच भासत असतो, पण आता त्याच पाचांतून ‘पांचजन्या’चा मंगलघोष स्फुरत असतो, नव्हे, सद्गुरूच लीलया तो जयघोष करतो! पण हे साधका हे सहज घडावं इतकं समर्पण साधत नाही ना? काही हरकत नाही एका निमिषापासून तर सुरुवात कर! आता निमिषभर का द्यायला सांगितलं आहे हो? कारण आपण एक निमिषदेखील खऱ्या अर्थानं त्याला देत नाही! आपण जप करतो, उपासना करतो, पण त्यात निमिषभर तरी मन, बुद्धी, चित्त त्याच्याशी एकरूप होतं का हो? तर म्हणून प्रथम निमिषाचा वायदा केला आहे! त्या गुंतवणुकीच्या जाहिराती नसतात का? अगदी थोडी रक्कम गुंतवा आणि भरपूर कमवा, असं आमिष दाखविणाऱ्या. त्यामुळे थोडक्यात भरपूर कमवण्याची आपली सवय लक्षात घेऊन हा वायदाही एका क्षणाचा आहे! रोजच्या धबडग्यात किंचितही उसंत न मिळणाऱ्या आपल्याला हा वायदा सोयीचा वाटतो, पण त्या एका क्षणानं असं काय घडणार आहे हो?
२४८. सोपी सुरुवात
मन, चित्त आणि बुद्धी सद्गुरूचरणी एकवटणं सोपं नाही, पण त्यासाठीचा उपाय स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’ तील ८४ आणि ८५ या ओव्या सांगतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-12-2014 at 12:50 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan easy beginning