गेल्या दोन भागांत आपण हुजूर सावनसिंह महाराजांच्या लीला चरित्रातील गंगू डाकूची जी गोष्ट पाहिली तिचा हेतू काय होता? तर माझ्या जीवनाचं बाह्य रूप कसंही असो; चांगलं असो वा वाईट असो, सदाचारी असो वा दुराचारी असो, सत्कर्मरत असो वा दुष्कर्मरत असो, त्या जीवनात श्रीसद्गुरूंचा प्रवेश झाला तर मग माझं जीवन तेच भगवंतकेंद्रित करून देतात. आता भगवंतकेंद्रित म्हणजे तरी काय हो? तर आज ते संकुचित ‘मी’केंद्रित आहे. म्हणूनच भ्रम आणि मोहात गुंतून मी कित्येकदा मर्यादा ओलांडतो. करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो.. नंतर अहंभावनेतून त्या कृतीचं समर्थनही मी करू पाहतो. तर सद्गुरू मला ‘मी’च्या गळातून सोडवू लागतात. जगण्याची दिशा बदलतात. दृष्टी अधिक व्यापक करतात. मग कोणतंही कर्म हे कर्तव्याची चौकट ओलांडत नाही. त्यांच्या इच्छेच्या चौकटीबाहेर जात नाही. सद्गुरूंचा जीवनातला प्रवेश मात्र अगदी खराखुरा हवा. गंगूच्या जीवनात हा प्रवेश झाला होता, हे त्याच्या एका वाक्यातून जाणवतं. तो म्हणाला, ‘‘मला असे सद्गुरू लाभले आहेत ज्यांच्या एका नजरेनंच माझं अवघं जीवन बदलून गेलं आहे!’’ आपलं जीवन असं बदलून गेलंय का हो? दारूच्या नशेत चूर असलेल्या गंगूच्या मनात, केवळ हा सद्गुरूच मला तारू शकतो, हा दृढ भाव जागृत झाला. त्याच्या तुलनेत आपण शुद्धीवर आहोत, तरी हा भाव आपल्या मनात जागा झाला आहे का? की दारूच्या नशेपेक्षा आपली प्रपंचाची नशा अधिक आहे? दरोडा घालत असलेल्या गंगूसमोर ते प्रकटले, दारूचा पेला हातात घेतलेल्या गंगूसमोर ते प्रकटले, मग मी इतकी उपासना करतो, जप-बिप करतो तर माझ्यासमोर ते का प्रकटत नाहीत हो? या प्रश्नांनी आपण अंतर्मुख होतो का? सद्गुरूंच्या एका नजरेनं गंगूचं जीवन बदलून गेलं, आपणही म्हणतो की सद्गुरू मला सदोदित पाहतात, तेच मला सांभाळतात, पण मग तरी आमच्या जीवनाची ‘मी’केंद्रित घडी किंचितही का विस्कटलेली नाही? ती विस्कटली नसेल तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, सद्गुरूंचा आमच्या जीवनात खरा प्रवेश झालेला नाही! नव्हे, मीच तो होऊ दिलेला नाही. त्यांचा माझ्या जीवनात खरा प्रवेश म्हणजे माझ्या कर्तेपणाचा भ्रम सुटणं आणि कर्तव्य करीत असतानाही मनात त्यांच्याच बोधाचं स्मरण जागं राहणं. आज माझं मन ‘मी’केंद्रित अनंत इच्छांनी भरून आहे. त्यात क्षणोक्षणी नवनव्या हवेपणाची भर पडतेच आहे. मग त्या मनात सद्गुरूंना शिरकाव करायला जागाच कुठे आहे? अहंकार, कर्तेपणाचा भ्रम, मोह, विकारवशता, स्वार्थलोलुपता, मद, मत्सर, आळस, दुराग्रह अशा अनंत गोष्टींची खपली माझ्यावर आहे. ती सुटावी, सद्गुरूंचा माझ्या जीवनात खरा प्रवेश व्हावा, त्यांच्या कर्तेपणाची जाणीव जागी व्हावी यासाठीच प्रापंचिक साधकासाठी ही ओवी आहे की, तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।। म्हणजे, स्वरूपाचा भाव टिकवून तुझ्याकडून जे जे कर्म घडेल ते अवघं माझ्याच इच्छेनं झालं या भावनेची मोहोर त्यावर उमटवून ते कर्म मलाच अर्पण कर!