अनुक्रमाधारे शब्दाचा अर्थ ‘वर्णाश्रमधर्माप्रमाणे’ असा केला जातो. त्याचा साधकासाठीचा खरा अर्थ जाणून घेण्याआधी धर्म व चातुर्वण्र्याचा संक्षेपानं मागोवा घेऊ आणि स्वरूपानंद यांची त्याबाबतची मूलगामी मते जाणून घेऊ. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करू शकणारा बुद्धिप्रधान व भक्तिप्रधान मनुष्य त्याने निर्माण केला. तेवढय़ानं समाधान झालं नाही तेव्हा त्यानं भौतिकाचं रक्षण साधू शकेल असा बलप्रधान मनुष्यही निर्माण केला. यानंतर त्यानं त्या भौतिकाच्या विकासासाठी उद्यमशील असा कर्तृत्वप्रधान मनुष्य निर्माण केला आणि त्यानंतर या तिन्ही मनुष्यगणांना पूरक असा सेवाप्रधान मनुष्य तयार केला. या चार प्रकारांतूनच वर्णाश्रमधर्म निर्माण झाला. त्यातही गुणकर्माचा पाया होता पण जेव्हा त्यात वंशबीजही महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं तेव्हा जन्मानुसारचा वर्णाश्रम चिकटला. या वर्णाश्रमाच्या चौकटीत कोणीही कोणाचं शोषण करू नये म्हणून त्यानं धर्म निर्माण केला, असं बृहद्अरण्योपनिषदात म्हटलं आहे. आता धर्माच्याच चौकटीत आणि वर्णाश्रमधर्मातील उच्च-नीच कल्पनेतूनच माणसानं माणसाचं शोषण केल्याचे अनेक दाखले आहेत. तरी हे उपनिषद ग्राह्य़ धरायचे तर वर्णाश्रमधर्म प्रथम आला मग आचारधर्म आला. गुणकर्मानुसार मी चातुर्वण्र्य निर्माण केला, असं भगवंत गीतेत सांगतात. नंतर गुणकर्म मागे पडून जन्मानुसारची जात चिकटली आणि जातिसंस्थेनं वर्णाश्रमधर्माचा मूळ हेतू नाहीसा होऊन मनुष्यत्वाला काळिमा फासणाऱ्या प्रथा रूढ झाल्या, असाही एक मतप्रवाह आहे. जगभर पाहिलं तर ‘चातुर्वण्र्या’चीच चौकट आजही दिसून येते. ज्ञानाची मक्तेदारी असणारे, सत्तेची मक्तेदारी असणारे, व्यावसायिक मक्तेदारी असणारे असे तीन ‘वर्ण’ आजही ठळकपणे दिसतात, मग जन्मानुसार त्यांचा धर्म कोणताही असो. यानंतरचा चौथा गट शतकभरापूर्वी ज्या अंध:कारमय स्थितीत होता, त्याच स्थितीत या तिन्हीपलीकडचा मनुष्यगण जगभर आजही खितपत आहे. ज्ञान, सत्ता, पैसा यापासून तो वंचित आहे. अन्यायाशी झुंजत आहे. माणूस जितका खऱ्या अर्थानं माणूसच बनेल तेव्हाच जगभरातला हा अन्याय्य ‘चातुर्वण्र्य’ नष्ट होईल.  आपण जी चर्चा करणार आहोत ती या अशा अदृश्य पण जगभर अस्तित्वात असलेल्या ‘चातुर्वण्र्या’ची नाही तर ‘‘देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे। तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।।’’ या ओवीत अनुक्रमाधारे या शब्दाचा अर्थ चातुर्वण्र्य घेतला जातो आणि तो आपल्या गूढार्थानुसार कसा चुकीचा आहे, त्यापुरती आहे. आता स्वामी स्वरूपानंद यांच्या धर्मविषयक विचारांचा थोडा मागोवा घेऊ. धर्म प्राचीन असतो आणि कालपरत्वे त्यात अनेक वाईट प्रथाही उत्पन्न होतात. त्या नष्ट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतात. संतसत्पुरुषांनीही कधी उघडपणे तर कधी खुबीने तो प्रयत्न केला. ‘धर्माची जेव्हा जेव्हा हानी होते तेव्हा मी अवतरतो’, असं प्रभू सांगतात. धर्माची हानी अशा अपप्रथांनीच होत असते. त्यामुळे प्रत्येक सत्पुरुषाच्या जीवनात या अपप्रथांविरोधातील जागृतीचाही एक प्रवाह असतो. स्वामी स्वरूपानंदही त्याला अपवाद नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा