एका निमिषाच्या दानानं सुरुवात झाली आणि मग आसक्तीयुक्त प्रपंचातली गोडी कमी होत गेली, शरीरानं कर्तव्यर्कम सुटली नाहीत, पण मनातून कर्मफळाची ओढ गेली तर कोणती स्थिती येईल, याचं वर्णन स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ८७व्या ओवीत आहे. ही ओवी अशी : ‘‘पुनवेहूनि जैसें। शशिबिंब दिसें दिसें। हारपत अंवसें। नाहींचि होय।। ८७।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी १०८). काय रूपक आहे पाहा! पौर्णिमेनंतर चंद्रबिंब दर दिवशी जसे घटत जाते आणि अमावस्येला दिसेनासे होते ना? पण म्हणून काय आकाशात चंद्र नसतो का? तसं अंत:करणात बोधाची पौर्णिमा झाली, बोधाचा पूर्णचंद्र उगवला की, नंतर प्रपंच कायम राहूनही आसक्तीची प्रत्येक कला मावळू लागते! भोगासक्ती अशी पूर्ण मावळली, की प्रपंच पूर्ववत असूनही तो पूर्वीसारखा दिसत नाही! स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ८८वी ओवी सांगते- ‘‘तैसें भोगाआंतूनि निगतां। चित्त मजमाजीं रिगतां। हळूहळू पंडुसुता। मीचि होईल।। ८८।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी १०९). परमतत्त्वाला समर्पित प्रत्येक निमिषापाठोपाठ चित्त भोगासक्तीतून सुटेल. ते जसजसं त्या परमतत्त्वात रमू लागेल तसतसा ‘जीव’ हा ‘शिव’च होईल! जो संकुचित होता, तोच व्यापक होईल. जो मर्यादित होता, तोच अमर्याद होईल. जो अशाश्वत होता, तोच शाश्वत होईल. जो अपूर्ण होता, तोच पूर्ण होईल! इतकं सगळं आपल्या जीवनात साधेल का, असा प्रश्न कुणाच्याही मनात उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. मात्र अभ्यासाने काहीही असाध्य नाही, ही हमी स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ८९वी ओवी देते. ही ओवी अशी : ‘‘म्हणौनि अभ्यासासी कांहीं। सर्वथा दुष्कर नाहीं। यालागीं माझ्या ठायीं। अभ्यासें मीळ।। ८९।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी ११३). हा अभ्यास कोणता आहे? सुरुवातीला अशाश्वताच्या ओढीनं सुरू असलेल्या धावपळीतलं एक-एक निमिष त्या शाश्वताला देण्याचा हा अभ्यास आहे. सुरुवातीला कोणतीही उपासना आपण कशी करतो? जसं लहानपणी बळानं अभ्यासाला बसायचो, तशी! मग तो जप असो की सोऽहं असो, ध्यान असो; तो ‘केला’ जातो, ‘करावा’ लागतो, आपोआप होत नाही! आता मग अभ्यासात हळूहळू मन लागू लागलं तर काय होऊ शकतं? तर अभ्यासाची सवय होते आणि मग त्यात गोडीही निर्माण होते. एकदा ही गोडी निर्माण झाली, की मग उपासना अधिकाधिक होऊ लागते. स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ९०वी ओवी म्हणूनच सांगते की, ‘‘कां जें यया मनाचें एक निकें। जें देखिले गोडीचिया ठाया सोके। म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें। दावीत जाइजे।।९०।।’’ (ज्ञा. अध्याय ६, ओवी ४२०). या मनाची एक गोष्ट चांगली आहे की, एकदा गोडी लागली, की मग त्या गोडीच्या अनुभवासाठी तेच पुन:पुन्हा सरसावते. म्हणून त्याला त्या निमिषात मिळणाऱ्या शांतीचे अनुभवसुख वारंवार देत जा!

Story img Loader