स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३८वी ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतला क्रम, प्रचलितार्थ आणि विशेषार्थ विवरण आता पाहू. ही ओवी अशी :
देह तरी वरिचिलीकडे। आपुलिया परी िहडे। परि बैसका न मोडे। मानसींची।। २८।। (अ. १३ / ४८५)
प्रचलितार्थ : त्या पुरुषाचा देह तर वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु त्याच्या मनाची स्थिरता बिघडत नाही.
विशेषार्थ विवरण: सद्गुरू आपल्या शिष्याला संसारात कशा अवस्थेत पाहू इच्छितो, याचं हे वर्णन आहे. इथे वर अर्थात बाह्य़ आणि पाया अर्थात आंतरिक बैठक यांचे वर्णन आहे. प्रारब्धकर्मानुसार कर्तव्यात साधकानं देहाच्या आधारे वावरावं, कर्म करावं पण त्याच्या मनाची बैठक त्या कर्मात आसक्तीने गुंतून मोडली जाऊ नये. इथे श्रीगोंदवलेकर महाराज यांनी वापरलेलं जात्याचं रूपक अगदी चपखलपणे आठवतं. जात्याची दोन पेडी असतात. अर्थात वरचा दगड आणि खालचा दगड. त्यापैकी खालचा दगड हा स्थिर असतो आणि वरचा दगड हा फिरत असतो. जर जात्याची दोन्ही पेडी फिरू लागली तर दळण दळलं जाईल का? त्याचप्रमाणे देहानं प्रपंचात वावरावं पण मन भगवंताच्या चरणीं स्थिर असावं. जर दोन्ही प्रपंचातच भरकटतील तर भटकंती कायम राहील. स्वामींच्या बोधानुरूप सांगायचं तर जगातली कर्तव्यं पार पाडतानाही मनातलं सोऽहं अनुसंधान सुटता कामा नये. ते सुटलं नाही तरच प्रपंचातील चढउतारात मन स्थिर राहील आणि कर्तव्यं पार पाडता येतील. सांसारिक अडीअडचणी जेव्हा स्वामींसमोर कुणी मांडू लागे तेव्हा काय होई? ना. स. (नाना) करंदीकर लिहितात, ‘‘आपणांकडे भेटीस येणाऱ्या प्रत्येकाकडे त्यांचं (स्वामींचं) बारकाईनं लक्ष असे. कोणतीही व्यावहारिक अडचण, सांसारिक व्यथा दर्शनेच्छु मंडळींनी व्यक्त केली की स्वामी शांतपणे ती ऐकून घेत व म्हणत- साधनी असावे तत्पर। संकटी न सोडावा धीर। सोऽहं स्मरणे वारंवार। निजान्तर चोखाळावे।।’’(स्वामी स्वरूपानंद स्मृतीसौरभ, सेवा मंडळ प्रकाशन, १९७५, पृ. ७८). म्हणजे काय? तर साधनात तत्पर नसल्यामुळेच संकटानं मन गांगरून जातं. आपणही आपल्या जीवनातल्या गोष्टी आठवून पाहा. जेव्हा संकट येतं तेव्हा ते संकटच मनाचा पूर्ण ताबा घेतं! मग भीती, काळजी, शंका-कुशंका, कल्पना, तर्क, कुतर्क, वितर्क यांच्या चक्रीवादळात मन गटांगळ्या खाऊ लागतं. कल्पना आणि भीतीपायी संकटांची व्याप्ती आपण कित्येक पटीनंही कल्पू लागतो. चिंता करण्यातली ही जी तत्परता आहे ती साधनेकडे वळवायला मग स्वामी सांगतात. धीर न सोडता वारंवार सोऽहं स्मरणानं निजान्तर अर्थात आपलं अंतर्मन तपासावं, सांभाळावं, जपावं. द्वैतमय असलेल्या प्रपंचात चढउतार येणारच. त्यावेळी आधीच्या जडणघडणीप्रमाणे मन गांगरूनही जाणार. पण आता त्याला साधनेचा भक्कम आधार द्यायचा अभ्यास प्रयत्नपूर्वक करावा, असंच स्वामींना सांगायचं आहे. ही साधना पक्व झाली तरच द्वैतमय प्रपंचात वावरत असतानाही मन आणि बुद्धी यांची सोऽहं भावातली, सोऽहं जाणिवेतली एकतानता, एकरसता भंग पावणार नाही!
१७६. जातं!
स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३८वी ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतला क्रम, प्रचलितार्थ आणि विशेषार्थ विवरण आता पाहू. ही ओवी अशी :
आणखी वाचा
First published on: 06-09-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan grinder