शांताचिया घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा! जीव (अद्भुत) हा सद्गुरू(शांत)कडे पाहुणा म्हणून आला! शांत रसाचा स्थायीभाव काय आहे? तर वैराग्य आणि अद्भुत रसाचा स्थायीभाव आहे आश्चर्य, कुतूहल! सद्गुरूंची पहिली भेट कशामुळं होते? मनात कुतूहल असतं! पहिल्या भेटीला जाताना, सर्व जीवन त्यांच्याच चरणी वाहून टाकायचं आहे, अशी भावना क्वचितच कुणाची असेल. जाऊ, दर्शन घेऊ, पाहू तरी कोण आहेत, कसे आहेत, आशीर्वाद घेऊ, दर्शनानं काय नुकसान होणार आहे? साधारण असा पाहुण्यासारखा भाव असतो. पाहुणा कसा, काही काळापुरताच भेटीला येत असतो. जाऊ आणि त्यांचेच होऊन राहू, अशा भावनेनं पाहुणा भेटीला येत नाही! अहो साईबाबांकडे एकजण आला, ‘परब्रह्म दाखवा’ म्हणून. आला तोदेखील परतीच्या बोलीवर टांगा घेऊन! बाबा परब्रह्म दाखवायला वेळ लावत आहेत आणि टांगेवाला ताटकळत आहे, ही मनात रुखरुख! श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत ना? मिठाची बाहुली समुद्राची खोली पाहायला गेली आणि त्यातच विरघळून गेली. मग परब्रह्माच्या खऱ्या दर्शनानंही परब्रह्ममयताच येईल, हे परतीचा टांगा ठरवताना अभिप्रेत तरी होतं का? आपलीही स्थिती अशीच असते नाही? कुतूहलापोटी म्हणून, त्यांच्या आशीर्वादानं आपल्या संसारातल्या अडीअडचणी दूर झाल्याच तर बरं आहे, या भावनेनं, साधू-संतांची दर्शनं घ्यावीत, या सुप्त संस्कारांमुळं जीव सद्गुरूंच्या दर्शनाला ‘पाहुण्या’सारखा येतो. या भेटीचा मध्य काय आहे? तर सद्गुरूंच्या सामर्थ्यांची जाणीव त्याला होऊ लागते. प्रपंचातला प्रभाव लोपला नसतो. तरीही सद्गुरू त्याला अचूक मार्गदर्शनानं कृतीची प्रेरणा देऊन किंवा कधी अगदी अनाकलनीयरीत्या प्रपंचातील अडीअडचणींतून सोडवत असतात. प्रपंचात साधक बुडावा इतका तो सुधारून द्यावा, हा त्यांचा यामागे अंत:स्थ हेतू नसतोच. जो अनासक्त भावानं प्रपंचात राहातो आणि सद्गुरूकार्याला प्राधान्य देतो, त्याचा प्रपंच ते भरभराटीलाही आणतात. जसा ती. भाऊ देसाईंचा प्रपंच! सर्वसामान्य जिवांना त्यांच्या त्यांच्या प्रपंचातली निर्विघ्नता आवडत असते. त्या आवडीतूनही सद्गुरू जेव्हा जिवाला सोडवतात तेव्हा हळुहळू त्यांचे विचार, त्यांचा हेतू, त्यांची आवड मलाही समजू लागते. जेव्हा आणि जसजसा त्यांच्या आणि माझ्या विचारातला, हेतूतला आणि आवडीतला भेद संपतो तेव्हा ‘एकदशा’ स्थिती येते. अर्थात ती एकदशा स्थिती झाली नसतानाही पंगतीला आलेल्या वऱ्हाडय़ांनाही लेणीलुगडी मिळतात! नवरा आणि नवरीचं लग्न होतं पण म्हणून काही ते तात्काळ एकरूप होत नाहीत. एकरूपतेची प्रक्रिया दीर्घ असते. तरीही त्या लग्नात वऱ्हाडय़ांचाही लाभ होतो. जीवभावात आलेल्या साधकाचे वऱ्हाडी कोण आहेत? तर उरलेले सात रस हे त्याचे आप्तजन. विविध मनोदशांमध्ये वावरणाऱ्या या आप्तांचाही या भेटीमुळे लाभ होतो. खिळ्याबरोबर त्याला लागून असलेल्या शेकडो टाचण्याही लोहचुंबकानं खेचून घ्याव्यात तसे सद्गुरू पंथाला लागलेल्या जिवाचे आप्तही या मार्गाकडे खेचले जातात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा