इच्छा चांगली असो वा वाईट, देहबुद्धीतून प्रसवली असेल तर सदिच्छाही बाधकच आहे. प्राथमिक टप्प्यावर साधकाच्या मनात अनेक तऱ्हेच्या उपासनांबाबतही अनेक इच्छा निर्माण होतात. अमुक व्रत करावे, अमुक उपास करावेत, अमुक पारायणं करावीत, अमुक योग साधावा, अशा अनेक इच्छा मनात येतात. त्यात अवडंबराचीही सूक्ष्म छटा असते.  वरकरणी पाहता त्या इच्छेत गैर वाटण्यासारखं काहीच नसतं. तरी त्या मूळ हेतूपासून साधकाला दूर करीत असतात आणि त्याचा वेळही घेतात! स्वामी स्वरूपानंद यांच्याशी एकरूप झालेले त्यांचे शिष्य स्वामी अमलानंद ऊर्फ मामा यांच्याविषयीची एक आठवण ‘अमलानंद स्मृतिसुगंध’(प्रकाशक- आघारकर कुटुंबीय, पेण) या पुस्तकात राजाभाऊ पुराणिक यांनी दिली आहे. ते लिहितात- मी गुरुचरित्र अनेक वर्षे वाचले. मौन राखून गुरुचरित्राची पारायणे करावीत असे विचार गुरुपदिष्ट होण्याच्या आधीपासूनच मनात घोळत होते. १९७९ साली पेणला गेलो असता हा विचार घोळत असल्याचे सद्गुरूंना (अमलानंद यांना) सांगितले व तसे करण्यासाठी अनुज्ञाही मागितली. मामांनी परवानगी दिली परंतु चेहऱ्यावर आनंदी भाव दिसला नाही. परंतु देहबुद्धीने मी पडत्या फळाची आज्ञा समजून मौनाने अनुष्ठानास सुरुवात केली. एकवीस दिवस मौन, त्यात गुरुचरित्राची पारायणे, एक ज्ञानेश्वरीचे पारायण व एक दासबोधाचे पारायण. सकाळी गुरुचरित्र, दुपारी ज्ञानेश्वरी व सायंकाळी दासबोध. खूप थाट केला होता. पारण्यास खूप लोक आले होते. दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन पेणला गेलो. सद्गुरूंच्या चरणांवर डोके ठेवले, प्रसाद दिला. सद्गुरू मामांनी विचारलं, ‘‘झालं मनासारखं!’’ ऊर भरून आला होता. मानेनेच ‘हो’ म्हटलं. रात्री भोजन आटोपल्यावर मामा म्हणाले, ‘‘कुणी हे करायला सांगितलं तुला! अरे, मी तुम्हाला एकेका घोळातून बाहेर काढायला बघतो आहे आणि तुम्ही पुन:पुन्हा त्यांत अडकवून घेत आहात. काय म्हणायचे तुला!’’ मी म्हंटलं, ‘‘मामा तुमची परवानगी घेऊनच अनुष्ठान केलं. आपण अनुज्ञा दिली नसतीत तर नसतं केलं. आपण रागावलात का?’’ मामा म्हणाले, ‘‘अरे वेडय़ा, त्यावेळी तू म्हणालास की बऱ्याच दिवसांची इच्छा बाकी आहे. म्हणून परवानगी दिली. ती वासना तशीच राहिली असती तर पुढे घोटाळा झाला असता. समजलं! आता पुन्हा असे कर्मकांडी संकल्प करू नकोस.’’ मामांच्या चरणांवर पुन्हा मस्तक ठेवलं. खूप रडलो. पुन्हा कधी असा संकल्प उठलाच नाही. (पृ. ९३, ९४). आता वरकरणी पाहता सद्ग्रंथांच्या पारायणाच्या इच्छेत काहीच गैर वाटत नाही. मौन साधणं हेसुद्धा मोठं साधनच वाटतं. तब्बल एकवीस दिवस मौन पाळून सद्ग्रंथांचं पारायण करायचं, ही कल्पनाही साधनशील मनाला मोहवतेच. पण या इच्छेच्या आणि त्यानुरूप होणाऱ्या कृतीच्या अंतरंगात शिरलं तर काय दिसतं? आपण मौन पाळतो पण त्या मौनात मन किती अनावर बडबड करीत असतं, ते पाहतो का? आपण पारायणं करतो, पण वासनात्मक अंत:करणाचं ‘अयन’ म्हणजे घर पार करतो का?