प्रत्येक साधना, उपासना, मग ती कोणत्याही पंथाची असो, कोणत्याही धर्माची असो, तिचाच प्रारंभापासून ते ध्येयशिखरापर्यंतचा प्रवास ‘‘बळियें इंद्रियें येती मना। मन एकवटे पवना। पवन सहजें गगना। मिळोंचि लागे।। या ओवीत सांगितला आहे! आता  धर्म कोणताही असो, उपासनेचा हेतू काय असतो? स्थूल, दृश्य अशा जगात वावरणारा जो मी आहे त्याला सूक्ष्म, अदृश्य अशा परमतत्त्वाचा साक्षात्कार व्हावा. काही जण सगुणाला डोळ्यापुढे ठेवून, तर काही निर्गुणालाच समोर ठेवून त्या परम शक्तीसमोर नतमस्तक होत तिच्याशी एकरूप होण्याचा अभ्यास करीत असतात. आता हा जो एकरूपतेचा अभ्यास आहे, तो सूक्ष्मच आहे. आंतरिकच आहे. त्या आंतरिक अभ्यासाच्या आड अगदी पहिल्या पातळीवर काय येत असतं? तर आपल्या भवतालचं स्थूल, भौतिक जग, त्या जगाचा आपल्यावरील पगडा, प्रभाव आणि त्या जगातलं आपलं गुंतणं हेच या अंतर्यात्रेत अडथळे आणत असतं. काही क्षण तरी उपासनेला शांतपणे देता यावेत, अशी आपली पहिल्या पातळीवर धडपड असते, पण डोळे मिटले तरी डोळ्यासमोरचं आणि डोक्यातलं जग काही जात नाही! त्यामुळे स्थूल इंद्रियांद्वारे या भौतिक जगात पसरत चाललेलं आपलं मन ताब्यात आणण्याचा अभ्यास कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही पंथातल्या आणि कोणत्याही उपासना पद्धतीचा अवलंब करीत असलेल्या साधकाला पहिल्या पातळीवर करावाच लागतो. इंद्रियांवर मनाचा ताबा येणं, अर्थात इंद्रियांद्वारे सतत बहिर्मुख होण्याच्या मनाच्या सवयीवर ताबा येणं हेच प्रथम आवश्यक असतं. त्याचंच सूचन ‘बळियें इंद्रियें येती मना।’ या पहिल्या चरणात आहे. मग काय होतं? मन जसजसं संयमित होऊ लागतं तसतसा प्राण स्थिर होत जातो! मन जेव्हा अस्थिर असतं, अशांत असतं तेव्हा श्वासोच्छ्वासाची गती अनियमित असते ना? ‘प्राण कंठाशी आले’, ‘प्राण तळमळला,’ असे आपण म्हणतो ना? तर मन संयमित होऊ लागलं, की श्वासोच्छ्वासाची गतीही संयमित होते, प्राण संयमित होतो आणि मन-प्राणाच्या गतीचा जणू संयोग होतो. याचंच सूचन ‘मन एकवटे पवना।’ या दुसऱ्या चरणात आहे. या मुद्दय़ाशी संबंधित चिंतन हे स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’ पुस्तकात तसेच अन्यत्रही मिळेल. बरं, एकदा मन आणि प्राणाची गती स्थिर झाली, त्यात एकतानता आली, की काय होतं? मन व्यापक होऊ लागतं. ते शाश्वताशी, व्यापकाशी जोडलं जाऊ लागतं आणि त्यात विलीन होऊ लागतं.  त्याच्यात ते परमतत्त्व प्रतिबिंबित होऊ लागतं. लहानसं तळं असतं आणि त्याचं पाणी गढूळ असेल तर त्यात आभाळाचं प्रतिबिंब पडणार नाही. तेच पाणी निर्मळ असेल तर त्याच तळ्यात आभाळही प्रतिबिंबित होईल. मग आभाळ व्यापक असलं तरी त्या छोटय़ाशा तळ्यातही ते प्रतिबिंबित होईल. तशी एकतानता आली की याच मनात व्यापक परमतत्त्वही  प्रतिबिंबित होईल! उपासनेच्या या परिपूर्तीचं सूचन, ‘पवन सहजें गगना। मिळोंचि लागे।।’ या चरणात आहे. सर्वधर्मीय संतांच्या चरित्रांत याचा स्पष्ट दाखला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा