स्वरूपाचं भानही नाही आणि जगताना निवांतपणाही नाही, अशी आपली स्थिती असते. जगताना जसे आपण निवांत नसतो तसेच साधना करीत असतानाही आपलं मन निवांत नसतं. मन एकाग्र झालं की साधना निवांतपणे साधेल, असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात मन जगाच्या व्यवहारात व्यग्र असताना ते काही काळासाठी, एखाद्या खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन साधनेसाठी बसताच एकाग्र होईल, हे शक्य तरी आहे का? एकांतानंच मन एकाग्र होतं हे खरं, पण खरा एकांत म्हणजे एका ‘मी’ चाच अंत, हा अर्थ आपल्या ध्यानीमनीही नसतो. लोकांपासून दूर म्हणजे खरा एकांत असं मानून, लोकांना साधनेतला व्यत्यय मानून आपण आधी एकांत मग एकाग्रता आणि मग साधना, असा क्रम लावून लोकांतासाठी धडपडू लागतो. त्यामुळे जगण्यात अशांती भरली आहे आणि ती तशीच असतानाही आपण काही काळासाठी एकांतवासात जातो, मग ती अशांती तिथंही पाठलाग करीत येतेच. त्यामुळे प्रत्यक्ष जगतानाच त्या एका परमात्म्याशी एकात्मता साधण्याचा, परमध्येयाच्या एका अग्रावर केंद्रित होण्याचा अभ्यास केला पाहिजे. तो न करता आपण लोकांतालाच साधनेतला महत्त्वाचा टप्पा मानतो. निवांत होण्यासाठी आधी मन एकाग्र होणं गरजेचं आहे आणि एकाग्रतेकरता एकांतवासात जायला हवं, अशी तीव्र इच्छा एका साधकाला होती. स्वामी स्वरूपानंद यांच्या दर्शनाला आल्यावर त्यानं त्याबाबत मार्गदर्शन मागितलं. स्वामींच्या मार्गदर्शनाची एक जगावेगळी पद्धतही होती. त्यांच्या संग्रहातलं एखादं पुस्तक ते काढत आणि प्रश्नकर्त्यांलाच कोणतंही पान उघडायला सांगत किंवा स्वत:ही एखादं पान सहज उघडून त्या पानावरील मजकूर वाचायला सांगत. त्या मजकुरात त्या प्रश्नकर्त्यांच्या मनातील शंकेचंच निरसन असे. आपला परमार्थ प्रपंचातच साधायचा आहे आणि तोही कोणताही गाजावाजा न करता. जगापासून दूर गेलेलं मन एकाग्र झाल्यासारखं वाटेलही, पण जगात येताच ते परत व्यग्र होऊन जाईल. साधना करीत असतानाची एकाग्रता साधना संपताच भंगेलही. अशी एकाग्रता काय कामाची? जगताना प्रत्येक प्रसंगात मन निवांत कसं राहील, याचा अभ्यास केला पाहिजे. हे त्या साधकावर बिंबवण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांनी त्याला विनोबांचं ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक देऊन एक पान उघडून तो मजकूर वाचायला सांगितला. तो मजकूर असा होता : ‘‘ एखादा मनुष्य गुहेत जाऊन बसतो. तेथे कोणाशी संबंधच येत नाही. त्याला वाटते, आपण आता अगदी शांतमती झालो आहोत. त्याला गुहा सोडून एखाद्या घरी जाऊ द्या. तेथे एखादे खेळकर मूल दाराची कडी वाजवते- ते बालब्रह्म त्या नादब्रह्मात तल्लीन होते. परंतु त्या निष्पाप मुलाची ती कडी वाजविण्याची क्रिया त्या योग्याला सहन होत नाही. तो म्हणतो, ‘‘काय काटर्य़ाने कटकट चालविली आहे!’’ गुहेत राहून त्याने आपले मन इतके दुबळे केलेले असते की इवलाही धक्का त्याला सहन होत नाही. जराशी कडी वाजली की पुरे, त्याच्या शांतीची बैठक मोडते. अशी दुबळी स्थिती काही चांगली नाही.’’
६७. व्यग्र-एकाग्र
स्वरूपाचं भानही नाही आणि जगताना निवांतपणाही नाही, अशी आपली स्थिती असते. जगताना जसे आपण निवांत नसतो तसेच साधना करीत असतानाही आपलं मन निवांत नसतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-04-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan involved concentrate