जेव्हा भक्ताची पूर्ण भावतन्मय अवस्था होते, शरीरानं तो वेगळा दिसतो, पण त्याचं अंतरंग सद्गुरूमयच झालं असतं तेव्हा काय होतं? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ७८ आणि ७९वी ओवी त्याचा निर्देश करते! या ओव्या अशा : ‘‘मग भूतें हे भाष विसरला। जे दिठी मी चि आहे सूदला। म्हणौनि निर्वैर जाहला। सर्वत्र भजे।।’’ (अ. ११, ओवी ६९८). ‘‘हें समस्तही श्रीवासुदेव। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव। म्हणौनि भक्तांमाजीं राव। आणि ज्ञानिया तो चि।।’’ (अ. ७, ओवी १३६). आतली धारणा जशी असते तसं जग दिसतं. अंतरंग सद्गुरूमय झालं असेल तर जगात वावरताना पदोपदी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग हा सद्गुरूच्याच सहवासातला वाटणार. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशीच भावस्थिती असणार ना? मग समोर कितीही भिन्न भिन्न लोक असोत दृष्टी एका सद्गुरूलाच पाहात असणार ना? ‘मनाचे श्लोका’त समर्थ सांगतात ना? ‘पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडू नये तो। जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो।।’ वैखरी म्हणजे व्यक्त जग. डोळ्यांना जे व्यक्त जग दिसत आहे त्याचा आधी म्हणजे पाया भगवंत आहे, हे लक्षात ठेवावे. हे भान राखून जे आचरण होतं तोच थोर सदाचार आहे. ज्याचं हे भान अर्थात हा सदाचार सुटत नाही तोच लोकांमध्ये तसेच संतसज्जनांमध्ये धन्य मानला जातो! जेव्हा सर्वत्र सद्गुरूच दिसत असेल, प्रत्येक प्रसंगातून सद्गुरू मला काहीतरी शिकवू पाहात आहेत, असं वाटेल, प्रत्येक घटना ही जणू माझ्या आंतरिक स्थितीची तपासणी करण्याची संधी आहे, असं वाटेल तेव्हा सर्व जगणं हे एखाद्या नाटकासारखंच वाटेल ना? आपणही या जगाच्या रंगभूमीवरील एक पात्र आहोत, हे जाणवेल ना? मग ‘वैर’ उरणार नाही किंवा भूमिका वठवण्यापुरतं उरेल, अंतर्मनात पक्कं राहाणार नाही! मग जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे जणू भगवंताचं भजनच होईल. ज्याची ही स्थिती होईल, काय सुंदर शब्द आहेत.. प्रतीतिरसाचा वोतला भावो! नुसती प्रतीती नाही त्यात रसमयता आहे. प्रतीतीचा अखंड प्रवाहच सुरू आहे. ज्याला समस्त जग हे सद्गुरूमयच आहे, हे प्रचीतीनं पक्कं जाणवतं, त्याच्या जगण्यात किती रसमयता असेल! मग असा जो भक्त आहे ना, तो भक्तांमध्येही श्रेष्ठ असतो आणि ज्ञान्यांमध्येही श्रेष्ठ असतो (म्हणौनि भक्तांमाजीं राव। आणि ज्ञानिया तो चि।।) भक्तराज आणि ज्ञानियांचा राजा, म्हणतातच ना? कारण असा जो भक्तराज असतो ना, तो जगाच्या दृष्टीनं शिकलेला नसेलही, पण ज्ञान त्याच्या दारी हात जोडून उभं असतं. ‘तुम्ही नुसतं नाम घ्या, मी तुमच्या दारी कुत्र्यासारखा पडून राहीन,’ असं श्रीगोंदवलेकर महाराज यांचं वचन आहे. ते वाचून मन गलबललं. पू. भाऊंनी सांगितलं की, ‘‘श्रीदत्ताभोवतीचे चार कुत्रे हे चार वेद आहेत! श्रीमहाराजांच्या सांगण्याचाही आशय हाच की, तुम्ही नामात राहा, वेदांचं ज्ञान तुमच्या सेवेत राहील!’’ तेव्हा सद्गुरू बोधानुरूप जगणं हीच उपासना बनते तेव्हा ज्ञान आणि भक्तीपासून भक्त विभक्त होत नाही. हे कसं साधेल, ते पुढील ओव्या सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा