‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पहिल्या ओवीचं गूढार्थ विवरण पूर्ण करून आता दुसऱ्या ओवीकडे वळण्याआधी आपण ‘सद्गुरू दर्शन’ घेत आहोत. आता जो आत्मरूपानं आपल्या आत आहे त्याचं खरं दर्शन हे आत्मसाक्षात्कार होत नाही तोवर शक्य नाही. तोवर होणारं दर्शन हे ‘बाह्य़दर्शन’च असतं. थोडक्यात ज्या देहाला मी सद्गुरू म्हणून ओळखतो त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती काय होती वा आहे, लौकिकार्थानं त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांना गुरुप्राप्ती कशी व कधी झाली, त्यांना साक्षात्कार कसा झाला, यांची जंत्री आपण शोधतो. त्याचबरोबर ते कसं बोलतात, ते कसं वागतात, ते काय खातात-पितात हे आपण न्याहाळतो. ते गोरे आहेत की काळे, सशक्त आहेत की अशक्त, निरोगी आहेत की व्याधीग्रस्त, प्रेमळ आहेत की कठोर, शांत आहेत की संतापी, खूप बोलणारे आहेत की कमी बोलणारे.. अशा कुठल्या ना कुठल्या साच्यातूनच त्यांना जोखतो. हे सद्गुरूंचं खरं दर्शन नव्हेच. पण आपणही या निमित्तानं, दुसऱ्या ओवीकडे वळण्याआधी स्वामी स्वरूपानंद यांचं ओझरतं का होईना, पण बाह्य़दर्शन घेणार आहोत. आजवर आपण विविध सदरांतून सद्गुरूंची विविध रूपं आणि त्यांच्या बोधातील एकरूपता पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात एक प्रथा अशी पाळली होती की, कुणाचंही समग्र वा संक्षिप्त चरित्र न मांडता आपण थेट त्यांच्या बोधाकडेच वळलो होतो. स्वामी स्वरूपानंद यांचं ‘बाह्य़दर्शन’ म्हणजेही त्यांचं तपशीलवार चरित्र नव्हे. त्या चरित्रातले स्थूलविशेष आपण पाहणार आहोत. स्वामी स्वरूपानंद यांच्या घराण्यात आध्यात्मिक प्रवृत्तीचे संस्कार त्यांच्या आजीच्या निमित्तानं होते, हा महत्त्वाचा विशेष आहे. त्यांच्या आजी गंगाबाई यांना परशुरामपंतांशी विवाह करून उंबरठय़ावरचं मापटं ओलांडून घरात प्रवेश करून काही दिवस झाले नाहीत तोच सासूच्या कोपामुळं घर सोडावं लागलं होतं. परित्यक्त्या अवस्थेत त्या पावसहून पायी चालत नरसोबाच्या वाडीस गेल्या. रोज सकाळी कृष्णेत स्नान करावं, मग पूजा-अर्चा करावी, दुपारी भिक्षा मागून मिळेल ते ईश्वराचा प्रसाद समजून खावं आणि पूर्ण दिवस नामस्मरण, कथा-कीर्तन यात व्यतीत करावा, अशी तब्बल १२ वर्षे त्यांनी वाडीत तपश्चर्या केली. परशुरामपंतांच्या स्वप्नात एका सत्पुरुषानं येऊन पत्नीस घरी नेण्यास व सुखानं संसार करण्यास सांगितलं. तेव्हा स्वामींच्या घराण्यात तपश्चर्येचा मोठा संस्कार होता. दुसरा महत्त्वाचा योग असा की, ज्या बाबामहाराज वैद्य ऊर्फ गणेशनाथ यांचा अनुग्रह स्वामींना लाभला होता, त्यांच्याकडूनच स्वामींचे वडील विष्णुपंत आणि मामा केशवराव गोखले यांनीही दीक्षा घेतली होती. कसं आहे, मुलगा धार्मिक वळणाचा असला, की आई-बापाला आनंद वाटतो, पण ते वळण सोडून तो गुरुमार्गाला लागला तर मात्र त्यांच्याच उरात धडकी भरते. आध्यात्मिक क्षेत्रातली ढोंगी बुवाबाजी पाहता, त्यांनाही प्रारंभिक दोष देता येणार नाही. तरी हा मार्गच असा आहे की, सद्गुरूशिवाय एक पाऊलही या मार्गावर पडू शकत नाही, मुक्कामाला पोहोचण्याची गोष्ट तर मग दूरचीच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा