बद्ध माणसाला मुक्त होण्याची इच्छा नसते का? असतेच. पण त्याला जीवनातल्या अडीअडचणींतून, प्रतिकूलतेतून मुक्ती हवी असते. जीवनाचं खरं स्वरूप द्वैतमयच आहे. त्यामुळे एक अडचण संपली की दुसरी येणारच, कधी काळ चांगला असणार, कधी वाईट. कधी अनुकूलता येणार, कधी प्रतिकूलता. हे त्याच्या लक्षात येत नाही. देहसुख हेच त्याचं परमध्येय असल्यानं या सुखाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींनाच तो अडचण, समस्या, प्रतिकूलता समजून त्यांच्याविरुद्ध झुंजत असतो. सत्पुरुषांचा बोध जर लक्षात ठेवला तरच परिस्थितीचं खरं स्वरूप त्याला हळुहळू उकलू लागतं. हा बोध स्वामी स्वरूपानंद यांच्या शब्दांत सांगायचा तर, ‘‘हरघडी आपल्या प्रत्येक कृतीचा आपण विचार करायची सवय ठेवली तरीही पुष्कळ प्रगती होते. मनुष्याने आपले मन तपासले पाहिजे.’’ बद्ध स्थितीत आपण अनवधानानं वावरत असतो. आपल्याकडून बऱ्याच गोष्टी अनवधानानं घडतात आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चुकतातही! आपण अनवधानानं वावरतो, वागतो आणि म्हणून अनेकदा बोलू नये तो बोलून जातो, वागू नये तसं वागून जातो. भ्रम, अज्ञान आणि अहंकाराच्या ओढीतून आपण अविचारानं कृती करून जातो. त्यातच परिस्थितीपायी व प्रारब्धवशात जीवनात बऱ्याच उलटसुलट गोष्टीही घडतात. त्या तडाख्यानं जाग आली आणि वेगळ्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं तर बद्ध जीवनातच मुमुक्षेची पहाट होते. पू. बाबा बेलसरे सांगतात, ‘‘मानवी जीवनाला दोन अंगे आहेत. एक अंग पशुपणाचे तर दुसरे अंग देवपणाचे. पशुपणाचे अंग अज्ञानाच्या अमलाखाली वावरते तर देवपणाचे अंग आत्मज्ञानाच्या अमलाखाली वावरते. बद्ध माणसाचे जीवन पशुपणाचे जीवन असते. बद्ध माणसाच्या आशा व आकांक्षा, भावना व वासना, हौशी व हव्यास देहसुखाभोवती केंद्रित असतात. द्रव्य, दारा आणि प्रपंच यांच्या ठिकाणी त्याची बुद्धी घट्टपणे चिकटलेली असते. तिच्यावर आघात होऊन ती तेथून स्थानभ्रष्ट झाल्याखेरीज देवपणाकडे किंवा शाश्वत आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. रोग, दारिद्रय़, दैन्य, अपघात, स्वजनांचा आकस्मिक मृत्यू, या व अशा आपत्तींनी मनुष्याचे अंतरंग गदगदा हलवले जाते. त्याच्यामधील देवपणा जागा होतो आणि मग तो पशुपणातून बाहेर पडण्यासाठी तळमळू लागतो. या मनाच्या अवस्थेसच मुमुक्षुपणा म्हणतात. मुमुक्षुपणा उदय पावल्यावर माणसाला आपले पूर्वायुष्य आठवते. आतापर्यंत आपल्या हातून घडलेल्या चुकांची, कुकर्माची त्याला आठवण येऊन अतिशय वाईट वाटते. याला अनुताप असे म्हणतात. अनुताप झाल्यावाचून परमार्थ साधत नाही. एकीकडे आतापर्यंतच्या जीवनाबद्दल अनुताप आणि दुसरीकडे आत्मज्ञानाबद्दलची तळमळ, ही मुमुक्षुपणाची दोन अंगे आहेत. आत्मज्ञानाच्या तळमळीमुळे मुमुक्षु संतांची संगत धरतो आणि त्यांनी सांगितलेले साधन करून साधक बनतो.’’ समर्थ सांगतात, स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा। अंकित होईन सज्जनांचा। म्हणे तो मुमुक्षु।।

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल