आत्महित साधण्यासाठी आवश्यक ती विरक्ती, ज्ञान, भक्ती, उपासना कशी साधेल, हा खरा प्रश्न मनात उमटतो तेव्हा, स्वामी सांगतात, ‘‘स्वामी म्हणे संत दावितील खूण। घ्यावी ओळखून ज्याची त्यानें।।’’ संत खूण दाखवतील, ती ज्याची त्यानं ओळखून घ्यावी! स्वामींच्या या ‘खूण’ शब्दाशी, नित्यपाठातील ज्या ओवीचा आपण इतक्या विस्तारानं विचार करीत आहोत त्या ओवीशी सांधा जुळत आहे. ही ओवी म्हणजेच, ‘‘मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगती पुसिलें। जेणें अंत:करण बोधलें। संकल्पा न ये ।।’’ आत्महितासाठी अनिवार्य असलेली विरक्ती कशी यावी, ज्ञान कसं बिंबावं, हरी अर्थात समस्त भवदु:खाचं हरण करणाऱ्या सद्गुरूची भक्ती कशी साधावी, उपासना सहज कशी व्हावी, हा प्रश्न सद्गुरूंना विचारला की ते जे सांगतील त्यामुळे मन संकल्परहितच होईल. आता हे उत्तर कसं आहे? तर स्वामी म्हणतात की ते खूण दाखवतील! ती ज्याची त्यालाच ओळखता येईल! आता ही काय भानगड आहे? अजून एका अभंगात शब्द आहे पाहा, ‘नाथाघरची उलटी खूण’! ही उलटी खूण म्हणजे काय हो? जगाचा प्रवाह ज्या दिशेला जात आहे त्या प्रवाहाच्या उलट ती खूण आहे, म्हणून तिला उलटी खूण म्हंटलं आहे! सद्गुरूही काय सांगतील, बाबा रे, तुला विरक्ती हवी ना? मग जगाच्या प्रवाहाबरोबर प्रवाहपतीत होऊन वाहाणं थांबव. उलट जायचा प्रयत्न कर. तुला ज्ञान हवं ना? मग अज्ञानाच्या चिखलात रुतणं थांबव. माझी भक्ती हवी ना? मग जगाची भक्ती सोड. उपासनेत सहजता हवी ना? मग जगातली सहजओढ तिकडे वळव. आता जगाच्या प्रवाहात कोण कसा वाहात आहे, अज्ञानानं जगात कोण कसं गुंतलं आहे, जगासाठीची तगमग मनात किती आहे, उपासनेला बसलं तरी जगाच्या आठवणीनं मनात किती कढ येतात, हे ज्याचं त्यालाच कळेल ना? म्हणूनच सद्गुरू जेव्हा आठ-दहा जणांसमोर बोलत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याचा संदर्भ एखाद्याला समजत नाही, पण ते बोलणं ज्याला उद्देशून आहे त्याला तो संदर्भ अगदी पक्केपणानं समजतो! ही खूण ज्याची त्यालाच कळते! अगदी साधी उदाहरणं घ्या. एक साहित्यिक पावसकडे नाखुशीनंच येत होते. वाटेत ते सहप्रवाशाला म्हणाले, ‘‘स्वामी फार हळू बोलतात म्हणे, मला तर ऐकायला कमी येतं.’’ हे बोलण्याचा उद्देश हा की तिकडे जाऊन काही फारसा उपयोग नाही. स्वामींचं दर्शन झालं, स्वामी म्हणाले, ‘‘तुम्ही बहिरे आहात, मी मुका!’’ मला सांगा, त्यावेळी खोलीत बसलेल्या इतरांना या वाक्याचा अर्थ कसा कळावा? पण त्या लेखकाला तो लगेच कळला! अमलानंदांचे सुपुत्र पुरुषोत्तम तरुणपणी प्रथमच स्वामींकडे येत होते. स्वामी हे अन्य बाबाबुवांप्रमाणे दाढी राखणारे, भगवी कफनी घालणारे असतील, असा विचार प्रवासात त्यांच्या मनात दोन-तीनदा आला. प्रत्यक्ष भेटीत स्वामींना दाढीही नाही की भगवी वस्त्रंही नाहीत, हे त्यांनी पाहिलं तेव्हा स्वामी हसून म्हणाले, ‘‘मला दाढी नाही. मी साधा आहे. मी बुवा नाही!’’ आता या बोलण्याचं मर्म ज्याच्या मनात हे विचार आले, त्यांनाच कळणार ना?
 

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?