खरा सद्गुरू हा चमत्कार करून दाखविण्यासाठी वावरत नाही. त्यांच्याकडून चमत्कार होतीलही आणि साईबाबांसारख्या सद्गुरूंकडून ते विशिष्ट हेतूनं झालेही, पण चमत्काराचा आधार घेऊन ते वावरत नाहीत. आपण मात्र चमत्कारांनाच महत्त्व देतो. इथे स्वामी स्वरूपानंद यांच्या लीलाचरित्रातला एक प्रसंग आठवतो. ‘श्रीदीपलक्ष्मी’च्या मे १९६९च्या विशेषांकाचे ‘श्रीक्षेत्र पावस’ म्हणून जे पुनप्र्रकाशन झालं आहे त्यात डॉ. गो. रा. परांजपे यांनी ‘वेलु गेला गगनावरी’ या लेखात हा प्रसंग नोंदला आहे. हा प्रसंग असा : (एक साधक स्वामींच्या दर्शनास आला व म्हणाला -) ‘‘आपला अनुग्रह घेतल्यापासून मला अंत:समाधान खूप लाभलं आहे, पण आपणाविषयी मी सर्वाना सांगतो तेव्हा काही लोक मला विचारतात की, तुमचे महाराज काय चमत्कार करतात? या प्रश्नावर मी निरुत्तर होतो. मग ते म्हणतात, मग हे कसले तुमचे महाराज?’’ स्वामींनी काही न बोलता ‘संजीवनी गाथे’तला अभंग वाचायला दिला. तो अभंग असा – ‘‘दावी चमत्कार त्यासी नमस्कार। लोकव्यवहार ऐसा असे।। स्वाभावें साचार रची चराचर। त्याचा जयजयकार कोण करी।। स्व-रूपी विलीन साधु संत जन। तयांचे चरण कोण धरी।। स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी। नसेचि आवडी स्वाभाविकीं।।’’ हा अभंग वाचून झाल्यावर स्वामी म्हणाले की, ‘‘आपण वाईट वाटून घेऊ नये. लोकव्यवहार हा असाच असणार! आपण असं विचारणाऱ्या लोकांचं समाधान तरी काय करणार? चमत्कारप्रेमी लोकांनी चमत्कार करणाऱ्यांकडे जावं, एवढंच फार तर सांगता येईल. आपण आपल्या साधनेत दक्ष असावं. ईश्वरार्पण बुद्धीनं सर्व कर्मे करावीत आणि त्या भगवंताचे भक्त दास म्हणून रहावं हे सर्वात उत्तम. त्यानंच आत्मसाधन लाभते.’’ (पृ. ३३). गेल्या दोन भागांतलं चिंतन आणि चमत्काराची ही चर्चा लक्षात घेतली तर जया पुरुषाच्या ठायीं। कर्माचा तरी खेदु नाहीं। आणि फलापेक्षा कंहीं। संचरेना।। आणि हें कर्म मी करीन। अथवा आदरिलें सिद्धी नेईन। येणें संकल्पेंही जयाचें मन। विटाळे ना।।  ज्ञानाग्नीचेनि मुखें। जेणें जाळिलीं कर्मे अशेखें। तो परब्रह्मचि मनुष्यवेखें। वोळख तूं।। या ओव्यांचा तत्त्वार्थ लक्षात यायला मदत होईल. स्वामींचाच अभंग पाहा. या चराचरातले जीवन कशाच्या आधारावर चालतं? सूर्य उगवतो. त्याच्यामुळे इथली जीवसृष्टी जगते. पाण्याची साखळी कार्यरत राहाते. त्या सूर्याचा जयजयकार कोण करतो का हो? या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट याप्रमाणे सृष्टीच्या अस्तित्वाला साह्यभूत होत असते. तिचा जयजयकार कोण करतो का हो? या घटकांचं कार्य काय सामान्य आहे का? सूर्य उगवलाच नाही तर जीवन किती धोक्यात येईल. पण म्हणून आपल्या सहज अस्तित्वाच्या आधारावर चराचराला जी जीवनशक्ती मिळते त्या ‘चमत्कारा’चा गर्व सूर्याला असतो का? विराटाचा हा स्वाभाविक चमत्कार लोकांना दिसत नाही की त्याचं कौतुक नाही. लोकांना जे स्वाभाविक आहे, त्याचं अप्रूप नाही. जे कृत्रिम आहे, त्याची स्वाभाविक गोडी आहे!