आपल्या साधनेचा एकमेव हेतू जर ‘मी’चा लय हाच असेल, तर मग ‘मी’चं पोषण करणारी साधनेतली प्रगती म्हणजे अधोगतीच नाही का? गाळात फसणंच नाही का? घरा-दाराचा त्याग केला, विरक्त म्हणून लौकिक झाला, मठ-आश्रम बांधले आणि घरापेक्षा अधिक व्याप पाठीस लागले! एखाद्या प्रापंचिकापेक्षाही अधिक गुंतून गेला, तर मग त्या विरक्तीचा काय लाभ झाला? तेव्हा साधनेत अशी प्रगती होण्यापेक्षा सामान्यात सामान्य साधक म्हणून जगणं अधिक चांगलं. श्रीगोंदवलेकर महाराज जे सांगत ना की, मला श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो, विद्वानापेक्षा अडाणी आवडतो.. सर्वच सद्गुरूंची हीच आवड आहे. भौतिक आसक्तीच्या श्रीमंतीपेक्षा त्या आसक्तीची गरिबी ज्याच्या उरात आहे, तोच त्यांना आवडतो. शाब्दिक ज्ञानाची झूल पांघरलेल्या विद्वानापेक्षा, लहान मुलाला जसं आईपलीकडे काहीच माहीत नसतं, त्याप्रमाणे अज्ञभाव असलेला भक्त त्यांना आवडतो. तुकाराम महाराजही म्हणतात, आई अशाच अजाण मुलाला कडेवर घेऊन असते आणि थोडी समज आलेल्या मुलाला खाली उतरवते. तेव्हा अशा फसव्या अनुभवांच्या सापळ्यात अडकून आपल्याला थोडं अधिक समजू लागलं, असं वाटू लागलं तर माउलीनं आपल्याला, ‘जाणते लेकरू माय लागे दूरी धरू’ म्हणून दूर केलं आहे, हे पक्कं समजावं. तेव्हा या क्षुद्र जीवनात परमात्मलयतेपेक्षा दुसरा कोणताच अनुभव श्रेष्ठ नाही आणि तो अनुभव घेतलेला वेगळेपणानं उरतच नाही, असं संत सांगतात. आपल्या साधनेचा, उपासनेचा तोच एकमेव हेतू आहे आणि असलाच पाहिजे. माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही, माझ्यासारखा सिद्ध कोणी नाही, माझ्यासारखा विरक्त कोणी नाही, असा भाव असेल तर साधनेत प्रगती नव्हे, अधोगतीच झाली आहे, हे पक्कं लक्षात ठेवावं. साधना सुरू आहे आणि काही नाद ऐकू आला, रंग दिसला, प्रकाश दिसला तरी ती भगवंताचीच इच्छा मानली पाहिजे. रंगासाठी, प्रकाशासाठी, नादासाठी साधना नाही. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी साधना नाही. गुरु-शिष्य निघाले होते. वाटेत नदी लागली. नावाडी दिसेना. शिष्य उत्साहात म्हणाला, चालत जाऊन पार करू की. गुरू थबकला, तसा दुप्पट उत्साहानं शिष्य पाण्यावरून चालत गेला. थोडय़ा वेळानं नाव आली. गुरू नावेतून नदी पार करून आला. शिष्याला म्हणाला, जे काम चार आण्यात होतं त्यासाठी इतकी तपस्या कशाला खर्च केलीस? म्हणजे साधनेचा अमूल्य लाभ हा क्षुद्र गोष्टींच्या पूर्तीकरता वाया घालवण्यासाठी नाही. मला केवळ साधना करायची आहे. त्यातली प्रगतीचे परिमाण एकच. माझ्या मनातली ओढ किती कमी झाली? मनातली अस्थिरता किती कमी झाली? जर सिद्धींद्वारे लोकांवर प्रभाव पाडता आला पण मनातली जगाविषयीची ओढ संपलेली नाही, तर कसली प्रगती? रामकृष्ण परमहंस सांगत ना? गिधाड उंच आकाशात उडत असतं पण नजर असते जमिनीवर पडलेल्या सडक्या प्रेतावर! तसं उत्तुंग शिखरावरून पाहतानाही जर गाळातच देहसुख अखंड राखण्याची ओढ असेल तर उंचीवर पोहोचल्याचा काय लाभ?