मन पूर्ण कामनारहित झालं, निश्चळ झालं, ही स्थिती साधणं सोपं नाही. ही स्थिती सोडा, ती नुसती नजरेच्या टप्प्यात आली किंवा ती स्थिती आपल्याला साधत आहे, असा भाव जरी मनात प्रसवला तरी एक धोका उद्भवू शकतो, त्याचंच सूचन आणि त्याबाबतचा बोध पुढील सहा ओव्यांत आहे. मन काही काळासाठी कामनारहित होऊ लागलं, काही काळासाठी निश्चळ होऊ लागलं तरी जगाचं खरं भ्रामक रूप समजू लागतं. आपल्या कर्तेपणाचा भ्रम संपू लागतो. इथे एक धोका उद्भवतो तो असा की काहीच करू नये, अशी मनाची स्थिती होऊ लागते. अशा मनाला सावध करणाऱ्या या सहा ओव्या आहेत! स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील २९ ते ३४ क्रमांकाच्या या ओव्या अशा :
परिस पां सव्यसाची। मूर्ति लाहोनि देहाची। खंती करिती कर्माची। ते गांवढे गा।।२९।। (अ. ३/ १४५). देख पां जनकादिक। कर्मजात अशेख। न सांडितां, मोक्षसुख। पावते जाहले।।३०।। (३/ १५३). देखें प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयांही कर्तव्य असे उरलें। लोकांलागीं।।३१।। (३/१५५). मार्गी अंधासरिसा। पुढें देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा। आचरोनि।।३२।। (३/ १५६). एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्म ठेविती। तें चि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। ३३।। (३/१५८). हें ऐसें असें स्वभावें। म्हणौनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागे संतीं।। ३४।। (३/ १५९).
प्रचलितार्थ :  अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता, जे कर्माचा कंटाळा करतात, ते अडाणी आहेत (२९). पाहा, कर्ममात्रांचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले (३०). पाहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळविले व म्हणून निरिच्छ झाले, त्यांनादेखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे (३१). रस्त्याने दृष्टिहीनाच्या पुढे चालणारा माणूस जसे त्याला सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने अज्ञानी जनांना आपल्या आचरणातून धर्म स्पष्ट करून दाखवावा (३२). या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात (३३). अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही. इतकेच काय, तर संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे (३४).
विशेषार्थ विवरण: खरं पाहता या ओव्यांचा प्रचलित अर्थच पुरेसा स्पष्ट आहे. तरी त्यांचं विवरण करू. सद्गुरूंचा सहवास जसजसा वाढू लागतो तसतसा आपल्या मनातला इच्छांचा झंझावात ओसरत आहे, जगाकडूनच्या अपेक्षांचा कचरा कमी होत आहे, जे आवश्यक आहे ते मिळत आहे, परिस्थिती आणि माणसं बरीचशी अनुकूल राहात आहेत, असा अनुभव येऊ लागतो. सद्गुरूंच्या आधारानं अशी निर्भयता येते की जगात वावरताना मन पूर्वीसारखं पदोपदी कचरत नाही. दबकत नाही. ‘आपण कुणीतरी झालो’, हा भ्रम मग ताबा घेतो!