जेव्हा तुझं अवघं मन माझंच होतं, तू माझ्याशीच एकरूप होतोस, तेव्हा ‘मागील’ सर्व निर्थक होऊन जातं, असं भगवंत सांगतात. या ‘मागील’चा एक अर्थ म्हणजे मागच्या चुका, असा आपण पाहिला. तोच अर्थ प्रचलितही आहे; पण ‘मागील’चा दुसरा अगदी समर्पक अर्थ म्हणजे भक्ताच्या मागचे पाश, भक्त ज्या समाजात, ज्या स्तरावर जन्मला आहे ती त्याच्या मागे त्याला चिकटलेली पाश्र्वभूमी, त्याच्या मागे असलेल्या उपाध्या आणि हा अर्थ लक्षात ठेवला की ‘नदीनाल्याचं पाणी गंगेला मिळालं की गंगारूपच होतं,’ या ओवीनंतरचा पुढील दोन ओव्यांचा अर्थही अधिकच लख्खपणे लक्षात येतो. या ओव्या अशा- ‘‘तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया। कां शूद्र अंत्यजादि इया। जाती तंव चि वेगळालिया। जंव न पवती मातें।। ७४।। (ज्ञा. अ. ९, ओवी ४६०). यालागीं पापयोनीहि अर्जुना। कां वैश्य शूद्र अंगना। मातें भजतां सदना। माझिया येती।। ७५।।’’ (अ. ९, ओवी ४७४). या ओव्या म्हणजे कुणाचा अवमान करणाऱ्या मानू नका. १८व्या ओवीच्या चर्चेत आपण या विषयाला स्पर्श केला आहेच. सत्ताधीश, ज्ञानाचा मक्ता असलेले, व्यापार उदीम करणारे आणि हातातोंडाची हातमिळवणी करताना उपेक्षित अवस्थेत अपार परिश्रम करत जगण्याची लढाई लढत असलेले; या चार वर्गात जग आजही विभागलेले आहे. या कोणत्याही वर्गात का जन्म होईना जो माझ्याशी एकरूप होतो तो माझ्यापाशीच पोहोचतो, माझाच होतो, मीच होतो, असं भगवंत सांगत आहेत! त्याचबरोबर इथे स्त्रियादेखील माझी भक्ती करतील तर माझ्यात विलीन होतील, असा उल्लेख आहे आणि आजच्या समानतेच्या काळात हा उल्लेखही अनेकांना खटकेल. पण सर्व साचेबद्ध धारणा दूर ठेवून आजच्या प्रगत युगात डोकावलं तरी काय दिसतं? घरातल्या जबाबदाऱ्या स्त्रीच्याच डोक्यावर आणि डोक्यात अधिक आहेत. तिनं थोडं दुर्लक्ष करू दे, घराचा सारा डोलारा अव्यवस्थित होतो. अध्यात्म साधनेसाठी पुरुष अविवाहित राहू शकतो किंवा लग्न करूनही जगात हवा तसा मुक्त वावरू शकतो. स्त्रीला घर असा पाठिंबा देतं आणि देईल का? सकाळी जाग येताच आजचा स्वयंपाक, मुलांचे डबे, संध्याकाळी येताना काय काय आणायचं आहे, हा विचार पुरुषाच्या मनाला कधी शिवतो का? स्त्रीला सकाळीच या विचारांसोबत जाग येते. तेव्हा या काळातही जर जबाबदाऱ्यांतून स्त्री मनानंही सुटलेली नाही तर हजारो वर्षांपूर्वीची स्थिती काय असेल? तेव्हा अशा अनंत जबाबदाऱ्या शिरावर असतानाही जर स्त्री मनानं माझ्या भक्तीकडे वळू लागेल तर तिच्या मागचे पाश हळूहळू निर्थक होतील. आता कोणत्याही समाजगटातील कोणीही जेव्हा माझी भक्ती करू लागेल तेव्हा त्याचे पाश ‘निर्थक’ होतील, म्हणजे काय हो? तर त्यांच्या त्या जगण्यालाच दिव्य अर्थ प्राप्त होईल! संसार काय हो हजारो लोकांनी केला, पण एकनाथांच्या संसाराची सर कशाला आहे का? तोच संसार, पण किती दिव्य होता! राज्य हजारो राजांनी केलं, पण जनकाच्या कारभाराची सर कशाला आहे का? तेव्हा भक्ताच्या जीवनाची दृश्य चौकट कशीही असो, भक्तीने तीच दिव्य होते, असा ‘मागील वावो’चा अर्थ आहे!