रोजच्या धावपळीच्या जीवनातलं एक निमिषमात्र द्यायला भगवंत प्रथम सांगत आहेत. त्या एका निमिषानं काय होणार आहे, हे पाहण्याआधी आपल्या जीवनाकडे एक नजर टाकली पाहिजे. आपलं रोजचं जीवन कसं आहे? ते ‘अहं’च्या स्फुरणानं झपाटलेल्या मनानं ‘मी’च्या सुखासाठीचं धावणं आहे. त्या धावण्यात क्षणाचीही उसंत नाही. आपण का धावतोय? काय मिळवायला धावतोय? किती धावतोय? याचा विचार करायलाही आपल्याला क्षणाचीदेखील सवड नाही. मग मन धावत आहे, बुद्धी धावत आहे. ठेचकाळते आहे, दुखावते आहे, पण तरी अनवधानानं धावणं काही थांबत नाही. त्या धावपळीतलं एक निमिष सद्गुरू मागत आहेत! काय होईल हो त्या निमिषानं? दिवस-रात्रीच्या धावपळीतलं एक निमिष देणं म्हणजे त्या क्षणापुरतं धावणं थांबवून स्थिर होणं! त्या निमिष-दानातून अवधान येईल. अंतर्मुखता येईल. आपल्याच जगण्याकडे किंचित अलिप्तपणे पाहता येईल. महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक ‘कृष्णाच्या आई’ राहतात. बाळकृष्णाच्या मूर्तीच्या ‘पालनपोषणा’त त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण समर्पित आहे. त्यांच्या घरात प्रथम प्रवेश करताना, ‘या वेडय़ा तर नाहीत?’ असा प्रश्न भेडसावत होता. त्या घरातून बाहेर पडताना ‘आपणच खरे वेडे आहोत,’ ही जाणीव मन पोखरत होती. त्यांच्या घरी गेलो. आम्ही नेलेला खाऊ मोठय़ा प्रेमानं कृष्णाला भरवण्यात त्या रमल्या होत्या. वीज गेल्यानं बाहेर अंधार पसरला होता. खोलीतल्या मोठय़ा निरंजनाची ज्योत भगभगत होती. तेवढाच काय तो प्रकाश. माझा मित्र म्हणाला, ‘आई, जीवनात दु:ख आहे!’ त्या क्षणभर थांबल्या, हसल्या आणि उंबरठय़ापासून दाराबाहेर हात पसरवीत म्हणाल्या, ‘इथून पुढे दु:खच तर पसरलं आहे!’ आम्हा दोघांनाही अगदी खरेपणानं वाटलं की हो, या उंबरठय़ाआतच खरं सुख नांदत आहे! पण जे या उंबरठय़ाअलीकडे आहे, ते पलीकडच्या जगात सर्वत्र का नाही? ते बाहेरही आहेच. फक्त अहोरात्र धावण्याच्या नादात आम्ही त्याच्यावरच पाय देऊन पुढे जात आहोत! मी जर एक निमिष थांबलो, ते निमिष त्याला दिलं ना, तर तो फार मोठं दान पदरात टाकेल! काय होईल हो या एका निमिषानं? कोणतं दान माझ्या पदरात पडेल? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ८६वी ओवी ते ‘दान’ सांगते! ही ओवी अशी : ‘‘मग जें जें कां निमिख। देखेल माझें सुख। तेतुलें अरोचक। विषयीं घेईल।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी १०६). त्या एका निमिषानं मनाला जी शांती मिळेल ना, त्यामुळे आणखी काही निमिष आपोआप दिले जातील! त्या प्रत्येक निमिषानं परमात्म्याच्या चिंतनाचं, मननाचं सुख जाणवू लागेल. मग काय होईल हो? विषयात अरुची निर्माण होईल. आपली अत्यंत प्रिय व्यक्ती दुरावली, तर आवडीचा पदार्थही गोड लागत नाही की आवडीच्या गोष्टींतही मन रमत नाही. तशी परमात्म्याची आवड निर्माण झाली ना की त्याच्या निमिषमात्र दुराव्यानं आधीच्या आवडत्या विषयातही गोडी वाटणार नाही! मग जी अनुपम स्थिती येईल तिचं वर्णन ‘नित्यपाठा’तील पुढील ओवीत आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा