केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत? हे स्वामी, असा कोणता मार्ग आहे, असा कोणता उपाय आहे की ज्यायोगे देहधारी मनुष्य हा ब्रह्ममय होईल? आता ‘ब्रह्म’ काय आहे? ब्रह्म म्हणजे अमर्यादाचं, असीमतेचं, अथांगतेचं, व्यापकत्वाचं सूचन आहे. देह हा स्थूल आहे. स्थूलाला मर्यादा आहेत, सीमा आहे, संकुचितता आहे. त्यामुळे देहधारी माणूसही मर्यादेत बद्ध आहे, सीमेत कोंडला आहे, संकुचित जिणं जगत आहे. हा माणूस व्यापक कसा होईल? माणसाचा देह स्थूल असला ना तरी माणसाच्या भावना आणि जाणिवा या सूक्ष्म असतात. आनंदाची जाणीव माणसाला सर्वात सुखावणारी आणि म्हणूनच हवीशी असते. सनातन तत्त्वज्ञान तर सांगतं की, परमानंद हेच माणसाचं मूळ स्वरूप आहे. त्यामुळे आनंदाशिवाय त्याला चैन पडत नाही. पाण्यातली मासोळी पाण्याबाहेर काढताच तडफडू लागते कारण पाणी आणि तिच्यात अद्वैतच आहे जणू! तद्वत् आनंदापासून दुरावताच माणूस तडफडू लागतो. आता आपणही आनंदाचा अनुभव घेतो, पण या आनंदाची व्याप्ती सांगू शकतो का? मोजमाप करू शकतो का? मर्यादा सांगू शकतो का? आनंदात असताना, सगळेच क्षण आनंदानंच व्याप्त असतात. तेव्हा भावना, जाणिवा या सूक्ष्म असतात आणि जे सूक्ष्म असतं ना ते अधिक शक्तीमान, अधिक व्यापक, असीम असतं. तरी माणसातील सर्व भावना व जाणिवा त्याच्या स्थूल देहाशीच जखडल्यानं त्यांनाही मर्यादा येते, सीमाबद्धता येते, संकुचितपणाचा स्पर्श होतो. तेव्हा देहबुद्धीमुळे क्षणिक आनंदाचा अनुभव घेणारा देहधारी जीव खऱ्या अर्थानं परमानंद कसा भोगेल, असीम आनंद कसा प्राप्त करून घेईल, व्यापक कसा होईल; असा पार्वतीमातेचा प्रश्न आहे! आता जिवाला जर ब्रह्ममय व्हायचं असेल तर आधी ‘ब्रह्म’ म्हणजे काय, हे तर जाणलं पाहिजे! म्हणूनच शिवजी सांगतात, ‘‘गुरूंविना ब्रह्म नान्यत् सत्यं सत्यं वरानने!’’ हे देवी, सद्गुरूवाचून ब्रह्म अन्य नाहीच! या समस्त चराचरात सद्गुरुशिवाय खरा व्यापक, खरा शाश्वत, खरा असीम, खरा अथांग कोणीच नाही! तेव्हा जर देहधारी जिवाला ब्रह्ममय व्हायचं असेल तर उपाय एकच, आधी त्याला सद्गुरूमय व्हावं लागेल! हा ‘गुरू’ मात्र खरा पाहिजे. जो स्वत: आशेत बद्ध आहे तो माझ्यातील अनंत आशांचा निरास करू शकणार नाही. जो स्वत:च भ्रमाच्या चिखलात रूतला आहे तो मला दलदलीतून बाहेर काढू शकणार नाही. जो स्वत: अनंत कामनांच्या बेडय़ांत जखडला आहे तो मला कामनांपासून मुक्त करूच शकणार नाही. तेव्हा खऱ्या सद्गुरूशी तन्मय होणं, एकरूप होणं हाच ‘ब्रह्ममय’ होण्याचा एकमात्र उपाय, एकमात्र मार्ग आहे. मग जीव गोंधळून काय म्हणेल? अहो अमक्या पुराणात तर अमका देवच सर्वश्रेष्ठ सांगितला आहे, अमक्या वेदामध्ये तर असं भाष्य आहे, अमकं शास्त्र तर असं सांगतं. त्यावर शिवजी स्पष्ट बजावतात, वेद, शास्त्र, पुराणं, मंत्र-यंत्रादि विद्या, आगम-निगमादि पंथ हे सर्व कसे आहेत? तर ‘अपभ्रंशकराणिह जीवानां भ्रांतचेतसाम्’! आधीच भ्रमित झालेल्या जिवाला अधिकच भ्रांतीत पाडणारे आहेत!
१४७. उपाय
केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत? हे स्वामी, असा कोणता मार्ग आहे, असा कोणता उपाय आहे की ज्यायोगे देहधारी मनुष्य हा ब्रह्ममय होईल?
First published on: 29-07-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan remedy