सद्गुरूंच्या सान्निध्यात संसारापासून अलिप्त झालेलं मन वेगळ्याच पातळीवर विहरत असतं. त्या मनाला भीतीचा जणू स्पर्शही उरत नाही. जिवानं साधनसिद्ध होऊन ही स्थिती कायमची हस्तगत करावी आणि टिकवावी, हीच सद्गुरूंची इच्छा असते. ते जसे द्वंद्वातीत असतात तसंच शिष्याला करू इच्छितात. त्यांची स्थिती कशी असते? ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ३७वी ओवी या स्थितीचं वर्णन करते. त्या ओवीकडे वळण्याआधी एक दुरुस्ती करायला हवी. आजवर आपण स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठ’ असा उल्लेख करीत होतो, तो संकलित नसून संपादित असा हवा, ही गोष्ट श्री. श्रीकांत ऊर्फ बाबूराव देसाई यांनी आत्मीयतेनं नजरेस आणून दिली. वरवर पाहता संकलित आणि संपादित यामधला सूक्ष्म भेद पटकन जाणवत नाही. पण ‘नित्यपाठ’ हे ज्ञानेश्वरीचं सारस्तोत्ररूपच आहे. ‘ज्ञानेश्वरी’च्या हजारो ओव्यांतून १०९ ओव्यांची निवड करायची आणि त्या एका सूत्रबद्ध क्रमात गुंफायच्या हे श्रेष्ठ संपादनच आहे. यात १४ आणि १५व्या अध्यायातली एकही ओवी जरी नसली तरी त्यामागेही संपादकाचीच दृष्टी आहे. विस्तारभयास्तव हा विषय इथेच थांबवू आणि आता स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३७वी ओवी पाहू. ती अशी :
तयाहि देह एक कीर आथी। लौकिकीं सुखदु:खी तयातें म्हणती। परी आम्हातें ऐसी प्रतीति। परब्रह्म चि हा।। ३७।। (अ. ६ / ४०८)
प्रचलितार्थ :  त्यालाही (त्या योग्यालाही) एक देह आहे आणि लोकात त्याला सुखी-दु:खीही म्हणतात, हे खरे आहे. परंतु आमचा असा अनुभव आहे की तो परब्रह्म आहे.
विशेषार्थ विवरण: हे सद्गुरूचंच वर्णन आहे. द्वंद्वमय संसारात सद्गुरू येतात आणि तेदेखील द्वंद्वमय परिस्थितीतच वावरतात. वरकरणी पाहता ते माझ्यासारखेच देहधारी असतात, माझ्यासारख्याच द्वंद्वमय प्रपंचात असतात आणि म्हणून ते मला माझ्याप्रमाणेच सुख आणि दु:ख भोगत आहेत, असं वाटतं पण प्रत्यक्षात द्वंद्वातीत, त्रिगुणातीत अशा परब्रह्माचंच ते देहरूप असतात आणि त्यामुळे त्यांना सुख-दु:खादी स्थिती स्पर्शतही नाही. स्वामी स्वरूपानंद यांनी एका अभंगात या स्थितीचं वर्णन केलं आहे. स्वामी म्हणतात- ‘‘छाया तैसा देह मानितों स्वभावें। नाहीं आम्हां ठावें सुख-दु:ख।।’’ सावली कशी असते? ती सदोदित सोबतीला असते. देहाला चिकटूनच असते. आपल्या मनात देहबुद्धी त्या सावलीसारखी वावरत असते. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण देहबुद्धीनुसारच विचार करतो, वागतो, बोलतो, वावरतो. सत्पुरुष देहालाच सावली मानतात त्यामुळे त्यांना देहबुद्धीला जाणवणारं सुख-दु:ख, अर्थात समस्त द्वैत शिवतच नाही. नाथांच्या एका रूपकानं ही गोष्ट स्पष्ट होईल. नाथ म्हणतात, रस्त्यानं चालताना आपली सावली पालखीत पडली काय किंवा गटारात पडली काय, आपल्याला त्याची काळजी वाटते का? सुख-दु:ख वाटतं का? त्याप्रमाणे देहालाच सावली मानणारा सत्पुरुष त्या देहाच्या सन्मानानं आनंदत नाही की अपमानानं दुखावत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा