सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते, परंतु ती क्षुद्र फळासाठी असते. जशी वासना तसे फळ, असं विनोबा सांगतात. तेव्हा आपण दिवस-रात्र कर्मात गुंतलो असलो आणि त्या कर्मासाठी सारी शक्ती पणाला लावून धडपडत असलो तरी आपली र्कम ही संकुचित हेतूनंच पार पडत असतात. त्यामुळे त्यांचं फळही संकुचितच असतं. जर ती र्कम भगवद्भावानं व्याप्त होऊन, पूजा म्हणून केली जातील तर कर्मप्रारब्धातून मुक्त होत असतानाही आपला आत्मविकासही साधला जाईल, असं विनोबांच्या बोधाच्या अनुषंगानं या ओवीबाबत म्हणता येईल. प्रापंचिक साधकासाठीचा तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।। या ओवीचा विशेषार्थ आपण तपशिलात जाणून घेतला. आता साधनेत प्रगती केलेल्या साधकासाठी याच ओवीचा जो विशेषार्थ आहे, त्याकडे वळू. त्याआधी एक स्पष्ट केलं पाहिजे. प्रापंचिक साधक आणि साधनेत प्रगती केलेला साधक याचा अर्थ गृहस्थाश्रमी साधक व संन्यासी साधक असा नव्हे. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे ज्याची ओढ आहे, मग तो गृहस्थाश्रमी असो वा संन्यासी, तो प्रापंचिकच साधक आहे. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे भगवंताकडे ज्याची ओढ आहे, तो मग गृहस्थाश्रमी असो की संन्यासी, तोच खरा भगवंताचा भक्त आहे. इथे साधनेत प्रगती केलेला साधक, हा मधलाच वर्ग मानला पाहिजे! तर या साधनेत प्रगती करीत असणाऱ्या साधकाला हीच ओवी सांगते की, ‘‘साधनपथावर तुझ्याकडून स्वाभाविकपणे ज्या काही यौगिक क्रिया घडतील त्या घडूनही माझ्याविषयीचा भाव गमावू न देता अर्थात अहंकाराचा स्पर्श मनाला होऊ न देता साधनेतील हे कथित यशही माझ्याचकडे वळवून टाक.’’ साधना जसजशी वाढत जाते आणि अंतर्मनावर खोल ठसा उमटवू लागते तसतसे काही अनुभव येऊ शकतात.  हे अनुभव दोन प्रकारचे सांगता येतील. पहिले अनुभव आंतरिक असतात तर दुसरे बाह्य़. आंतरिक अनुभव हे यौगिक क्रियांद्वारे येऊ शकतात. नाद, रंग, प्रकाश, ज्योतीर्दर्शन, बिंदूदर्शन वगैरे.  वेदामध्ये तेज हे भगवंताचं सर्वात चिवट आवरण आहे, असं म्हटलं आहे! अर्थात तेजापलीकडेही तो अनंतपणे आहेच. पण तेजाचं दर्शन होण्यालाच आपण भगवंताचा साक्षात्कार मानतो आणि फसतो! तेव्हा असे कोणतेही अनुभव आले तरी ते खरं तर तुच्छच आहेत. ते अडकवणारेच आहेत. मूल रडू लागलं की आई त्याच्यापुढे खेळणी टाकते. खेळण्यांत ते गुंतलं तर मग तिला पाहावं लागत नाही. तसं सिद्धींच्या खेळण्यात साधक गुंतून गेला तर माय दुरावतेच! गंमत अशी की, अंतर्विश्वातील अनुभवांपेक्षा स्थूल जगतातील अनुभव अधिक भुलवू शकतात. उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येणं, बोलल्याप्रमाणं घडणं, एखाद्याला दिलासा दिल्यानंतर त्याची समस्या सुटणं, वगैरे. असे अनुभव अत्यंत घातक असतात आणि उंच शिखरावरून एखाद्याला थेट दरीत फेकावं तसं ते अखेरीस साधकाला उच्च शिखरावरून खाली फेकून देतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा