स्थूल देहबुद्धीत जो अडकला आहे, त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा त्या देहबुद्धीवर प्रभाव असलेल्या, ती देहबुद्धी जोपासणाऱ्या भौतिक पसाऱ्याच्या प्राप्तीत, जोपासनेत आणि बचावातच व्यतीत होणार. त्यामुळे केवळ आत्मस्वरूपात निमग्न राहून वावरत असलेल्या सत्पुरुषाचं महत्त्व त्याला कसं कळणार? वरकरणी पाहाता भौतिक विकासात अलिप्त असणारा योगी हा त्याला निष्क्रीयच वाटणार! ज्या ओढीनं आपण कर्माच्या जाळ्यात गुंतून असतो, ती ओढच ज्याच्या चित्तात नाही त्याचा वावर त्याला कसा रुचणार? वरकरणी पाहता निष्क्रीय माणूस आणि ‘स्व’स्थ साधू एकसारखे भासतीलही, पण आंतरिक स्थितीच्या दृष्टीने पाहू जाता साधूइतका, सद्गुरूइतका कर्मशील कुणीही नाही! देहबुद्धीत अडकलेल्या जिवाची सूक्ष्म सद्बुद्धी जागी करून त्याला आत्मस्वरूपाप्रत अग्रेसर करणं, या इतकं विराट कार्य कोणतं? पण त्यांची ही आंतरिक सर्वोच्च स्थिती जाणवतही नाही. सद्गुरू म्हणजे मनुष्य वेषात प्रकटलेलं परब्रह्मच आहे, याची जाणीव स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील तीन ओव्या करून देतात. या ओव्या, त्यांचा नित्यपाठातील आणि ज्ञानेश्वरीतील क्रम, त्यांचा प्रचलित अर्थ आणि मग विशेषार्थ विवरण पाहू. या ओव्या अशा :
जया पुरुषाच्या ठायीं। कर्माचा तरी खेदु नाहीं। आणि फलापेक्षा कंहीं। संचरेना।।४४।। (अ. ४ /१०३) आणि हें र्का मी करीन। अथवा आदरिलें सिद्धी नेईन। येणें संकल्पेंही जयाचें मन। विटाळे ना।। ४५।। (अ. ४/ १०४) ज्ञानाग्नीचेनि मुखें। जेणें जाळिलीं कर्मे अशेखें। तो परब्रह्मचि मनुष्यवेखें। वोळख तूं।। ४६।। (अ. ४/ १०५).
प्रचलितार्थ :  ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो, पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकूनही केव्हाही प्रवेश करीत नाही (४४) आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले पूर्णत्वास नेईन, या कल्पनेनेही ज्याचं मन विटाळत नाही (४५) ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्यानं सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचं रूप घेतलेलं प्रत्यक्ष ब्रह्मच आहे, असं तू समज. (४६).
विशेषार्थ  विवरण :  परमात्मऐक्य भावातून जगात सद्गुरू ज्या अकर्तेपणानं वावरत असतानाही जे विराट कार्य करीत असतात, त्याचं हे वर्णन आहे. हे कार्य विराट अशासाठी की, त्यांच्या चित्तात भोगेच्छा वा ती ज्यातून उत्पन्न होते तो संकल्प यांचा पूर्ण अभाव असतो. (मायेत अधिक गुंतवणारी भोगेच्छा ज्या संकल्पातून उगम पावते तोच ‘पापसंकल्प’) तसेच आत्मज्ञानाचा अग्नी सतत तिथे प्रज्ज्वलित असतो. त्यामुळे त्यांची सर्व कर्मेही त्या ज्ञानाग्नीलाच ‘स्वाहा’ होतात, अर्थात ती कर्मे आत्मस्थितीला अनुरूप होतात, संकुचित ‘स्व’चा तिथे त्याग असतो त्यामुळे ती कर्मे परमेश्वराच्या इच्छेने, व्यापक व सहजतेने होतात. आता यात विराट कार्य कोणतं? तर जशी त्यांची आंतरिक स्थिती असते तशीच जिवाचीही स्थिती ते करतात! त्यांचं हे रहस्य ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ या शब्दांत तुकोबांनी सांगितलं आहेच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा