ॐचे ध्वन्यात्मक आणि भाषिक तसंच मंत्ररूप आपण पाहिलं. आता प्रतीकरूपाच्या आणि विश्वरूपाच्या अंगानं त्याचा विचार करू. ‘अध्यात्म दर्शन’ या ग्रंथात पू. बाबा बेलसरे सांगतात की, ‘‘आपण जोवर इंद्रियांनी दिसणाऱ्या (जाणल्या जाणाऱ्या) जगाच्या कक्षेत आहोत तोपर्यंत मूळ परमात्म स्वरूपाचा काय किंवा ईश्वराचा काय, विचार करताना कोणते तरी प्रतीक वापरल्यावाचून गत्यंतर नाही. मानवी ज्ञानाला मर्यादा असल्याने सर्व धर्मात आणि पंथांत कोणत्या तरी रुपाने प्रतीकाची पूजा रूढ आहे. परमात्म स्वरूप सगळ्या मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने व्यावहारिक भूमिकेवरून त्याचे वास्तविक ध्यान किंवा चिंतन संभवत नाही. काहीतरी प्रतीक घेतल्यावाचून हे चिंतन घडत नाही. आपल्या हाताशी असलेल्या सर्व प्रतीकांमध्ये अत्यंत सूक्ष्म, सर्वाना सारखे आणि कायम टिकणारे ‘शब्द’ हे एकच प्रतीक आहे. म्हणून ॐकाराला शब्दब्रह्म म्हटले आहे.’’ तेव्हा ॐ हे प्रतीक आहे. प्रतीक हे मूळ वस्तूकडे संकेत करते. मूळ वस्तूची जाणीव रुजवते. त्यामुळे ॐ हे परमात्मतत्त्वाचं प्रतीक असल्यानं ते साधकाच्या अंतरंगात परमतत्त्वाचं स्मरण आणि जाणीव रुजवते. आता स्वामी रामतीर्थ जे सांगतात की,  ॐ हा विश्वाचा निदर्शक शब्द आहे, त्याचा अर्थ काय? आता असं पाहा, आपली ही जी विराट सृष्टी आहे, ती कुठून कुठवर आणि कशी पसरली आहे, हे आपल्याला उकलत नाही. विज्ञानाने घेतलेली भरारी मोठीच आहे आणि त्यामागे शास्त्रज्ञांची तपश्चर्या आहे, हे खरेच. तरीही संपूर्ण सृष्टीचा आवाका आपल्याला पूर्णपणे जाणवलेला नाही. आमच्या तुकाराममहाराजांना मात्र विश्वरचनेचं मोठं सूत्र सापडलं! त्यांनी ते एका अभंगात लिहिलं आहे. त्याचा मथितार्थ असा की, उंबराच्या फळातल्या किटकाला असं वाटतं की जग हे हेच आहे, एवढंच आहे. तो फळाबाहेर पडतो आणि त्याला बाजूलाही उंबराची काही फळं दिसतात. तो उद्गारतो, जग हे एवढंच आहे. मग त्याला दिसतं की, अरे ही फळं एका झाडाला लगडली आहेत.  मग त्याला वाटतं की विश्व म्हणजे हे झाडच आहे. मग तो पाहतो की अशी अनेक झाडं आणि त्यांना अशी अनेक फळं लगडली आहेत. मग तो म्हणतो, विश्व हे हेच आहे, एवढंच आहे. अगदी त्याचप्रमाणे विश्व नेमकं केवढं आहे, याची आपली माहिती शोधागणिक वाढत आहे. ते स्वाभाविकही आहे. पण कुणीतरी तर असा असेलच ना, ज्याला या संपूर्ण चराचराचा आदी-अंत माहीत आहे. समजा एका व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला एका खोलीत नेऊन सोडलं. मग तो जेव्हा खोलीतून बाहेर पडेल, तेव्हाच त्याला ती खोली लहानशा इमारतीत आहे की मोठय़ा प्रासादात आहे, हे समजेल. जो या समस्त सृष्टीपासून वेगळा होईल त्यालाच ही सृष्टी नेमकी समजेल. असा कोण असू शकतो? एकतर तो परमात्माच असू शकतो किंवा तोच झालेला, म्हणजे ‘स: इव’ अर्थात शिव असू शकतो! शिवानं ही सृष्टी पूर्ण पाहिली. तिचा नकाशा काढला. तो म्हणजे ॐ! म्हणून ॐ हा विश्वाचा निदर्शक आहे. चराचराचं प्रतीक आहे. ॐ मध्ये चराचर व्याप्त आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा