बद्ध कोणाला म्हणतात अर्थात बद्धाची लक्षणं कोणती आणि मुमुक्षुची लक्षणं कोणती हे आपण दासबोधाच्या आधारे जाणून घेतलं. साधक कसा असतो, साधकानं काय साधावं, हे आपण पू. बाबा बेलसरे यांच्या विचारांतून त्रोटकपणे पाहिलं आणि स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांचे मित्र पटवर्धनमास्तर यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे, साधना नेटानं कशी करावी, याबाबतचा बोध आपण पाहिला. साधक आणि सिद्ध या दोन स्थितींबाबत आपण थोडा आणखी विचार करणारच आहोत, पण त्याआधी या चारही टप्प्यांवर मोहाचा जो धोका आहे, तो प्रथम जाणून घेऊ. बद्ध, मुमुक्षु, साधक या तीन टप्प्यांवरच नव्हे तर सिद्ध या चौथ्या टप्प्यावरही घसरण होऊ शकते आणि त्या घसरणीमागे कोणता ना कोणता मोहच असतो. मोहाचे ते प्रकार जाणले तरी साधकावस्थेचाही आणखी खोलवर विचार करता येईल. ‘भूषण सिद्धांत’ ग्रंथात श्रीसद्गुरूंनी वास्तविक मोक्ष म्हणजे काय, ते सांगितलं आहे. परमात्मा आणि आत्म्याच्या ऐक्यतेच्या ज्ञानानेच मोक्ष लाभतो, असं ते सांगतात. समस्त मोहासक्तीचा त्याग करून अर्थात निरासक्त होऊन आणि परमात्म्याच्या ऐक्यता भावात अखंड स्थित होऊन सहजावस्था प्राप्त करणं हाच खरा मोक्ष आहे, असं ते सांगतात. समस्त मोहासक्तीचं विवरण करताना त्यांनी मोहाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. या प्रकारांची वर्गवारी त्यांनी बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चार टप्प्यांत केलेली नसली आणि कोणताही मोह घसरणीसाठी तेवढाच कारणीभूत ठरण्याइतपत समर्थ असला, तरी आपल्या चर्चेच्या अनुषंगानं आपण या मोहांची वर्गवारी करणार आहोत. बद्धाच्या जीवनात मोह अनेकविध असतात. त्यात स्वदेहाच्या सुखाचा मोह, घराचा मोह, जमीनजुमल्याचा मोह, वर्ण, रूप, बल, धन वैभव, यशकीर्ती, लाभ, विजय, माता, पिता, पत्नी, पुत्र, भाऊ, मित्र, शत्रू, आप्तस्वकीय असे अनंत मोहाचे प्रकार बद्धाच्या जीवनात पदोपदी दिसतात. मुमुक्षुला धर्माचा आणि कर्माचा मोह असतो. साधकाला स्वर्गकल्पनेचा मोह, सहृदयतेचा मोह, तपाचा, व्रताचा, यज्ञाचा, दानाचा, उपासनेचा आणि तीर्थयात्रांचा मोह असतो! सिद्धाला मठ-आश्रमाचा आणि ऋद्धी-सिद्धींचा मोह असतो. ज्ञानाचा मोह, मानसन्मानाचा मोह, पदप्रतिष्ठेचा मोह, ऐश्वर्याचा मोह, मोठेपणाचा मोह, भौतिक आधारांचा मोह आणि मैत्रीचा मोह हे चारही टप्प्यांवर कमीअधिक प्रमाणात असतात. आता मोहाचे यातले काही प्रकार असे आहेत जे मोह आहेत, हे आपल्याला कळतच नाही! आपली चर्चा सध्या साधकावस्थेबाबत चालली असल्याने त्यातील अशा मोहांचा विचार करू. साधकाला सहृदयतेचा, उपासनेचा, दानाचा आणि व्रताचा मोह असतो, हे ऐकताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. यांना मोह का म्हटलं आहे? सहृदयता, दयाबुद्धी, दुसऱ्याविषयी अनुकंपा, करुणा ही वाईट आहे का? दानाची बुद्धी असणं गैर आहे का? उपासना आणि व्रताची ओढ असण्यात वाईट काय आहे? असं अनेकांना वाटेल. भौतिक मोहांपेक्षा या गोष्टींची ओढ असणं आजच्या काळात किती चांगलं आहे, असंही वाटेल. त्याचा थोडा विचार करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा