आद्या म्हणजे आधीपासूनचा. सृष्टीच्या आधीपासून ब्रह्मच होतं. त्यामुळे आद्या म्हणजेच परब्रह्म. ॐलाही ऋषींनी ब्रह्मच म्हटलं आहे. त्यामुळे ‘ॐ’ आणि ‘आद्या’ या दोन्हीची अर्थ परब्रह्म हाच आहे. आता मग ‘ॐ नमोजी आद्या’याचा अर्थ जर ‘श्रीसद्गुरूला वंदन असो’, हा असेल तर ‘ॐ’ आणि ‘आद्या’ अर्थात ‘परब्रह्म’ म्हणजेही सद्गुरूच असला पाहिजे. भजनात आपण ऐकतो, ‘गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू’! पण तरी हा दाखला काही सर्वानाच पटेलसा नाही. मग ज्या नाथपरंपरेतून ज्ञानेश्वर महाराज अवतरले, त्या नाथपंथाचाच दाखला प्रथम पाहिला पाहिजे. त्यासाठी या नाथपंथाच्या उगमाकडे थोडं वळलं पाहिजे. काय आहे हा उगम? ‘ज्ञानेश्वरी’त माऊली सांगतात, ‘‘क्षीरसिंधु परिसरीं। शक्तीच्या कर्णकुहरीं। नेणों कैं त्रिपुरारीं। सांगितलें जें।। तें क्षीर कल्लोळाआंतु। मकरोदरीं गुप्तु। होता, तयाचा हातु। पैठें जालें।।’’ (अध्याय १८, ओव्या १७५२, ५३). स्वामी स्वरूपानंदांनीही गुरुपरंपरा स्पष्ट करताना म्हटलं आहे की, ‘‘आदिनाथ सिद्ध आदिगुरू थोर। त्यासी नमस्कार भक्तिभावे।। तयाचे पासून शिवशक्तीबीज। लाभले सहज मत्स्येंद्रात।।’’ क्षीरसिंधुपरिसरी.. म्हणजे महासागराच्या काठी भगवान शंकरानं शक्तीच्या म्हणजे पार्वतीमातेच्या कर्ण कुहरी, म्हणजे कानात (कुहरी म्हणजे गुंफा) काहीतरी रहस्य सांगितलं. त्यावेळी समुद्राच्या लाटांच्या कल्लोळात मासळीच्या पोटात असलेल्या मत्स्येंद्रांनी ते ऐकलं आणि त्यांना आत्मज्ञान झालं. आता असं कोणतं रहस्य होतं ते? या कथेचा वापर नाथपंथाच्या अनेक ग्रंथांत हठयोग वा अन्य  एखादं तत्त्व विस्तारानं सांगण्यासाठी झाला आहे. पण त्या तत्त्वांत ‘रहस्य’मयता नाही. ते रहस्य, तो खरा गूढ बोध म्हणजेच ‘श्रीगुरुगीता’! नाथपंथामध्ये या गुरुगीतेला अत्यंत महत्त्व आहे. या गुरुगीतेत माता पार्वती भगवान शंकरांकडून गुरुदीक्षा घेऊन मग एक प्रश्न करते. माता विचारते, ‘‘केन मार्गेण भो स्वामिन्, देही ब्रह्ममयो भवेत्?’’ हे स्वामी, असा कोणता मार्ग आहे की ज्यायोगे सर्वसाधारण देहधारी जीव ब्रह्ममय बनेल? परब्रह्म कसं आहे? ते स्वतंत्र आहे, निश्चल आहे, आनंदस्वरूप आहे, स्थिर आहे, शाश्वत आहे. माणसालाही आपलं जीवन तसंच स्वतंत्र, शाश्वत, स्थिर आणि आनंदमय असावं, अशी जन्मजात ओढ असते. परमात्म्याच्या आधारानं तसं घडेल, या भावनेतूनच तो परमात्मप्राप्तीच्या इच्छेनं प्रेरित होतो. तेव्हा ब्रह्ममय बनायचं, याचा अर्थ जीवन आनंदानं परिपूर्ण करायचं, असाच त्याचा भाव असतो. पार्वतीमातेचा हा प्रश्न म्हणूनच क्लिष्ट तात्त्विक प्रश्न ठरत नाही. भगवान शंकरही या प्रश्नाचं कौतुक करतात आणि सांगतात, असा लोकोपकारी प्रश्न कुणी केला नव्हता! याचं उत्तर त्रलोकातही दुर्लभ आहे, पण हे देवी तुझ्यात आणि माझ्यात काही भेद उरलेला नाही म्हणून हे मोठं रहस्य मी तुला सांगतो. जीव ब्रह्ममय कसा बनेल, हे जाणून घ्यायचं तर आधी ब्रह्म म्हणजे काय, हे तर माहीत हवं! शिवजी सांगतात, ‘गुरूं विना ब्रह्म नान्यत् सत्यं सत्यं वरानने’! सद्गुरूशिवाय दुसरं ब्रह्म नाही, हे त्रिवार सत्य!!