सद्गुरू बोधानुरूप जगणं हीच उपासना बनते तेव्हा ज्ञान आणि भक्तीपासून भक्त विभक्त होत नाही. हे कसं साधेल, त्याने काय साधेल, कोणती स्थिती प्राप्त होईल, हे स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’च्या पुढील ८० ते ९३ या चौदा ओव्यांत सांगितलं आहे. या नित्यपाठाचा हा जणू परमोच्च बिंदू आहे. या ओव्या आता पाहू. भगवंत सांगतात, जर माझ्याशी ऐक्य पावायचे असेल तर हे साधका- ‘‘तूं मन हें मीचि करीं। माझिया भजनीं प्रेम धरीं। सर्वत्र नमस्कारीं। मज एकातें।। ८०।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ९, ओवी ५१७). ‘‘माझेनि अनुसंधानें देख। संकल्पु जाळणें नि:शेख। मद्याजी चोख। याचि नांव।। ८१।।’’ (ज्ञा. अ. ९, ओवी ५१८). या ओव्या वेगळ्या संदर्भात आधीच्याही काही सदरांत आपण चर्चिल्या आहेत. यांचा प्रचलित अर्थ असा की, ‘‘तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर (८०) जो माझ्या अनुसंधानाने संकल्प पूर्णपणे जाळतो, त्यालाच माझे चांगले भजन साधते, असे म्हणता येईल(८१).’’ आता विशेषार्थाच्या अंगाने या ओव्यांचा विचार करू. आजचं आपलं जगणं कसं आहे? ते सुख-दु:ख मिश्रित आहे. काही गोष्टी आपल्या मनाजोगत्या होतात, अनेक गोष्टी मनाविरुद्धही होतात. आपल्या कृतीचे कधी चांगले परिणाम होतात, कधी वाईट परिणामही भोगावे लागतात. काय केलं म्हणजे आपल्याला खरं सुख, खरी निश्चिंती मिळेल, हे आपल्याला नेमकेपणानं कळत नाही. त्यामुळे कृतीचा विचार करताना, प्रत्यक्ष कृती करताना आणि कृती केल्यानंतरही आपल्या मनात अनिश्चितताच असते. आपल्या जीवनात अनंत घडामोडी घडत असतात आणि अनंत घडामोडी आपणही असोशीनं घडवत असतो. या सगळ्यामागे प्रेरकशक्ती कोणती असते हो? या सगळ्यामागे मनाचीच शक्ती काम करत असते. प्रत्येक प्रसंग आपल्याला अनुकूल, आपल्यासाठी सुखाचा व्हावा असा प्रयत्न मन करीत असते. गमतीचा भाग असा की या प्रयत्नांत मन कधीच समाधानी होत नाही. प्रत्येक प्रसंगातून वा परिस्थितीतून कायमचं समाधान मनाला कधीच वाटत नाही. कालांतरानं प्रत्येक गोष्टीत काही ना काही उणीव, त्रुटी मनाला भासू लागते. देहबुद्धीला चिकटलेलं आणि सतत स्वहिताची काळजी वाहण्यात गुंतलेलं हे मन आत्मबुद्धीकडे वळवणं किती कठीण गोष्ट आहे! अशा आपल्याला, ‘‘तूं मन हें मीचि करीं। माझिया भजनीं प्रेम धरीं,’’ हे साधेल तरी का? तेव्हा प्रथम लक्ष या मनावरच द्यायला हवं ना? मनाचे हे खेळ कमी करण्यासाठी सद्गुरूंच्या आज्ञा पालनाशिवाय अन्य मार्ग नाही! कारण त्यांची प्रत्येक आज्ञा ही माझ्या मनाच्या आवडीवर, सवयीवरच पाय रोवत असते! आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगांत आपण कसं वागलं पाहिजे, याची जाणीव सद्गुरू करून देतात. मनाच्या आवेगानुसार, मन मानेल तसं न वागता, ‘मी कोण आहे,’ यापेक्षा ‘मी कोणाचा आहे,’ याची जाणीव ठेवून कसं वागावं, हे सद्गुरूच शिकवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा