गीता पूर्ण सांगून झाली. ज्ञान सांगोपांग सांगून झाले. (इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गह्यतरं मया) मग भगवंत अर्जुनाला म्हणाले की, आता पूर्ण विचार करून तुला जे हवं ते तू कर! (यथेच्छसि तथा कुरू!) सापशिडीच्या खेळात शेवटच्या घरातून पुन्हा घसरण होऊ शकते ना? तसाच हा निसरडा कडा! अर्जुनानं तात्काळ सांगितलं, देवा, मला नव्हे, तुला जे हवं तेच मी करीन! तेव्हा भगवंतांनी ‘मामेकं शरणं व्रज’ सांगितलं! तसं नित्यपाठातल्या ९१ व ९२ ओव्यांत परमानंद प्राप्तीचा खरा मार्ग आणि त्या मार्गानं गेल्यास किती मोठा लाभ होतो, हे सांगितलं आणि ९३वी जणू विचारते, बाबा रे! तुला हा शाश्वत लाभ हवा, की काम-क्रोध-लोभानं बरबटलेलं आणि परम अशांतीच्या खाईत नेणारं जगणं हवं, ते तूच ठरव! काम, क्रोध, लोभ तू सोडून सुटणार नाहीत, त्याऐवजी जो अभ्यास तुला सांगितला आहे ना, तो प्रामाणिकपणे सुरू कर. तो जसजसा वाढेल तसतसे काम-क्रोध आवरले जातील. आता इथे एक लक्षात ठेवा, ‘काम’चा अर्थ लैंगिकतेपुरता नाही. ‘काम’ म्हणजे कामना. माणूस म्हातारा झाला की, त्याची लैंगिक वृत्ती ओसरू लागते; पण आंतरिक कामना दिवसेंदिवस तरुण होत जाते!  तेव्हा क्षणोक्षणी निर्माण होणाऱ्या कामना, त्यांच्या पूर्तीत अडथळे आल्याने उद्भवतो तो क्रोध आणि त्यांच्या पूर्तीनं अधिक बळावतो तो लोभ या तिघांना माउलींनीही नरकाची द्वारे म्हटलं आहे! स्वामी सांगतात, ‘‘साधकें सर्वदा असावें सावध। यत्नें काम-क्रोध आवरावे।। अंतरीं जागृत ठेवावा विवेक। लक्षूनियां एक आत्म-रूप।।’’ (संजीवनी गाथा, १६४). अनवधानाच्या जागी सावधानता आली की साधकता येईल! एका आत्म-रूपाकडे लक्ष राहिलं तर काम-क्रोध-लोभ यांच्या वादळातही मन स्थिर राहील. स्वामी म्हणतात, ‘‘काम तेथें पुष्टि क्रोध तेथें शांति। लोभ तेथें तृप्ति राहे कैंची।।’’ जिथे कामना उरली आहे तिथे पूर्णत्वाचा, जिथे क्रोध आहे तिथे शांतीचा आणि जिथे लोभ आहे तिथे तृप्तीचा अनुभव अशक्य आहे. हे लक्षात घेऊन साधकानं हा अभ्यास निष्ठेनं आणि नेटानं केला पाहिजे. तसं झालं तर? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ९३वी ओवी सांगते, ‘‘ऐसा जो कामक्रोध लोभां। झाडी करूनि ठाके उभा। तोचि येवढिया लाभा। गोसावी होय।। ९३।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १६, ओवी ४४४). काम, क्रोध, लोभ नाहीसे झाले तर तेवढय़ा लाभानंही  देहासक्तीची गुलामी संपेल आणि तुम्ही स्वत:चे मालक व्हाल! जोवर ‘मी’लाच सत्य मानत होतो तोवर मी याच प्रपंचात जन्मोजन्मी पडत होतो. जेव्हा मी ‘ॐ तत्सत्’ या धारणेत विलीन होतो, अर्थात सद्गुरूमयतेत विलीन होतो तेव्हा हे समस्त चराचर जिथून उत्पन्न झालं, त्या मूळ स्थानी परततो! स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ९४वी म्हणूनच सांगते की, ‘‘पाहे पां ॐ तत्सत् ऐसें। हें बोलणें तेथ नेतसे। जेथूनि कां हें प्रकाशे। दृश्यजात।।’’ ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’च्या निमित्तानं स्वामी स्वरूपानंद यांच्याविषयी वर्षभर सुरू असलेल्या आपल्या या चिंतनाचा इथेच समारोप होत आहे, पुढील तीन भाग समारोपाचे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा