स्वामीजींचे धर्मविषयक विचार आपण का जाणले? तर स्वामीजी धर्माबाबत किती व्यापक, क्रांतीकारक विचार करीत होते, याची जाणीव व्हावी. धर्माकडे पाहण्याची ज्यांची दृष्टी इतकी विराट होती, ते ‘अनुक्रमाधारे’चा अर्थ वर्णाश्रमधर्मानुसार मानतील, असं संभवत नाही. उलट स्वरूपस्थ असणं हाच खरा स्वधर्म असेल तर त्यात ना जात येत ना धर्म. मग ‘देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे। तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।।’ या ओवीतील अनुक्रम शब्दाचा गूढार्थ काय? या ओवीच्या पहिल्या तिन्ही ओळींमध्ये एक-एक महत्त्वाचा शब्द आला आहे. ते तीन शब्द असे-‘देखें अनुक्रमाधारें। स्वधर्म जो आचरे। तो मोक्ष तेणें व्यापारें। निश्चित पावे।।’ अर्थात अनुक्रम, स्वधर्माचरण आणि मोक्ष, हे ते तीन शब्द आहेत. म्हणजेच या ओवीच्या प्रचलित अर्थानुसार पाहिलं तरी अनुक्रमानुसार जे धर्माचरण आहे त्याची अखेर मोक्षात सांगितली आहे. आता जन्मानुसार जी जात मला चिकटली आहे त्या जातीनुसारची कर्तव्यं पार पाडून मोक्ष लाभावा इतकी मोक्ष ही सामान्य गोष्ट आहे? मग अनुक्रमानुसारचं धर्माचरण ते कोणतं?  धर्माविषयीची मतं मांडणारं स्वामी स्वरूपानंद यांचं जे पत्र गेल्या भागांत आपण पाहिलं त्यात स्वामी स्वरूपानंद सांगतात की, ‘मनुष्यानं आपलं सर्व सामथ्र्य ईश्वरसेवेकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण त्यापूर्वी त्याला ईश्वराचं आणि स्वत:चं यथार्थ ज्ञान पाहिजे.’ थोडक्यात माणसाला जे ज्ञान मिळालं आहे, जी शक्ती आणि ज्या क्षमता मिळाल्या आहेत त्यांचा वापर त्यानं ईश्वर सेवेसाठीच केला पाहिजे. ईश्वरसेवा हेच त्याच्या जीवनाचं ध्येय आणि उद्दिष्ट असलं पाहिजे. ईश्वराची सेवा करायची तर आधी ईश्वर तर जाणला पाहिजे? त्याचं ज्ञान तर झालं पाहिजे! आता हे ज्ञान मिळविण्याचा उपायही स्वामी स्वरूपानंद सांगतात तो म्हणजे, ‘हरघडी आपल्या प्रत्येक कृतीचा आपण विचार करायची सवय ठेवली तरीही त्या दिशेने आपली पुष्कळ प्रगती होते. मनुष्याने आपले मन तपासले पाहिजे.’ ईश्वराचं यथार्थ ज्ञान माणसाला तात्काळ होणं कठीण आहे, पण मुळात त्याला स्वत:चं तरी यथार्थ ज्ञान आहे का हो? नाही! संतसत्पुरुष सांगतात की, तुम्ही स्वत:ला जे समजता ती तुमची भ्रामक ओळख आहे. ती या जन्मातली, या जन्मापुरती ओळख आहे. ती टिकणारी नाही. तुम्ही खरे कोण आहात, हे शोधून काढा. तुम्ही खरे तर परमात्म्याचा अंश आहात, ‘तत् त्वम असि’ तुम्हीच तो आहात! मग आपल्याला प्रश्न पडतो की जे मी स्वत:ला मानतो, मीच नव्हे जगही मला जे मानतं, माझी जी ओळख खरी मानतं, जिचा मला जन्मापासून अनुभव आहे ती ओळख नाकारायची आणि मला सर्वस्वी अपरिचित, अज्ञात आणि मुळात जी आहे की नाही, याबद्दलच साशंकता आहे ती माझी ओळख मी खरी मानायची, हे कसं शक्य आहे? मी काळा आहे की गोरा, शिक्षित आहे की अशिक्षित, श्रीमंत आहे की गरीब, मी जो आहे, त्याचा मला पक्का अनुभव आहे. ते मी खोटं कसं मानावं? इथेच अनुक्रम शब्दाचा गूढार्थ सुरू होतो!  तो जाणण्याआधी मोक्षाचा थोडा विचार करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा