श्रीसद्गुरू कसा बोध करतील, हे सांगता येत नाही. त्या मुलांना जसा ‘नित्यपाठा’चं पान उघडायला सांगून आलेल्या ओव्यांतून त्यांनी अप्रत्यक्ष बोध केला तसाच बोध ते खरं तर क्षणोक्षणी प्रत्येक साधकाच्या जीवनात करीत असतात. अगदी लहानशा भासणाऱ्या प्रसंगातही हाच बोध असतो, त्याची जाणीव प्रत्येकालाच होते, असं मात्र नाही. ‘कर्म-कुसुमां’चा विषय निघालाच आहे, तर श्री. चंद्रशेखर कुलकर्णी या एका स्वामीभक्तांचा अनुभव आठवतो. दररोज सकाळी ते अंगणातली ताजी फुलं तोडून श्रीस्वामी स्वरूपानंदांची पूजा करीत. देव्हाऱ्यात अन्यही देव-देवतांच्या मूर्ती असल्यानं फुलं जास्त तोडली जात. एकदा पूजा झाली आणि प्रसन्नचित्तानं ते श्रीस्वामींच्या तसबिरीकडे पाहू लागले. तोच त्यांना श्रीस्वामींना वाहिलेल्या फुलात एक अळी दिसली. असं फूल वाहिलं गेलं, याचं त्यांना दु:खं वाटलं आणि त्यांनी अलगद ते फूल उचललं आणि खिडकीतून ती अळी झटकून ते फूल पुन्हा तसबिरीला वाहिलं. काही काळानंतर त्यांनी पुन्हा पाहिलं तर देव्हाऱ्यातली इतर फुलं टवटवीतच होती, फक्त स्वामींना वाहिलेलं ते फूल काळवंडलं आणि कोमेजलं होतं! ते फूल एका जिवाचं आश्रयस्थान होतं, त्याचं खाद्य होतं. त्या जिवाला त्यापासून वंचित करून ते फूल वाहण्याचं ‘कर्म’ स्वामींना कसं रूचेल? चित्त जागृत असल्यानं आणि स्वामींच्या जाणिवेनं प्रेरित झाल्यानं या वरकरणी अगदी क्षुल्लक भासणाऱ्या प्रसंगातही लपलेला बोध त्यांना आकळला. तेव्हापासून पूजेच्या फुलात अळी सहसा आलीच नाही, आणि जेव्हा आली तेव्हा ते फूल अंगणातल्या झाडाखाली सुरक्षित ठेवायचं आणि पूजेत दुसरं फूल वाहायचं, असा क्रम त्यांनी राखला. तेव्हापासून स्वामींना वाहिलेलं फूल कधी काळवंडलं नाही! तर कर्म लहान असो की मोठं, सामान्य भासो की असामान्य, ते भगवद्भावनेनं केलं तरच त्या कर्माची कुसुमं होतील आणि ती भगवंताच्या चरणी रुजू होतील. श्रीमहाराजांचे एक भक्त प्रा. म. वि. केळकर यांनी पू. बाबा बेलसरे यांच्याशी ‘‘तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं।।’’ या ओवीबद्दल झालेल्या संभाषणाचा सारांश सांगितला. पू. बाबा म्हणाले की, पूजेत फुलं आपण कशी वाहातो? तर ती सुवासिक असतात. तशी म्हणाले, निष्काम भावनेनं जी र्कम होतील त्याच कर्माच्या फुलांनी भगवंत संतुष्ट होतो. आता पू. बाबांच्या या बोधानुरूप ओवीचा अर्थ अधिक खुलतो. फुलं एक तर सुवासिक असतात किंवा कोमेजलेली असतात. कर्म जेव्हा अहंकाराच्या भावनेनं बरबटतं तेव्हाच ते सडलेल्या, कोमेजलेल्या फुलांसारखं होतं. ते भगवंत कसं स्वीकारणार? ज्या कर्मात ‘मी’ उरत नाही, ज्यात स्वार्थप्रेरित हेतू नाही तेच कर्म निष्काम होणार. ते कर्म कर्तव्य म्हणून केलं आणि मग तेदेखील भगवंताला वाहून टाकलं, तर त्याला अपरंपार संतोष होईल! आता नित्यपाठातली पुढील ओवीकडे वळू. ही ओवी अशी : तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।।