वाटय़ाला आलेल्या कर्माच्या साखळीतून सुटायचं असेल आणि नवी कर्मसाखळी तयार होऊ द्यायची नसेल तर काय केलं पाहिजे, हे स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओव्यांतून सांगितलं आहे. त्या ओव्या आता पाहू.
तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची।।२३।। (अ. १८ / ९०६)
तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं।। २४।। (अ. १८ / ९१७)
तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।।२५।। (अ. ९ / ४००)
आणि हें कर्म मी कर्ता। कां आचरेन या अर्था। ऐसा अभिमान झणें चित्ता। रिगों देसी।।२६।। (अ. ३ / १८७)
तुवां शरीरपरां नोहावें। कामनाजात सांडावें। मग अवसरोचित भोगावे। भोग सकळ।।२७।। (अ. ३ / १८८)
तूं मानसा नियम करीं। निश्चळु होय अंतरीं। मग कर्मेद्रियें व्यापारीं। वर्ततु सुखें।।२८।। (अ. ३ / ७६)
प्रचलितार्थ : अर्जुना हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच, मी जो सर्वात्मक, त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे (२३). हे वीर अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता, ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते (२४). तात्पर्य, जे जे कर्म तुझ्याकडून स्वभावत: घडेल मग ते सांग असो वा असांग, ते सर्व कर्म माझ्याप्रीत्यर्थ आहे, अशा समजुतीने कर (२५). हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन, असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस (२६). तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे (२७). तू मनाला आवरून धर व अंत:करणात स्थिर हो, मग ही कर्मेद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत (२८).
विशेषार्थ विवरण: गेल्या काही भागांत आपण पाहिलं की वाटय़ाला आलेलं जीवन टाळता येत नाही. त्यात बदल करण्याचा, ते अधिक सुंदर वा सुसह्य़ करण्याचा प्रयत्न आपण करतोच, पण तरीही वाटय़ाला जे येतं ते स्वीकारूनच हे प्रयत्न करावे लागतात. मग जीवनाबद्दल नकारात्मक सूर कशाला? म्हणूनच नित्यपाठातली २३वी ओवी सांगते की, तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। अनन्य म्हणजे एकमात्र. वोलावा म्हणजे जीवन. तेव्हा हे पांडवा वाटय़ाला आलेलं जे जीवन आहे ना, ते एकमात्र आहे. आता ‘पांडवा’ म्हणजे कोण? तर पांडव म्हणजे पाच. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्या आधारावर जगत असलेला मनुष्य म्हणजे पांडव. तर हे जिवा, तुझ्या वाटय़ाला हा जो मनुष्यजन्म आला आहे ना, तो पुन्हा येईलच याची हमी नाही. हे जीवन अनन्य आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा