कोणत्याही सामाजिक स्तरावरील व्यक्ती माझं भजन करील तर मलाच प्राप्त करील, असं भगवंत सांगतात. इथेच ‘पापयोनीतील व्यक्तीही मला या रीतीनेच प्राप्त करून घेते,’ असंही भगवंत सांगतात. सामाजिक स्तरांत जन्मनिहाय उच्च-नीचता कल्पून हीन वर्गातील व्यक्तीला पापयोनीतील मानणं, हा अर्थ त्याज्यच मानला पाहिजे. ‘पापयोनी’चा व्यापक अर्थ लक्षात घेऊ. ८४ लक्ष योनीत भ्रमण केल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. याचाच अर्थ मनुष्ययोनी ही या ८४ लक्ष योनीत येत नाही. मनुष्ययोनी ही एकच असल्यानं त्यात पुण्ययोनी जशी नाही, तशीच पापयोनीही संभवत नाही. आता ज्या ८४ लक्ष योनी आहेत त्यात अनंत जीवसृष्टी, प्राणीसृष्टी, पक्षीसृष्टी, वृक्षसृष्टी सामावली आहे. प्रारब्ध भोग भोगण्यातच त्यांचा जन्म सरतो. जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा या योनींमध्ये उपाय नाही. मनुष्य जन्मात मात्र हा उपाय साध्य आहे. त्यासाठी जो अभ्यास आवश्यक आहे, साधना आवश्यक आहे ती करण्यासाठीची क्षमता मनुष्ययोनीत आहे. असे असतानाही आपण मागेच पाहिल्याप्रमाणे, या क्षमतांचा उपयोग व्यापकाची जाणीव वाढविण्यासाठी झाला नाही आणि संकुचितात अधिक गुंतण्यासाठी झाला, तर काय उपयोग? म्हणजे जे सोडवू शकते तेच अडकवते. शाश्वताचा विसर पाडते आणि अशाश्वताची ओढ लावते. त्या ओढीतून अशाश्वताच्या प्राप्तीसाठी आणि ते टिकविण्यासाठी मनुष्य हीन पातळी गाठतो तेव्हा पुण्यप्रद अशी मनुष्ययोनी पापप्रदच होते. पाप आहे तिथे ताप आहे. विशेष गोष्ट अशी की, जिथे ताप आहे तिथे संताप जसा आहे, तशीच अनुतापाची, पश्चात्तापाची संधीही आहे. असा अनुतापदग्ध, पश्चात्तापदग्ध जीव जरी माझ्या भजनी लागेल तरी मलाच प्राप्त करून घेईल, आधीची त्याची ‘पापयोनी’ त्याआड येणार नाही, असं भगवंत सांगत आहेत. आता हे ‘भजन’ मात्र खरं पाहिजे. सारं काही भगवंताचं आहे, या जाणिवेनं कर्तव्यर्कम न सोडता, अनासक्त राहून शाश्वताच्या अनुसंधानात मग्न होणं, हेच खरं भजन आहे, मुख्य भजन आहे. अशाश्वत जगाला, त्या जगातील अशाश्वत नावलौकिकाला, तो अशाश्वत नावलौकिक ज्या अशाश्वत आधारांवर अवलंबून आहे, त्या अशाश्वत आधारांना भजणारा जीव जेव्हा शाश्वताच्या भजनी लागतो, तेव्हा शाश्वतापासून कधीच विभक्त होत नाही. अशी भक्ती ज्याला साधते, तो कोणीही असो, मी त्याच्या अधीन होतो, हे भगवंताचं रहस्य उघड करताना स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ७६वी ओवी सांगते की, ‘‘पैं भक्ति एकी मी जाणें। तेथ सानें थोर न म्हणें। आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया।।’’ (ज्ञा. अध्याय ९, ओवी ३९५). भगवंत सांगतात, मी केवळ एक भक्ती जाणतो. शुद्ध भक्ती! मग तो भक्त श्रीमंत आहे की गरीब, हे मी पाहात नाही. भावाच्या भुकेपायी मी कोणत्याही ठिकाणी ‘पाहुणा’ म्हणून जातो! भगवंताशी सदोदित एकरूप असे श्रीसद्गुरूही तर तसेच आहेत! तेही केवळ भेदातीत भक्तीच जाणतात. स्वामी स्वरूपानंद यांनीही त्याचा दाखला दिला आहे.
  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा